NEET Paper Leak CBI Investigation Updates: वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘NEET-UG’ यंदा पेपरफुटीच्या गर्तेत सापडली आहे. ३ मे २०२६ रोजी परीक्षा पार पडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच पेपरफुटी उघडकीस आल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. यानंतर केंद्र सरकारने परीक्षा रद्द करून तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला. देशातील तब्बल २३ लाख विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षण क्षेत्राची विश्वासार्हता पणाला लावणारे हे ‘नीट’ (NEET-UG) पेपरफुटी प्रकरण.
एकीकडे एनटीएच्याच (NTA) पेपर सेटींग कमिटीतील सदस्यांचा पेपरफुटीत असलेला सहभाग आणि दुसरीकडे या भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळून प्रामाणिक विद्यार्थ्यांनी उचलेले टोकाचे पाऊल, अशा दुहेरी संकटात सध्या देशातील शिक्षण व्यवस्था सापडली आहे. नेमका पेपर कसा फुटला? फुटलेल्या पेपरचा प्रवास कसा झाला? या प्रकरणात पकडलेले आरोपी कोण आहेत? आणि आतापर्यंत सीबीआयच्या तपासात काय काय समोर आलं आहे? याचा हा सविस्तर आढावा…
पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला
CBI ने पु्ण्यातून ताब्यात घेतलेले पी. व्ही. कुलकर्णी आणि मनीषा मांढरे हे दोन्ही प्राध्यापक NTA च्या पेपर सेटिंग कमिटीचे सदस्य आहेत. प्रल्हाद कुलकर्णी हा केमिस्ट्री तर मनीषा मांढरे या बायोलॉजी चा पेपर सेट करत होत्या. या दोघांनी मिळून पेपर फोडला. जयपूरच्या प्रिंटिंग एजन्सीमधून लीक झालेला हा पेपर नाशिक आणि लातूर मार्गे देशभरात पसरला.
‘असा’ होता पेपरफुटीचा प्रवास
राजस्थानमधील जयपूर येथील एका प्रिंटिंग एजन्सीमधून प्रश्नपत्रिका लीक झाल्याचा प्राथमिक संशय आहे.परीक्षा होण्याच्या दोन दिवस आधी (१ आणि २ मे रोजी) सोशल मीडिया आणि व्हॉट्सॲपवर एक ‘गेस पेपर’ पीडीएफ (PDF) स्वरूपात फिरत होती. यामध्ये तब्बल ४१० प्रश्न होते, ज्यातील १४० पेक्षा जास्त प्रश्न थेट मुख्य परीक्षेशी तंतोतंत जुळणारे होते. हा पेपर मिळवण्यासाठी पालकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून २५,००० रुपयांपासून ते ४० लाख रुपयांपर्यंत मोठी रक्कम वसूल करण्यात आली होती. जयपूरमधून निघालेले हे धागेदोरे नाशिक आणि लातूर मार्गे देशभरात पसरले.या प्रकरणांमध्ये आतापर्यंत दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर मधून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. जयपूरच्या प्रिंटिंग एजन्सीमधून लीक झालेला हा पेपर नाशिक आणि लातूर मार्गे देशभरात पसरला.
आतापर्यंत महाराष्ट्रातील पाच जणांचा पेपर फुटीत सहभाग
नाशिकच्या शुभम खैरनार ने नीट चा पेपर फोडला. त्यानंतर धनंजय लोखंडे याने विद्यार्थ्यांना त्याची विक्री केली. या सगळ्यांमध्ये विद्यार्थ्यांना हेरण्याची जबाबदारी होती ती मनीषा वाघमारेची, थोडक्यात मनीषा या सगळ्या प्रकरणात एजंटचे काम करत होती. या सगळ्यांचा बॉस होता लातूरचा निवृत्त प्राध्यापक पी व्ही कुलकर्णी. हा कुलकर्णी पुण्यामध्ये कोचिंग क्लास च्या नावाने विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका पुरवत असे.
‘नीट’ पेपरफुटीचे महाराष्ट्र कनेक्शन आणि आरोपी
पी. व्ही. कुलकर्णी (लातूर) : नीट पेपरफुटी प्रकरणाचा मास्टरमाईंड, लातूरमधील केमिस्ट्रीचे माजी प्राध्यापक आणि खासगी कोचिंग सेंटरचे चालक कुलकर्णीला या घोटाळ्यातील महाराष्ट्रातील प्रमुख सुत्रधार मानले जात आहे. कुलकर्णी हा पुण्यातील आपल्या घरी निवडक विद्यार्थ्यांसाठी स्पेशल कोचिंग क्लास चालवायचा त्यात त्याने संभाव्य प्रश्न, त्याचे पर्याय आणि योग्य उत्तरे सांगितली होती. विद्यार्थ्यांना दिलेले प्रश्न आणि उत्तरे ३ मे रोजी आयोजित परीक्षेत तसेच्या तसे आले. कुलकर्णी याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून शुक्रवारी अटक केली. कुलकर्णी हा परीक्षा प्रक्रियेशी संबंधित होता. पेपरफुटी प्रकरणात तो सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
शुभम खैरनार (नाशिक): वय ३० वर्षे. जयपूरच्या प्रिंटिंग एजन्सीमधून थेट नाशिकच्या कोचिंग नेटवर्कशी संपर्क साधणारा आणि पेपर डिजिटल स्वरूपात पुढे पसरवणारा मुख्य आरोपी.
