नीट पेपरफुटी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या यश यादवला दिल्ली न्यायालयाने पुन्हा परीक्षा देण्याची परवानगी दिली होती. मात्र, आता ‘राष्ट्रीय परीक्षा संस्थेने’ त्याचा निकाल राखून ठेवल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू असल्याने एनटीएने हा निर्णय घेतला आहे.
३ मे रोजी झालेली ‘नीट’ परीक्षा पेपरफुटीच्या वादामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली, जिचा निकाल गुरुवारी (१६ जुलै) जाहीर करण्यात आला. मात्र, या निकालात यश यादवच्या कामगिरीचे काय झाले, हे अद्याप गुलदस्त्यातच राहणार आहे.
कोण आहे यश यादव आणि काय आहेत आरोप?
उत्तराखंड आयुर्वेद विद्यापीठाचा विद्यार्थी असलेला २० वर्षीय यश यादव हा मूळचा गुरुग्रामचा रहिवासी आहे. त्याने स्वतः ३ मे रोजी ही परीक्षा दिली होती; मात्र १३ मे रोजी केंद्रीय अन्वेषण विभागाने त्याला अटक केली.
तपास यंत्रणांच्या दाव्यानुसार, यश यादवने टेलिग्राम या मेसेजिंग ॲपवरून पेपरफुटीच्या पीडीएफ फाईल्स मिळवल्या होत्या आणि त्यानंतर त्याने हा गोपनीय पेपर तब्बल १० लाख रुपयांना विकला होता. देशभरातील सुमारे २२.७ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लावणाऱ्या या मोठ्या रॅकेटमध्ये यश यादव हा पेपर वाटप करणारा मुख्य दुवा असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.
कोर्टाने दिली होती संधी; पण जामीन नाकारला
यश यादवने बहिणीचे लग्न आणि २१ जून रोजी होणारी नीटची पुनर्परीक्षा यांचे कारण देत अंतरिम जामिनासाठी कोर्टात धाव घेतली होती. १६ जून रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश डॉ. विशाल गोगने यांनी यावर एक महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले होते.
न्यायालयाने म्हटले होते की, “अर्जदारावर (यश यादव) अत्यंत गंभीर आरोप आहेत हे खरे आहे, परंतु केवळ आरोपांच्या आधारे विद्यार्थ्याचा परीक्षेला बसण्याचा हक्क हिरावून घेतला जाऊ शकत नाही. जामीन नाकारून त्याला परीक्षेची संधी न देणे ही एक प्रकारे आधीच शिक्षा दिल्यासारखे ठरेल. अंतिम पात्रता किंवा निवड ही संबंधित परीक्षा मंडळाच्या (NTA) नियमांच्या अधीन राहील.”
या आधारे न्यायालयाने त्याला २१ जूनच्या परीक्षेला बसण्याची परवानगी दिली. मात्र, तपास प्राथमिक टप्प्यावर असल्याने आणि इतर आरोपींचा शोध सुरू असल्याने न्यायालयाने त्याला अंतरिम जामीन देण्यास स्पष्ट नकार दिला.
पोलीस कोठडीतच दिली परीक्षा आणि लावली बहिणीच्या लग्नाला हजेरी
न्यायालयाच्या कडक सुरक्षेखाली यश यादवने २१ जून रोजी नीटची परीक्षा दिली. यानंतर, दुसऱ्याच दिवशी म्हणजेच २२ जून रोजी त्याने न्यायिक कोठडीत राहूनच, पोलीस देखरेखीखाली आपल्या बहिणीच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली होती.
मात्र, एवढे प्रयत्न करून परीक्षा देऊनही तपास यंत्रणांच्या कचाट्यात सापडल्याने अखेर ‘एनटीए’ने त्याचा निकाल थांबवला आहे. या प्रकरणातील अंतिम चौकशी पूर्ण झाल्यानंतरच त्याच्या निकालाबाबत पुढील निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
