दीपावलीच्या मंगलमय वातावरणात तमाम भारतीय शोभेचे रॉकेट आकाशात सोडून जल्लोष करीत असतानाच, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) थेट मंगळावरच रॉकेट धाडून दिवाळीचा आनंद द्विगुणित केला. इस्रोच्या पीएसएलव्ही सी२५ने मंगळवारी दुपारी दोन वाजून ३८ मिनिटांनी ‘मंगलयाना’सह श्रीहरिकोटातील सतीश धवन अंतराळ केंद्रातून अवकाशात उड्डाण केले.  या प्रक्षेपणाने भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळ मोहिमेचा प्रारंभ झालाच, पण आपल्या पहिल्यावहिल्या आंतरग्रह मोहिमेमार्फत भारत अशी कामगिरी करणाऱ्या जगातील अत्यंत मोजक्या देशांच्या यादीत स्थानापन्न झाला आहे.
आव्हानांचा मंगळ..
भारताच्या महत्त्वाकांक्षी मंगळयानाचे पृथ्वीवरून यशस्वी उड्डाण झाले. भारतीयांनी जल्लोष केला. ही घटना तशीच आहे. प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशीच. मात्र ही मोहीम जसजशी पुढे सरकली आहे तशी त्यातील आव्हानेही वाढू लागली आहेत.
भारताने महत्त्वाकांक्षी मंगळ मोहीम हातात घेऊन स्वत:ची आंतरग्रहीय प्रवास क्षमता सिद्ध करून दाखवण्यास सुरुवात केली आहे. ही मोहीम जशी यशस्वी होईल तसे आपण या संशोधनात अधिक सक्षम होत जाऊ. या मोहिमेबद्दल एक विशेष सांगायचे म्हणजे आजपर्यंत ज्या देशांनी मंगळ मोहिमा आखल्या आणि त्या यशस्वीही केल्या त्या सर्व मोहिमांमध्ये मंगळयान हे पृथ्वीवरून थेट मंगळाच्या दिशेने रवाना झाले होते. पण आपले यान हे थेट मंगळाच्या दिशेने रवाना न होता १ डिसेंबपर्यंत पृथ्वीच्या भोवती फिरणार आहे. याचे कारण म्हणजे मंगळाच्या दिशेने थेट रवाना होण्यासाठी प्रचंड ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपले यान पृथ्वीच्या भोवती फिरणार असून त्यातून निर्माण झालेल्या ऊर्जेच्या मदतीने ते मंगळाच्या दिशेने रवाना केले जाणार आहे. इथेच या मंगळप्रवासाच्या नव्या आव्हानांची सुरुवात होते.  १ डिसेंबर रोजी जेव्हा हे यान मंगळाच्या दिशेने वळविले जाईल तेव्हा त्याची दिशा अचूक ठरविली गेली पाहिजे. यात जर १ मिमीचाही फरक पडला तरी यान भरकटू शकते. याचबरोबर दुसरे आणखी आव्हान असणार आहे ते म्हणजे यान जेव्हा मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल तेव्हा तोही अचूक स्थानातूनच व्हायला हवा. हा प्रवेश करतानाही एक मिमीची गडबड झाली तरी सारे गणित कोलमडू शकते आणि आपले यान मंगळाच्या पृष्ठभागावर जाऊन आदळू शकते किंवा ते त्याच्या पलीकडेही जाऊ शकते. आणखी एक आव्हान आहे ते म्हणजे यानाची गती पृथ्वी आणि मंगळाच्या गतीशी ताळमेळ साधणारी असली पाहिजे. हे जोपर्यंत अचूकपणे होत आहे तोपर्यंत आपले यान योग्य दिशेने जात असेल. या कामातही अचूकता ठेवणे हेही एक मोठे आव्हान आहे.
या मोहिमेचे एक नावीन्य सांगता येईल. ते म्हणजे यामध्ये असलेला मिथेन सेन्सर. या माध्यमातून मंगळावरील मिथेनच्या अभ्यासासाठी स्पेक्ट्रोस्कोपिक पद्धतीचा वापर करण्यात येईल. त्यात मंगळाच्या वातावरणावरून परावर्तित झालेल्या सूर्यप्रकाशाचा वर्णपतल घेऊन त्यात मिथेनच्या अस्तित्वाचा अंदाज घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. यामध्ये हे मिथेन नैसर्गिक आहे की सजीवांमुळे निर्मित झालेले आहे त्याचा शोध घेण्यात येईल. याचा शोध आपल्याला लागता तर तो मंगळावरील सजीव सृष्टीसाठीचा एक मोठा पुरावा असणार आहे.

मंगळ यानाच्या प्रवासाचे तीन टप्पे
१ पृथ्वीभोवती २५ दिवस प्रदक्षिणा घालून, १ डिसेंबरला १२ वाजून ४२ मिनिटांनी पृथ्वीच्या कक्षेबाहेर
२ पृथ्वी आणि मंगळाच्या कक्षेतील तफावत लक्षात
घेता मंगळाच्या कक्षेत शिरण्यासाठी सुमारे ९ महिन्यांचा कालावधी लागेल.
३ २४ सप्टेंबर २०१४ रोजी मंगळाच्या कक्षेत प्रवेश.

पीएसएलव्हीची उल्लेखनीय कामगिरी!
ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपक वाहन (पीएसएलव्ही) हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे भूस्थिर उपग्रह अंतराळात नेणारे, अर्थात प्रक्षेपण यान आहे. इस्रोच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा आहे. अन्य देशांचेही उपग्रह अवकाशात पाठवून परकीय चलन मिळवण्यात आणि अवकाश स्पध्रेत भारताला आघाडीवर ठेवण्यात या यानाचा महत्त्वाचा वाटा आहे. या प्रक्षेपकाची उंची ४४ मीटर तर, वजन २३० टन आहे. २००८ मध्ये ‘इस्रो’ने या प्रक्षेपकामार्फत एकाचवेळेस १० उपग्रह प्रक्षेपित करून विश्वविक्रम केला होता. हे यान संपूर्ण स्वदेशी बनावटीचे असून त्याचे संशोधन आणि विकासाचे काम इस्रोने केले आहे.
अरविंद परांजपे, संचालक, नेहरू तारांगण