NEET Paper Leak Case: नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणातील एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी यश यादव याला न्यायालयीन कोठडीत असताना अभ्यासासाठी पुस्तके उपलब्ध करून देण्यास विशेष न्यायालयाने परवानगी दिली आहे. आगामी २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेची तयारी करता यावी, यासाठी यशने न्यायालयाकडे पुस्तकांची मागणी केली होती. न्यायालयाने राज्यघटनेतील ‘कलम २१’ चा संर्दभ देत हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी २ जून रोजी झालेल्या सुनावणीत हा आदेश दिला. “आरोपीची पुढील शिक्षणाची इच्छा आणि राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत मिळालेला जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार लक्षात घेता, हा अर्ज मंजूर करण्यात येत आहे,” असे न्यायालयाने स्पष्ट केले.
…पण जेल प्रशासनाचे असणार कडक नियम!
न्यायालयाने यश यादवला अभ्यासाची परवानगी दिली असली, तरी त्यासाठी काही कडक अटी आणि शर्ती घातल्या आहेत:
- आरोपीला आधी कोणत्या पुस्तकांचा अभ्यास करायचा आहे, याची यादी द्यावी लागेल.
- ही पुस्तके त्याचे कुटुंबीय किंवा वकिलांमार्फत जेल प्रशासनाकडे सुपूर्द केली जातील. जेल मॅन्युअलनुसार या पुस्तकांची कसून तपासणी केली जाईल.
- तपासणीदरम्यान कोणतेही पुस्तक किंवा मजकूर आक्षेपार्ह किंवा सुरक्षेसाठी धोकादायक आढळल्यास, ते जप्त करण्याचे अधिकार प्रशासनाला असतील.
वकिलांचा युक्तिवाद काय होता?
यश यादवच्या वतीने वकील अंबिका यांनी न्यायालयात बाजू मांडली. “यश हा २० वर्षांचा तरुण असून तो उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. ३ मे रोजी झालेली ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्याने, त्याला आगामी फेरपरीक्षेची तयारी करायची आहे. तुरुंगातील वेळेचा सदुपयोग करून त्याला स्वतःचे भविष्य सुधारायचे आहे,” असा युक्तिवाद वकिलांनी केला.
भारतीय राज्यघटनेतील कलम २१ मध्ये काय आहे?
भारतीय राज्यघटनेतील कलम २१ हे प्रत्येक नागरिकाला ‘जीवनाचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा’ अधिकार देते. कायद्याच्या चौकटीशिवाय कोणत्याही व्यक्तीला या अधिकारापासून वंचित ठेवता येत नाही. न्यायालयाने याच मानवी हक्काचा विचार करत आरोपीला अभ्यासाची परवानगी दिली.
सीबीआयचा गंभीर आरोप; १० लाखांत विकला पेपर
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या दाव्यानुसार, यश यादव हा या संपूर्ण पेपर फुटीच्या रॅकेटमधील एक मुख्य दुवा आहे. यशला ‘टेलिग्राम’ ॲपद्वारे लीक झालेल्या प्रश्नपत्रिकेची पीडीएफ फाईल मिळाली होती. त्यानंतर त्याने ही प्रश्नपत्रिका तब्बल १० लाख रुपयांना इतर विद्यार्थ्यांना विकल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. या संपूर्ण रॅकेटमध्ये त्याचा सक्रिय सहभाग असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
एकीकडे पेपर फुटीच्या गंभीर आरोपांमुळे वैद्यकीय क्षेत्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असताना, दुसरीकडे मुख्य आरोपीलाच आता तुरुंगात ‘नीट’च्या फेरपरीक्षेची तयारी करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
