नवी दिल्ली : महिनाभराहून अधिकचा ठिय्या, बेमुदत उपोषण, संसदेवर मोर्चा, पोलिसांचे अत्याचार… इतका तीव्र संघर्ष करूनही जंतरमंतरवरून न हटणार्‍या युवाशक्तीच्या निर्धारापुढे अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वागालील ‘एनडीए’ सरकारला नमते घ्यावे लागले.

‘नीट’ परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. गेल्या १२ वर्षांत वादग्रस्त केंद्रीय मंत्र्याला पायउतार व्हावे लागण्याची ही पहिलीच वेळ. या आंदोलनाच्या निमित्ताने विरोधी पक्षाला मिळालेले बळ आणि रस्त्यापासून समाजमाध्यमांपर्यंत व्यवस्थेविरोधात उमटलेला संताप ही येत्या काळात केंद्र सरकारपुढील मोठी आव्हाने ठरणार आहेत.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधानांनी राजीनाम्याची घोषणा करताच जंतर-मंतरवर आनंदाची लाट उसळली. ‘भारत माता की जय’चा जयघोष करत तरुणवर्गाने जल्लोष केला. तरुणांबद्दलच्या एका टिप्पणीवरून समाजमाध्यमावर सुरू झालेल्या एका मोहिमेचे रूपांतर देशव्यापी निदर्शनांमध्ये झाले. त्या मोहिमेच्या केंद्रस्थानी असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचा (सीजेपी) संस्थापक अभिजीत दिपके याने ‘आज लोकशाही विजयी झाली’ असे म्हणत सर्व आंदोलकांचे अभिनंदन केले.

केंद्रीयमंत्री जे. पी. नड्डा व जितेंद्र सिंह यांनी शनिवारी विठ्ठलभाई पटेल हाऊसमध्ये सीजेपीचे प्रवक्ता सौरव दास व आशुतोष रंका यांच्याशी तिसर्‍यांदा चर्चा केली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत दास यांनी आंदोलन अधिकृतपणे संपल्याची घोषणा करत, देशभरातील आंदोलकांना शांततेत आंदोलनस्थळे रिकामी करण्याचे आवाहन केले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी पूर्ण झाली असून अन्य दोन मागण्यांही पूर्ण करण्याचे आश्वासन केंद्राने दिले असून मंगळवारपर्यंत लेखी उत्तरही देईल अशी माहिती दास यांनी दिली. केंद्रीय मंत्री नड्डा यांनीही या माहितीची पुष्टी करताना देशभरात आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले सर्व गुन्हे मागे घेतले जातील, अशी घोषणा केली. तसेच, नीट पेपरफुटीमुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीची रक्कमही लवकरच निश्चित केली जाईल, असेही नड्डा यांनी सांगितले. पुढील चार आठवड्यांनंतर केंद्र सरकारबरोबर पुन्हा बैठक होणार असून परीक्षा सुधारणांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला जाईल, असे दास यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची व्याप्ती वाढू लागल्याने आणि ते चिघळू लागल्यानंतर केंद्र सरकारने ‘सीजेपी’बरोबर चर्चा सुरू केली. दोहोंमध्ये शुक्रवारी झालेल्या चर्चेच्या दुसर्‍या फेरीमध्ये सीजेपीने केंद्रीयमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतीही तडजोड होणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. या मागणीबाबत २४ तासांमध्ये केंद्र सरकार प्रत्युत्तर देईल असे नड्डांनी स्पष्ट केले होते. शनिवारी सीजेपीने दिलेली मुदत संपण्याआधी काही तास प्रधान यांनी मंत्रीपदाचा राजीनाम्याची ‘एक्स’वरून घोषणा केली. त्याआधीच त्यांनी राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सुपूर्द केला होता. नैतिक जबाबदारी स्वीकारत प्रधान यांनी स्वत:हून राजीनामा दिल्याचे सांगितले जात होते. मात्र, राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेमध्ये (एनटीए) शुक्रवारी रात्री तातडीने धडाक्यात करण्यात आलेले प्रशासकीय बदल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे जेन झींना सलग दोन दिवस केले गेलेले आवाहन, परीक्षा यंत्रणेत आमूलाग्र सुधारणा करण्यासाठी मांडले जाणारे दुरुस्ती विधेयक अशा धडाधड निर्णयामुळे प्रधान यांच्यावर राजीनामा देण्याबाबत दबाव कमालीचा वाढला होता.

‘सुबह हो गई मामू’

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याचे वृत्त कळताच सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी, ह्य्कॉक्रोच वोन, डेमोक्रसी वोनह्ण असे म्हणत जल्लोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर उपहासात्मक टीका करत, ह्य्ह्णसुबह हो गई मामूह्णह्ण, अशी पोस्टही दिपके यांनी एक्सवर केली. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील प्रसिद्ध संवादाचा संदर्भ देत त्यांनी सरकारला विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्यास उशीर झाल्याची टीका केली.

एवढ्या कमी वयात अभिजीत एवढा मोठा संघर्ष उभा करेल, असे वाटले नव्हते. त्याला बर्‍याच प्रकारे हिणवले गेले. विदेशी पैशांवर आंदोलन करतोय, असेही काही संघटनांनी म्हटले. त्याचे वाईट वाटत होते. त्यामुळे आमच्या मनावर वेगळेच ओझे होते. आता आम्हाला बरे वाटते आहे. तो येईल तेव्हा त्याला कडकडून मिठी मारेन. – भगवानराव दिपके, अभिजीतचे वडील

तो केवळ २९ वर्षांचा आहे. पण त्याने केलेले काम पाहून मोठा अभिमान वाटतो. सरकारने तरुणांचे म्हणणे ऐकले ते बरे झाले. मधल्या काळात आम्ही सारे तणावात होतो. त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो. पण ते शक्य झाले नाही. तो कधी येतो असे झाले आहे. – अनिता दिपके, आई

मागण्या मान्य, सुधारणांवर विचार

’मंत्र्यांबरोबरच्या बैठकीनंतर सीजेपीने मागण्यांची सुधारित यादी जाहीर केली. अनेक मागण्या केंद्र सरकारने तत्त्वत: मान्य केल्या असल्या तरी त्याची लेखी हमी मिळणे आवश्यक आहे, असे सीजेपीचे म्हणणे आहे.

’‘सीजेपी’ने सरकारकडे पाच सूत्री परीक्षा सुधारणा आराखडा सादर केला असून त्यावर विचार करण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे. पुढील चार आठवड्यांत पुन्हा केंद्र सरकार व सीजेपी यांच्यात बैठक होणार आहे.

प्रल्हाद जोशी यांच्याकडे पदभार

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनी स्वीकारला आहे. प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण खात्याचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे.

कोणत्याही भारतीय विद्याथ्र्याचे भविष्य कायदेशीर गुंतागुंतीत अडकणार नाही याची काळजी घेणे आणि आपल्या मुलांना अभ्यासासाठी व करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करण्यास वाव देणे या उद्देशांनी पंतप्रधानांकडे राजीनामा सादर केला आहे. – धर्मेंद्र प्रधान