NEET पेपरफुटीच्या प्रकरणामुळे ३ मे रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली. ज्यामुळे देशभरातल्या २२ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. या प्रकरणी सीबीआय चौकशीही करण्यात आली तर या प्रकरणात आरोपींना अटकही करण्यात आली. दरम्यान या प्रकरणात आता नवे दावे समोर येत आहेत. दीपक पाटील या विद्यार्थ्याने नीटची परीक्षा दिली होती. त्याने आता व्हॉट्स अॅपचे काही स्क्रीन शॉट शेअर करत धक्कादायक दावे केले आहेत.

दीपक पाटील या विद्यार्थ्याने काय आरोप केलेत?

दीपक पाटील हा छत्रपती संभाजी नगरचा विद्यार्थी आहे. तो एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला आहे. त्याने हा दावा केला आहे की एक विद्यार्थी त्याच्या मागे बसला होता. त्याच्याकडे दोन A4 पेपर होते. ज्यात उत्तरं लिहिलेली होती. ही उत्तरं नीटच्या परीक्षेत आलेल्या प्रश्नांची होती. १८० प्रश्नांपैकी १६० प्रश्नांची उत्तरं ही त्याच्याकडे असलेल्या कागदांवरील उत्तरांशी जुळत होती आणि त्याच क्रमातही ते प्रश्न आले होते. हा काही योगायोग नव्हता असंही दीपक पाटीलने म्हटलं आहे. Republic ला दिलेल्या मुलाखतीत दीपक पाटील या विद्यार्थ्याने हा धक्कादायक दावा केला आहे.

ABVP protest in Nagpur over NEET UG paper leak | NTA cancels NEET 2026 exam | Students protest against paper leak in Maharashtra | Medical entrance exam scam investigation
नीट यूजी २०२६ परीक्षेतील गोंधळ आणि पेपरफुटीच्या आरोपांनंतर नागपुरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने आंदोलन करण्यात आले (छायाचित्र – AI Generated)

दीपक पाटीलने शेअर केले व्हॉट्स अॅपचे स्क्रीन शॉट

दीपक पाटीलने व्हॉट्स अॅप चॅटचे स्क्रीन शॉट शेअर केले आहेत. ज्यामध्ये पेपर फोडणारं रॅकेट कसं काम करतं ते दिसून येतं. एका विद्यार्थिनीने एका चॅटमध्ये हे म्हटलं आहे की तिच्या वडिलांच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने नीटचा पेपर हवा आहे का? अशी विचारणा केली होती. त्यासाठी तिने ५० हजार रुपये त्या माणासाला दिले होते. दुसऱ्या एका मेसेजमध्ये हे दिसून येतं आहे की ज्यांना पेपर दिला गेला त्यांच्याकडून परीक्षेच्या आधी प्रत्येकी ३० हजार आणि नंतर ७० हजार रुपये म्हणजेच एका पेपरच्या बदल्यात १ लाख रुपये एका विद्यार्थ्याकडून असा ‘रेट’ ठरवण्यात आला होता. राजस्थानमधल्या कोटा या ठिकाणाला कोचिंग हब म्हटलं जातं. या ठिकाणी फुटलेला पेपर मिळवण्यासाठी २४ लाख रुपये जमा करण्यात आले होते. स्क्रीन शॉट्समध्ये असंही दिसून येतं आहे की ज्यांनी पेपरफुटीसाठी पैसे दिले त्यांना प्रश्न काय येणार आणि त्याची उत्तरं काय आहेत? याची खात्री करुन घेतली आहे. तसंच बहुतांश विद्यार्थ्यांनी या परीक्षेची तयारी कशी करायची? प्रक्रिया कशी असते याचीही माहिती घेतली आहे. दीपक पाटील या विद्यार्थ्याने जे सत्य समोर आणलं आहे त्यामुळे पेपरफुटीचं रॅकेट कसं चाललं होतं या गोष्टी समोर आल्या आहेत. दरम्यान यामुळे देशभरात होणाऱ्या या मेडिकल एन्ट्रन्स परीक्षांबाबत काळजी व्यक्त होते आहे. या प्रकरणात २२ लाख विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे तसंच अनेक विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली जावी अशी मागणी केली आहे.

