नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणावरून सध्या मोठा गदारोळ सुरू आहे. याबाबत अनेक विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला आहे. नीट (NEET) परीक्षेच्या पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द करून परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रद्द झालेली नीटची परीक्षा आता २१ जून रोजी पुन्हा घेण्यात येणार आहे. नीटची परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे.

नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या प्रकरणात सीबीआय कारवाई करत असून काही संशयितांना अटक देखील करण्यात आली आहे. दरम्यान, NEET चा पेपर नेमकं कसा फुटतो? त्यामागची संभाव्य कारणं काय आहेत? केंद्र सरकारने नेमकी काय काळजी घेतली पाहिजे? अशा प्रकारे पेपरफुटीच्या घटना घडत असतील तर विद्यार्थ्यांचं भविष्य काय? अशा विविध मुद्यांवर शिक्षणतज्ज्ञ महेश्वर पेरी यांनी ‘एक्सप्रेस कॅफे’च्या पॉडकास्टमध्ये सविस्तर भाष्य करत आपलं मत माडलं आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे? जाणून घेऊ.

महेश्वर पेरी यांनी काय म्हटलं?

नीट (NEET) पेपरफुटीमुळे ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे देशभरातली जवळपास २२ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा एकदा ही परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, अशा प्रकारे NEET चा पेपर कसा फुटतो? अशा प्रकारचा गंभीर प्रकार कसा घडतो? नीट पेपरफुटीच्या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांनी आता काय करायचं? काही विद्यार्थ्यांनी २०२४ मध्ये नीट (NEET) ची परीक्षा दिली होती, तेव्हाही पेपर फुटला होता. त्यानंतर आता २०२६ मध्ये लाखो विद्यार्थ्यांनी पेपर दिला आणि पुन्हा पेपर फुटल्याची घटना घडली. मग अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायचं? या देशांत नेमकं काय चाललंय? या सर्व प्रश्नांवर पॉडकास्टमध्ये बोलताना महेश्वर पेरी यांनी सविस्तर भाष्य केलं.

पेपरफुटीच्या घटना का घडतात?

महेश्वर पेरी म्हणाले की, “असं आहे की एखादा विद्यार्थी जेव्हा १० वर्ष किंवा १५ वर्ष शिक्षण घेतो, पण त्या शिक्षणाचा काहीही विचार न करता फक्त एखाद्या ३ तासांच्या प्रवेश परीक्षेवरच सर्व काही अवलंबून असल्याचं दिसून येतं आणि यामधून विद्यार्थ्यांवर परीक्षेचा मोठा दबाव येतो. त्यामधून मग अशा प्रकारे पेपर फुटीच्या घटना घडण्याची शक्यता असते. समजा तुम्ही १२ वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण त्याला काहीही अर्थ राहत नाही, जेव्हा तुम्ही फक्त ३ तासांच्या प्रवेश (एन्ट्रास) परीक्षेवरून त्या विद्यार्थ्यांचं पुढील भविष्य ठरवता. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार होण्याची शक्यता जास्त असते”, असं पेरी यांनी म्हटलं.

“आता नीटच्या परीक्षेबाबत बोलायचं झालं तर समजा सरकारी आणि खासगी वैद्यकीय महाविद्यालयांचा आपण विचार केला, तर शुल्कातील (फी) प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत आढळून येते. कारण सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत एमबीबीएससाठी ५ वर्षांत जवळपास ५ लाखांपर्यंत खर्च येतो. पण आपण खासगी वैद्यकीय महाविद्यालयांत याच अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला तर १ कोटी ते १.५ कोटींपर्यंत खर्च येऊ शकतो. त्यामुळे अशा एवढ्या मोठ्या प्रमाणातील तफावतीमुळे असे गैरप्रकार घडण्याला प्रोत्साहन मिळतं”, असं महेश्वर पेरी यांनी म्हटलं आहे.

पेपरफुटीच्या घटनांना कशामुळे बळ मिळतं?

“हे चित्र फक्त या क्षेत्रातीलच आहे असं नाही. आता इंजिनिअरिंगचं शिक्षण घ्यायचं असेल तर आयआयटीत १० लाख खर्ज सांगतात, त्याच शिक्षणासाठी खासगी कॉलेजे २० लाख सांगतात हा फरक आहे. आता नीट पेपर फुटीच्या प्रकरणात मी असं देखील वाचलंय की या प्रकरणात काही पालकांनाही अटक झाली, कारण त्यांनी त्यांच्या मुलासाठी पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. असं आहे की काही जणांच्या डोक्यात असा विचार येऊ शकतो की मी ३० लाख रुपये देऊन जर पेपर खरेदी केला, तरीही माझा एक कोटींचा फायदा आहे, कारण मुलगा चांगल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेईल आणि जास्त होणारा खर्च वाचेल आणि याच प्रकारच्या शिक्षणाच्या क्षेत्रात असणाऱ्या शुल्काच्या तफावतीमुळे असे गैरप्रकार वाढतात”, असं महेश्वर पेरी यांनी म्हटलं आहे.

NTA ची विश्वासार्हता कमी होतेय का?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही संस्था २०१७ मध्ये स्थापन झाली. मात्र, ही संस्था स्थापन झाल्यापासून दोनदा अशा पेपरफुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या संस्थेची विश्वासार्हता राहिली आहे असं वाटतं का? असा प्रश्न विचारला असता ते महेश्वर पेरी म्हणाले की, “विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतच आहेत.मात्र, कोणतीही परीक्षा असो, त्या परीक्षेच्या प्रतिक्रियेवरून विश्वासार्हता कधीच कमी झालेली आहे. कारण परीक्षा पारदर्शकपणे घेतल्या जात नाहीत असं सातत्याने दिसून येतं”, असंही पेरी म्हणाले.

२०२४ मधील पेपरफुटीच्या घटनेचा अहवाल कुठेय?

“नीट परीक्षेबाबत बोलायचं झाल्यास २०२४ मध्ये जेव्हा पेपर फुटला होता, त्यानंतर दोन गोष्टी होणं अतिशय गरजेचं होतं. एक म्हणजे झालेल्या घटनेच्या चौकशीचा अहवाल समोर येणं, पण तो अहवाल अद्यापही समोर आलेला दिसला नाही. जर २०२४ मध्ये झालेल्या पेपर फुटीत काय घडलं होतं आणि त्याचा अहवाल समोर आला असता, तर आज पुन्हा पेपरफुटीचा हा दिवस पाहावा लागला नसता”, असं मत महेश्वर पेरी यांनी व्यक्त केलं आहे.

राधाकृष्णन समितीच्या शिफारसी कागदावरच का राहिल्या?

“प्रा.राधाकृष्णन समितीने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी काही शिफारसी केल्या होत्या. त्याबाबत काही पर्याय देखील सुचवले होते. पण त्याचं पुढं काय झालं? त्या अहवालाबाबत कोणालाही माहिती नाही. मात्र, तेव्हाच प्रा.राधाकृष्णन समितीने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी संगणकाधारित परीक्षेचा मार्ग सुचवला होता. पण त्या शिफारसीने केलेल्या शिफारसी फक्त कागदावरच राहिल्या”, अशी खंतही महेश्वर पेरी यांनी व्यक्त केली.