NEET पेपरफुटी प्रकरणी दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाने आता अधिक तीव्र रूप धारण केले आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांची तब्येत खालावल्याने पोलिसांनी शनिवारी त्यांना जबरदस्तीनं सफदरजंग रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, रुग्णालयातूनच वांगचुक यांनी आपली भूमिका अधिक ठाम करत २३ व्या दिवशीही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
CJP आंदोलकांच्या प्रमुख ३ मागण्या काय आहेत?
- केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा: NEET पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने पद सोडावे.
- सोनम वांगचुक यांची तात्काळ सुटका: सफदरजंग रुग्णालयातून सोनम वांगचुक यांची सन्मानपूर्वक सुटका करण्यात यावी.
- बाधित कुटुंबांना आर्थिक भरपाई: NEET पेपर लीकच्या तणावामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी १ कोटी रुपयांची भरपाई द्यावी.
दरम्यान, वांगचुक यांना रुग्णालयात हलवल्यानंतर सीजेपीचे (CJP) संस्थापक अभिजित दीपके यांनीही उपोषण सुरू केले होते. मात्र, “मोर्चा आणि आंदोलनासाठी ताकदीची गरज आहे,” असा संदेश वांगचुक यांनी पाठवल्यानंतर दीपके यांनी आपले उपोषण मागे घेतले आणि संसदेच्या दिशेने जाणाऱ्या मोर्चाचे नेतृत्व केले.
सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश
“अनेक प्रकारच्या चिथावणीनंतरही युवा आंदोलकांनी ज्या संयमाने आणि शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे, त्याने माझे मन हेलावून गेले आहे. मी सरकार आणि पोलीस प्रशासनाला नम्र आवाहन करतो की, या तरुण विद्यार्थ्यांचे म्हणणे संसदेतील लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचू द्यावे. हा प्रश्न केवळ संवादाने सहज सुटू शकतो.”
“भाजप सरकार देशातील तरुणांवर तुटून पडतंय” – राहुल गांधींचा हल्लाबोल
दिल्लीतील या ऐतिहासिक आंदोलनाचे पडसाद संसदेपासून सोशल मीडियापर्यंत उमटले आहेत. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वर लिहीत राहुल गांधी म्हणाले:
“पंतप्रधान मोदी हे भारताच्या इतिहासातील तरुणांविषयी सर्वात उदासीन पंतप्रधान आहेत. देशात तब्बल १५२ पेपर लीक झाले, ७.५ कोटी विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले, पण एकाही मुख्य दोषीला शिक्षा झाली नाही. शिक्षा कोणाला मिळाली? तर रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या सामान्य तरुणांना!
जेव्हा ही मुले आपल्या हक्काच्या शिक्षणाबद्दल रास्त प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांना लाठ्या आणि अटकेचे उत्तर दिले जाते. पेपर लीक करणारे गुन्हेगार उघड्यावर फिरत आहेत आणि हक्कासाठी आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांना फरफटत नेऊन मारले जात आहे. हे सरकार फक्त अपयशी ठरलेले नाही, तर ते देशातील तरुणांवर तुटून पडत आहे.”