NEET UG 2026 Exam Cancelled| Why was NEET cancelled| NEET re-examination details
नीटची परीक्षा रद्द झाल्याने लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

नीटचा पेपर कसा फुटला?

प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार NEET 2026 चा पेपर राजस्थानला कसा पोहचला ते समोर आलं आहे. यश यादवकडून हा पेपर राजस्थानला पोहचला. यश यादव विकास बिवलला ओळखतो. विकास बिवलचे वडील दीनेश बिवल यांनी हा पेपर स्कॅन केला आणि त्याची पीडीएफ फाईल तयार केली. आरोपीने हे प्रश्न हाताने लिहिले आणि त्यानंतर ते पान स्कॅन केलं. सिकर या ठिकाणी NEET ची परीक्षा देणाऱ्यांना हे पेपर त्याने विकले अशीही माहिती समोर आली आहे. यश यादव हा आयुर्वेदिक मेडिकल सायन्सचा विद्यार्थी आहे. त्याला विद्यार्थ्यांनी या पेपरच्या बदल्यात २ ते ५ लाख रुपये दिले. दरम्यान शुभम खैरनारने आपण मुख्य आरोपी नाही असं म्हटलं आहे. या प्रकरणात पैशांचा व्यवहार कसा झाला आणि पेपर कसा लिक झाला याची चौकशी सीबीआयकडून सुरु आहे. ANI ने हे वृत्त दिलं आहे.

शुभम खैरनारचं कनेक्शन काय?

वैद्यकीय शिक्षण पूर्ण न करता स्वतःला डॉक्टर म्हणवून घेणाऱ्या नाशिकमधील शुभम खैरनारला नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झाली. मध्य नाशिकच्या एका व्यावसायिक संकुलात खैरनारने स्वतःचे कार्यालय थाटले होते. या भागातून दररोज वैद्यकीय शिक्षण घेणारे हजारो विद्यार्थी ये-जा करत असतात. कुणी पुस्तके घेण्यासाठी, शिकवणी घेण्यासाठी आणि नीटची तयारी करणाऱ्या अनेकांची इथे वर्दळ असते. याच भागात कार्यालय उघडून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणाऱ्या खैरनारने पेपरफुटी प्रकरणात लाखो रुपये कमवल्याचा आरोप होत आहे. २७ वर्षीय शुभम खैरनारने नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका १० लाख रुपयांत विकत घेऊन ती १५ लाख रुपयांना विकल्याचा आरोप आहे. कुरिअरद्वारे नाशिकपासून ते राजस्थानपर्यंत प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात आले. राजस्थानमधील सीबीआय पथकाने नाशिक पोलिसांना खैरनारच्या सहभागाची माहिती दिल्यानंतर त्याची अटक करण्यात आली.

सिकरमध्ये पेपर फुटला होता आणि…

राजस्थान स्पेशल ऑपरेशन ग्रुपने प्रति कोटा म्हणून ओळख निर्माण झालेल्या सिकर शहरात १२ मे रोजी तपास केला. सिकर मध्ये नीट क्लासेस मोठ्या संख्येने आहेत. दरम्यान, राजस्थानमधील शेखावती येथे पेईंग गेस्ट सुविधा चालवणाऱ्या एका व्यक्तीला केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या त्याच्या मुलीने पेपर शेअर केला होता. त्यानंतर शेखावतीतील त्या व्यक्तीने इतरांना तो पेपर पुढे पाठवला. परीक्षा होण्याच्या काही दिवस आधी हा पेपर त्या व्यक्तीला मिळाला होता. स्पेशल ऑपरेशन ग्रुप या प्रकरणाचा तपास करत आहे. स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे (एसओजी) महासंचालक अजय पाल लांबा यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, १५० हून अधिक उमेदवार, त्यांचे मित्र आणि पालक यांची चौकशी करण्यात आली आहे. एसओजीने सीबीआयकडे ज्यांना पेपर मिळाला त्या १५० विद्यार्थी व ७० पालकांची नावे असलेली यादी सोपवली आहे. तसेच काही संशयितांना सीबीआयकडे सोपवल्याचे लांबा म्हणाले.