उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना बाहेर काढण्यात बचाव पथकाला मंगळवारी (२८ नोव्हेंबर) रात्री यश आलं. चारधाम प्रकल्पाचा भाग असलेल्या सिलक्यारा ते बारकोट या पाच किलोमीटर बोगद्याचा काही भाग १२ नोव्हेंबर रोजी खोदकाम चालू असताना कोसळला. यात ४१ कामगार आत अडकले होते. या ४१ कामगारांना तब्बल १७ दिवसांनी सुखरूप बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर बचाव पथकातील एनडीआरएफच्या जवानांनी यावर प्रतिक्रिया दिली.
एनडीआरएफचे जवान मनमोहन सिंह रावत म्हणाले, “मी जेव्हा बोगद्यात पोहचलो तेव्हा सर्वात आधी मी कामगारांना विचारलं की, ते कसे आहेत, घाबरू नका. तुमच्या मदतीसाठी एनडीआरएफचं पथक पोहचलं आहे. एनडीआरएफचं पथक मदतीसाठी आलेलं पाहून ते खूप आनंदी होते. एनडीआरएफ सर्वांना एक एक करून बाहेर काढेल, याचा त्यांना विश्वास होता.”
“सर्वात आधी बाहेर कोण जाणार यावर कामगार काय म्हटले?”
“एनडीआरएफची टीम पोहचल्यावर सर्वात आधी बाहेर कोण जाणार यावर कामगार काय म्हटले? या प्रश्नावर रावत म्हणाले, “कोण आधी बाहेर जाणार याबाबत त्यांनी आधीच एक योजना तयार केली होती. त्यानुसार सर्व कामगार बाहेर जात होते,” असं मनमोहन सिंह रावत यांनी सांगितलं.
व्हिडीओ पाहा :
“ही बचाव मोहीम आव्हानात्मक आणि कठीण होती”
“१७ दिवस कामगारांचं जेवण, औषधे पुरवणं आणि त्यांचं मानसिक आरोग्य व्यवस्थित ठेवणं हे आव्हानात्मक होतं. वरच्या बाजूने जो पाईप बोगद्याच्या आतमध्ये टाकण्यात आला होता त्यातून कामगारांना अन्न पाठवलं जात होतं. ते फारच कठीण होतं,” असंही रावत यांनी नमूद केलं.
हेही वाचा : VIDEO : १७ दिवस बोगद्यात, बाहेर आल्यानंतर मजूर म्हणाला, “ढिगारा कोसळल्यानंतर १० ते १५ तास…”
“कामगारांचं मानसिक संतुलन राखण्यासाठी काय केलं?”
“कामगारांचं मानसिक संतुलन राखण्यासाठी काय केलं?” या प्रश्नावर रावत म्हणाले, “कामगारांचं मानसिक संतुलन राखण्यासाठी आम्ही त्यांच्याशी बोलताना आम्ही तुमच्याजवळ पोहचत आहोत, असं सांगत होतो. कामगारांनी घाबरू नये आणि धाडसाने रहावं, असं आवाहनही केलं. आम्ही अनेक बचाव मोहिमा केल्या. मात्र, ही मोहीम खूप आव्हानात्मक होती.”