धनंजय लोखंडे (अहिल्यानगर): नीट पेपरफुटी प्रकरणाता हा एजंट म्हणून काम करत होता. विद्यार्थ्यांकडून पैसे गोळा करणे आणि पेपर पुरवणे यात सक्रिय सहभाग.
मनिषा वाघमारे (पुणे): ब्युटीपार्लरचालक मनीषा वाघमारेला पुणे परिसरातून या रॅकेटला मदत केल्याच्या आरोपावरून CBI ने १४ मे रोजी ताब्यात घेतले आहे.
मनीषा गुरुनाथ मांढरे (पुणे): पुण्यातील जीवशास्त्राच्या प्राध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) पुण्यातून अटक केली. मांढरे ही परीक्षा प्रक्रियेशी (एनटीए) संबंधित आहे. पेपरफुटी प्रकरणात ती सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर तिला अटक करण्यात आली, अशी माहिती सीबीआयने दिली. मनीषा मांढरे ही वरिष्ठ प्राध्यापिका आहे.
देशातील इतर आरोपी
मांगीलाल बिवल, विकास बिवल आणि दिनेश बिवल (जयपूर): राजस्थानमधील प्रश्नपत्रिका लीक करणाऱ्या आणि वितरीत करणाऱ्या टोळीचे मुख्य सदस्य.
यश यादव (गुरुग्राम, हरियाणा): दिल्ली-NCR परिसरात विद्यार्थ्यांना गोळा करून ‘सेफ हाऊस’मध्ये उत्तरे पाठ करून घेण्याच्या तयारीत असलेला मध्यस्थ.
बिहार आणि गुजरात कनेक्शन: यापूर्वी बिहारमधील सॉल्व्हर गँगचे १३ सदस्य आणि गुजरातच्या गोध्रा येथील एका परीक्षा केंद्रावरील उपसंचालक (शिक्षक) यांनाही विद्यार्थ्यांच्या ओएमआर (OMR) शीट बेकायदेशीरपणे भरून घेण्याच्या प्रयत्नात अटक करण्यात आली आहे.
नैराश्यातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या
घोटाळ्यामुळे परीक्षा रद्द करावी लागल्याने आणि वाढलेल्या मानसिक दबावामुळे देशभरातून अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही दिवसांत ४ हून अधिक परीक्षार्थींनी आपली जीवनयात्रा संपवली आहे.
प्रदीप माहीच (सिकर, राजस्थान): प्रदीप गेल्या ३ वर्षांपासून सिकरमध्ये राहून नीटची तयारी करत होता. ३ मे च्या परीक्षेत त्याला ६५० गुण मिळतील अशी खात्री होती आणि त्याला सरकारी कॉलेज मिळणार हे निश्चित होते. मात्र, पेपरफुटीमुळे परीक्षा रद्द झाल्याचा धक्का सहन न झाल्याने त्याने गळफास लावून आत्महत्या केली.
दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये २ घटना: दिल्लीच्या आझादपूर येथील २० वर्षीय विद्यार्थिनीने आणि उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी येथील २१ वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षा रद्द झाल्याच्या नैराश्यातून टोकाचे पाऊल उचलले.
‘CBI’ तपासात आतापर्यंत काय समोर आलं?
CBI ने या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS), भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा आणि ‘सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायदा, २०२४’ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत. CBI कडून राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा आणि बिहारमध्ये सातत्याने छापे सुरू आहेत. आतापर्यंत ९ मुख्य आरोपींना केंद्रीय यंत्रणेने अटक केली आहे. आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप आणि जप्त केलेले डिजिटल पुरावे फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले असून, या व्यवहारांमागे असलेल्या मोठ्या फायनान्सर्सचा (आर्थिक रसद पुरवणाऱ्यांचा) शोध घेतला जात आहे. शनिवारी सीबीआयने नांदेड मध्ये आठ तास झाडाझडती घेतली आहे. कुलकर्णी, वाघमारे यांची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवून त्यांना दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सीबीआयकडून देण्यात आली आहे. सोबतच लातूरमध्ये आरसीसी क्लासेसचे शिवराज मोटेगावकर यांच्या घरी सीबीआयनं छापा टाकल्यानंतर अजूनही चौकशी सुरु आहे.
