नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या गुरुवारीही विरोधी पक्षांनी नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या मुद्द्यावरून लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. या मुद्द्यावर विरोधकांनी केलेली निदर्शने आणि घोषणाबाजी यामुळे सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. अखेर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे पीठासीन अधिकारी हरिवंश सिंह यांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब केले. त्यामुळे सलग चौथ्या दिवशी दोन्हींपैकी एकाही सभागृहामध्ये कोणतेही कामकाज होऊ शकले नाही.
“विरोधी पक्ष पूर्वअटी घालून नीट प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी चर्चा टाळत आहेत,” असा आरोप संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी केला. गुरुवारी दोन्ही सभागृहांचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी उपस्थित केली. त्यावर, रिजिजू यांनी लोकसभेत सांगितले की, प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी चर्चेदरम्यान केंद्र सरकार या प्रश्नावर सर्व मुद्दे मांडेल. दुसरीकडे, पोलिसांनी सोमवारी निदर्शकांवर केलेल्या लाठीमाराच्या मुद्द्यावरही चर्चा केली जावी, यासाठी विरोधी पक्ष आग्रही आहे. विरोधी पक्षांनी राज्यसभेत नियम २६७अंतर्गत चर्चा व्हावी यासाठी नोटीसही दिली होती.
राज्यसभेत विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी देशभरात विद्यार्थ्यांवर झालेल्या अन्यायासंबंधी एक पत्र वाचून दाखवायला सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षांनी जोरदार निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू संतापले. खरगे आणि विरोधी पक्षांचे अन्य खासदार हे सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत आहेत, असे त्यांनी सभागृहाचे पीठासीन अधिकारी हरिवंश सिंह यांना सांगितले.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी व समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वतंत्रपणे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली.
लोकसभेत गुरुवारी सर्वोच्च न्यायालय (न्यायाधीशांची संख्या) दुरुस्ती विधेयक, २०२६ मांडले जाणार होते. त्यावर गुरुवारीच चर्चा होऊन ते मंजूर होणे अपेक्षित होते. त्याबरोबरच सौगत रे, एन.के. प्रेमचंद्रन आणि ॲड. डीन कुरियाकोसे या विरोधी पक्षांच्या खासदारांनी वैधानिक ठराव मांडले आहेत. त्यावरही चर्चा होणार होती. त्याशिवाय लोकलेखा समितीकडून (पीएसी) काही महत्त्वाचे अहवाल सभागृहाच्या पटलावर मांडले जाणार होते.
पंतप्रधानांनी जबाबदारी स्वीकारावी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मंगळावर जाण्याचे श्रेय घेतात तर आता त्यांनी त्यांच्या कृत्यांची जबाबदारी घेण्याची वेळ आली आहे, अशी टीका काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी केली. संसद भवनाच्या संकुलात पत्रकारांशी बोलताना प्रियंका म्हणाल्या की, “आपल्याला मुलांची किती काळजी आहे याबद्दल पंतप्रधान समाजमाध्यमांवर लिहितात आणि काल रात्रीच त्यांनी मुलांवर अश्रुधूर सोडण्याचे आणि त्यांना मारहाण करण्याचे आदेश दिले.”
