नवी दिल्ली: काँग्रेस पक्ष पदाधिकारी-नेत्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग राहिला आहे, पक्षाने प्रत्येकाला भरभरून दिले आहे, आता कठीण परिस्थितीत प्रत्येकाने नि:स्वार्थपणे काम करून पक्षाने आत्तापर्यंत दिलेल्या ‘कर्जा’च्या परतफेडीची वेळ येऊन ठेपली आहे, असा स्पष्ट संदेश काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी दिला.

राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचे १३ ते १५ मे असे तीन दिवसीय चिंतन शिबीर होणार असून त्यातील राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि संघटनात्मक अजेंडय़ावर सोमवारी झालेल्या कार्यसमितीच्या बैठकीत शिक्कमोर्तब करण्यात आले. ‘’पक्ष संघटना मजबूत करणे म्हणजे जादूची छडी फिरवणे नव्हे. नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वार्थाचा त्याग करून कामाला लागले पाहिजे, सातत्याने आणि शिस्तीने सामूहिक ध्येयासाठी (भाजपने दिलेल्या आव्हानांविरोधात) काम केले तर आताच्या काळातील आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाता येऊ शकेल’’, असे मत सोनियांनी बैठकीत व्यक्त केले.

कुठल्याही पक्षाला आत्मटिकेची गरज असते. पण, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास, मनोधैर्य ढासळून गोंधळाचे वातावरण निर्माण होऊ नये याचीही दक्षता घ्यावी लागेल’’, असा इशाराही सोनिया गांधींनी दिला.

‘नवसंकल्प कृतिआराखडा’ लोकसभा निवडणुकीसाठी ‘’नवसंकल्प कृतिआराखडा’’ तयार करणे हाच चिंतन शिबिराचा प्रमुख उद्देश आहे. भाजपच्या राजकीय धोरणांमुळे निर्माण झालेल्या आव्हानांना सामोरे जाणे व त्यासाठी पक्षाची फेरबांधणी करणे यावर चिंतन केले जाईल, असे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १९९८मध्ये पचमढी, २००३मध्ये सिमला आणि २०१३मध्ये जयपूर अशी पक्षाची तीन चिंतन शिबिरे झाली होती. चौथ्या चिंतन शिबिरात सहभागी होणाऱ्या सुमारे ४०० पदाधिकाऱ्यांमध्ये ५० टक्के प्रतिनिधींचे वय ५० वर्षांहून कमी आहे. त्यातही ३०-३५ टक्के प्रतिनिधींचे वय ४० वर्षांहून कमी आहे. शिबिरात २१ टक्के महिलाही सहभागी होतील, अशी माहिती प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी दिली.