देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य आरोपी धनंजय लोखंडेने आता तिहार तुरुंगात अध्यात्माची वाट धरल्याचे समोर आले आहे. तुरुंगात वाचण्यासाठी रणजित देसाई लिखित छत्रपती शिवाजी महाराजांवरील ‘श्रीमान योगी’ ही कादंबरी, ‘हनुमान चालीसा’ आणि ‘मंगल स्तोत्र’ ही धार्मिक पुस्तके मिळावीत, अशी मागणी लोखंडेने न्यायालयाकडे केली होती. दिल्लीतील विशेष न्यायालयाने ही मागणी मान्य करत तुरुंग प्रशासनाला संबंधित पुस्तके उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भातील वृत्त ‘द प्रिंट’ या वृत्तसंस्थेने दिलं आहे.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (CBI) तपासात धनंजय लोखंडे हा महाराष्ट्र, हरियाणा आणि राजस्थानमधील पेपरफुटीच्या साखळीतील अत्यंत महत्त्वाचा दुवा असल्याचे समोर आले आहे. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.

न्यायालय काय म्हणाले?

आरोपी धनंजय लोखंडेचे वकील विक्रम सिंह यांनी दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी करताना विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी हे आदेश दिले. आरोपीच्या कुटुंबीयांनी किंवा वकिलांनी दिलेली ही पुस्तके, तुरुंग नियमावली आणि सुरक्षा तपासणीच्या अटी पूर्ण करून आरोपीला देण्यात यावीत, असे निर्देश कोर्टाने तिहार जेल प्रशासनाला दिले आहेत.

महाराष्ट्रातून हरियाणा अन् राजस्थान… असा फुटला NEET चा पेपर!

सीबीआयच्या आरोपपत्रानुसार, या संपूर्ण रॅकेटमध्ये धनंजय लोखंडेची भूमिका अत्यंत महत्त्वाची होती:

  • पुण्यातून पेपर गोळा केले: नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) तज्ज्ञ समितीतील व्यक्तींकडून पुण्यातील व्यावसायिक मनीषा वाघमारे हिने प्रश्नपत्रिका मिळवल्या होत्या. लोखंडेने आपल्या सहकाऱ्यांना पाठवून या प्रश्नपत्रिका ताब्यात घेतल्या.
  • साखळी पुढे कशी पसरली?: यानंतर धनंजय लोखंडेने हे पेपर नाशिकमधील आरोपी शुभम खैरनारच्या सहकाऱ्यांपर्यंत पोहोचवले. तेथून हे पेपर गुरुग्राममधील यश यादव आणि शेवटी राजस्थानच्या सीकर येथील बिवाल कुटुंबापर्यंत पोहोचवण्यात आले.

या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत १३ जणांना अटक करून त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामध्ये पेपर लीक करणाऱ्या तज्ज्ञ समितीतील पी. व्ही. कुलकर्णी, मनीषा हवालदार आणि मनीषा मांढरे या तिघांचाही समावेश आहे. पेपर फुटीच्या गुन्ह्यांसाठी स्थापन करण्यात आलेले हे विशेष न्यायालय या प्रकरणाची रोजच्या रोज सुनावणी करत आहे.

इतर आरोपींचा वेळकाढूपणा; कोर्टाने सुनावले..

दुसरीकडे, या प्रकरणातील इतर दोन आरोपी मनीषा मांढरे आणि मनीषा हवालदार यांनी सीबीआयच्या पुराव्यांची तपासणी करण्यासाठी अतिरिक्त वेळ मागणारा अर्ज कोर्टात दाखल केला होता. मात्र, न्यायालयाने तो थेट फेटाळून लावला.

सुनावणीदरम्यान सीबीआयच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले की, आरोपींना २४, २५, २७ आणि ३१ ऑगस्ट रोजी अनेक तास कागदपत्रांची पाहणी करण्याची संधी देण्यात आली होती. तरीही वकिलांनी ‘व्यस्त वेळापत्रकाचे’ कारण देत आणखी वेळ मागितला.

यावर तीव्र नाराजी व्यक्त करत विशेष न्यायाधीश अजय गुप्ता म्हणाले, “नवीन कायद्यानुसार या खटल्याची सुनावणी अत्यंत वेगाने आणि दररोज चालवणे बंधनकारक आहे. न्यायालयाचा प्रत्येक दिवस महत्त्वाचा आहे. त्यामुळे वकिलांनी दिलेल्या वेळेतच तपासणीचे काम पूर्ण करणे गरजेचे होते.” कोर्टाच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता या खटल्याच्या सुनावणीला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.