नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये विद्यार्थी-तरुण आंदोलकांना पोलीस व निमलष्करी दलांच्या जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटले. लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी निदर्शने केली. दुसर्या बाजूला, आंदोलकांनी मागे हटण्यास नकार देत जंतर-मंतरवर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून आंदोलनस्थळी तरुणाची गर्दी वाढू लागली आहे. आंदोलक आणि विरोधक यांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले.
नीटच्या परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महिनाभर करूनही केंद्र सरकारने दखल घेतली नव्हती. मात्र, जेन झी आंदोलकांचा मोर्चा संसदेपर्यंत पोहोचल्यामुळे आणि पोलिसांच्या मारहाणीत अनेक तरुण-तरुणी जखमी झाल्यानंतर, मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ‘एनडीए’च्या खासदारांच्या बैठकीमध्ये नरमाईची भूमिका घ्यावी लागली. आपल्याला तरुण पिढीचा विश्वास मिळवायला हवा, त्यांच्याबाबतीत काहीही वाईट होऊ देणार नाही, त्यांच्यावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. तरुणांपर्यंत पोहोचा, त्यांच्याशी संवाद साधा, अशी सूचना मोदींनी एनडीएच्या खासदारांना केली. नीट प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा केली जाईल, असे आश्वासनही मोदींनी दिले.
मोदींनी माफी मागावी : राहुल गांधी
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांच्या सदस्यांनी लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेऊन पोलिसांनी आंदोलकांना केलेली निर्दयी मारहाण निंदनीय असून याप्रकरणी सभागृहात चर्चा झाली पाहिजे, अशी लेखी विनंती केली. आंदोलकांवर अन्याय होऊ देणार नाही.
विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर संसदेत आणि संसदेबाहेरदेखील आवाज उठवला जाईल, असे राहुल गांधी म्हणाले. पोलिसांनी केलेल्या हिंसाचाराच्या या प्रकरणावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहात स्पष्टीकरण देण्याची मागणीही काँग्रेसने केली. ह्य्काल जे घडले, त्याबद्दल मोदींनी माफी मागितलेली नाही. शिक्षण आणि परीक्षा पद्धतीविरोधात तरुण आंदोलन करत आहेत. शिक्षण आणि परीक्षा पद्धतीला वाळवी लागली आहे, हे संपूर्ण देशाला माहीत आहे. पंतप्रधान गप्प का आहेत? त्यांनी विद्यार्थ्यांची माफी मागावी आणि विद्यार्थ्यांना मारहाण करण्याचा हा प्रकार थांबवावा, अशी टीका राहुल गांधींनी केली.
भाजप कार्यकर्त्याला पोलिसांची मारहाण
नागपूर : ‘मी अनेक वर्षे भाजपचा कार्यकर्ता होतो; मात्र विद्यार्थी, बेरोजगार आणि सामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे सरकारच्या उदासीनतेमुळे आंदोलनाची वाट निवडली. आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकारही सरकारला मान्य नसेल तर ‘काठ्या मारण्यापेक्षा गोळीच घाला’ अशी संतप्त प्रतिक्रिया दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी झालेल्या नागपूरच्या भारत बानाईत यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली. ‘लोकशाहीच संपली असेल तर आमच्यासारख्या तरुणांना जगण्याचा अधिकारच उरत नाही,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.
