NEET 2026 Exam Cancelled: वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा रद्द झाल्याने देशभरातून पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व नाराजीचे वातावरण पाहायला मिळत आहे. विरोधकांकडून याप्रकरणी सरकारवर टीका होत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर प्रहार करत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तथाकथित अमृतकाळ आता विषात रुपांतर होऊ लागल्याची टीका केली आहे.
माफिया निसटतात, विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागते – राहुल गांधी
राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर याप्रकरणी पोस्ट करुन सरकारवर हल्लाबोल केला. “नीट परीक्षा रद्द झाली, २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे परिश्रम, त्याग आणि स्वप्नं या भ्रष्ट भाजपा व्यवस्थेने चिरडून टाकली”, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. “लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा तोच मानसिक ताण, आर्थिक ओढाताण आणि अनिश्चिततेचा सामना करावा लागेल. दरवेळी पेपर माफिया निसटून जातात आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांना शिक्षा भोगावी लागते”, असे राहुल गांधी यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
तर शिक्षणाला काय अर्थ उरेल? राहुल गांधींचा सवाल
“कोणाच्या वडिलांनी कर्ज घेतले, कोणाच्या मातेने आपले दागिने विकले, लाखो मुलांनी रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. पण,
त्या बदल्यात त्यांना मिळाले ते फक्त पेपर फुटी, सरकारी निष्काळजीपणा आणि शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार. हे केवळ अपयश नसून तरुणांच्या भविष्याशी केलेला अपराध आहे”, असा शब्दात राहुल गांधी यांनी सरकारला धारेवर धरले. “विद्यार्थ्यांचे निशीब कष्टापेक्षा पैसा आणि वशिल्याने ठरवले जाणार असेल, तर शिक्षणाला काय अर्थ उरेल?”, असा सवाल देखील गांधी यांनी उपस्थित केला. पंतप्रधानांचा तथाकथित ‘अमृतकाळ’ देशासाठी ‘विषकाळ’ बनला आहे, असे गांधींनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
पेपरफुटीच्या आरोपानंतर नीट परीक्षा रद्द
पेपरफुटीच्या आरोपानंतर केंद्राने नीट परीक्षा -२०२६ रद्द केली. ०३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा अचानक रद्द करण्यात आल्याने विद्यार्थी आणि पालकांकडून तीव्र संताप आणि नाराजी व्यक्त केली जात आहे. केंद्राने ही परीक्षा पुन्हा घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणाचा सीबीआयच्या माध्यमातून तपास होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पेपरफुटीच्या आरोपानंतर एनटीएच्या नि:पक्षतेवर संशय घेण्यात आला. यामुळे ०३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा पुन्हा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
२२.७९ लाख विद्यार्थींनी दिली होती परीक्षा
एमबीबीएस, बीडीएस आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी भारतात नीट परीक्षा महत्वाची मानली जाते. देशातून लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेची तयारी करत असतात. यावर्षी देशातील ५५१ शहरातील ५,४०० परीक्षा केंद्रांवर ०३ मे रोजी नीट लेखी परीक्षा पार पडली. या परीक्षेसाठी देशातून २२.७९ लाख विद्यार्थी बसले होते.
