NDMA Emergency Alert system and its nationwide testing purpose : जर तुमच्या मोबाईलवर जोरात बीप आवाज आला असेल किंवा एखादा अनपेक्षित संदेश झळकला असेल, तर घाबरून जाण्याचे कारण नाही. सरकार एका नवीन ‘आपत्कालीन अलर्ट’ प्रणालीची चाचणी करत आहे, ज्याद्वारे निवडक भागातील सर्व मोबाईल फोन्सवर थेट चेतावणी पाठवली जाते. ही चाचणी सामान्य वापरकर्त्यांना देखील दिसून येत आहे. ही मोहीम दूरसंचार विभाग (DoT) आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्याद्वारे संयुक्तपणे राबवली जात आहे. या मोहिमेला सेल ब्रॉडकास्ट असे म्हणतात. अनेक देशांमध्ये ही प्रणाली राबवली जाते.

सेल ब्रॉडकास्ट म्हणजे काय?

ही प्रणाली ‘सचेत’ (SACHET) नावाच्या अलर्ट प्लॅटफॉर्मशी जोडलेली असून, तिची निर्मिती ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स’ (C-DOT) ने केली आहे. सेल ब्रॉडकास्ट अलर्ट एकाच वेळी एका ठराविक भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल फोन्सवर पाठवले जातात. यामुळे टेलिकॉम नेटवर्कवर कोणताही ताण न पडता जलद आणि व्यापकपणे माहिती पोहोचवणे शक्य होते. त्सुनामी, भूकंप, वीज पडणे किंवा गॅस गळती आणि रासायनिक आपत्तींसारख्या नैसर्गिक संकटांच्या वेळी, जेव्हा फोन लाईन्स आणि डेटा नेटवर्क व्यस्त असतात, तेव्हा ही प्रणाली अधिक प्रभावी ठरते. ही प्रणाली पूर्णपणे स्वदेशी आहे.

नेमका काय मेसेज आला आहे?

“भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सुरू केले आहे. नागरिकांना सतर्क करा, राष्ट्राला सुरक्षित ठेवा. हा संदेश मिळाल्यावर जनतेकडून कोणतीही कृती करण्याची आवश्यकतानाही. हा एक चाचणी संदेश आहे – भारत सरकार”, असा संदेश प्राप्त झाला आहे.

सरकारी धोरणानुसार स्थानिक दूरसंचार तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी C-DOT कडे या प्रणालीच्या निर्मितीची जबाबदारी सोपवण्यात आली होती. सध्या देशभर या प्रणालीची कार्यक्षमता आणि विश्वासार्हता तपासण्यासाठी चाचण्या घेतल्या जात आहेत. या काळात नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर इंग्रजी, हिंदी आणि प्रादेशिक भाषांमध्ये चाचणी संदेश (Test Messages) प्राप्त होऊ शकतात. विविध नेटवर्कच्या टॉवर्सची तपासणी सुरू असल्याने वापरकर्त्यांना हे मेसेज एकापेक्षा जास्त वेळा मिळू शकतात, जे पूर्णपणे सामान्य आहे. या संदेशांना नागरिकांनी कोणताही प्रतिसाद देण्याची गरज नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

ज्यांच्या मोबाईलमध्ये ‘सेल ब्रॉडकास्ट टेस्ट अलर्ट’ सुरू (Enable) आहे, त्यांनाच हे मेसेज मिळतील. वापरकर्ते त्यांच्या फोनच्या Settings > Safety and Emergency > Wireless Emergency Alerts > Test Alerts मध्ये जाऊन हे सेटिंग बदलू शकतात. एकदा का या चाचण्या पूर्ण होऊन ही प्रणाली अधिकृतपणे सुरू झाली की, वास्तविक आपत्तीच्या वेळी ती आपोआप काम करेल आणि काही सेकंदातच बाधित क्षेत्रातील नागरिकांपर्यंत पोहोचेल.

देवेंद्र फडणवीसांनीही दिली प्रतिक्रिया

या मेसेजसंदर्भात या पूर्वीच कळवण्यात आलं होतं. आपल्या सर्वांकरता ही आनंदाची बातमी आहे की भारतीय बनावटीचं ही अलर्ट सिस्टिम तयार झाली आहे. युद्ध, आपत्ती, आणीबाणीच्या काळात प्रत्येक व्यक्तीच्या मोबाईलवर त्याच्या भाषेमध्ये अलर्ट देण्यात येणार आहे. त्याचं टेस्टिंग आज करण्यात आलं. ते यशस्वी झालं आहे. मला असं वाटतं की भारताने युद्धजन्य परिस्थिती किंवा आपत्तीच्या काळातील परिस्थितीसाठी चांगली कामगिरी केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ‘महालक्ष्मी सरस’ प्रदर्शनाचं उद्घाटन झालं. त्यावेळी ते बोलत होते.