नवी दिल्ली : नीट परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) आंदोलन हिंसक झाल्यानंतर सोमवारी अखेर केंद्र सरकारने आंदोलकांशी चर्चा सुरू केली. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासह आत्महत्या केलेल्या विद्याथ्र्याच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची भरपाई अशा मागण्या सीजेपीने केल्या आहेत. याबाबत केंद्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही.
रस्त्यावर उतरलेले हजारो आंदोलक सैरावैरा झाल्यानंतर आणि संसदेच्या मुख्य द्वारापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर केंद्र सरकारने आंदोलनाची पहिल्यांदाच दखल घेतल्याचे दिसले. ‘सीजेपी’चे प्रवक्ते सौरभ दास यांनी सोमवारी सकाळी साडेअकरा वाजता केंद्रीय मंत्री नड्डा यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
प्रधान यांचा तातडीने राजीनामा घेण्यात यावा, सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना तातडीने रुग्णालयातून सोडून द्यावे, आत्महत्या केलेल्या नीट परीक्षार्थींच्या कुटुंबाला १ कोटींची नुकसान भरपाई दिली जावी, या प्रमुख मागण्या सीजेपीने केल्या आहेत. ‘आंदोलकांच्या वतीने मागण्याची माहिती देण्यात आली असून त्यावर सोमवारी सकाळी ११.५० वाजल्यापासून केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. मागण्यांचे लेखी पत्र दुपारी चार वाजता देण्यात आले’, अशी माहिती नड्डा यांनी एक्सवरून दिली. नड्डा यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली. आमच्या मागण्याचा गांभार्याने विचार केला जाईल असे आश्वासन नड्डांनी दिल्याची माहिती ‘सीजेपी’ने निवेदनाद्वारे दिली.
शहा-प्रधान साडेतीन तास चर्चा
तरुणांच्या आंदोलनाचे लक्ष्य असलेले शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सोमवारी संसदभवनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सोमवारी जवळपास साडेतीन तास झालेल्या चर्चेचा तपशील उघड झाला नाही. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ‘सीजेपी’ ठाम असताना या चर्चेला महत्त्व आले आहे.
उपोषण सुरूच : वांगचुक
सीजेपीचे जंतर-मंतरवरील आंदोलन पोलिसांनी मोडून काढण्याचा प्रयत्न केला असला तरी, ते सुरूच राहील, असे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी जाहीर केले. पोलिसांनी तरुणांना निर्दयीपणे मारहाण केली. त्याचा निषेध करत उपोषण कायम ठेवण्याचा वांगचुक यांनी निर्धार केला.
