२० जुलै रोजी नीट पेपरफुटीविरोधात दिल्लीत आंदोलन करण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. या आंदोलनात झालेल्या पोलीस कारवाईनंतर विद्यार्थ्यांचा संताप आता देशभरात पसरला आहे. मुंबई, बिहार, हरियाणा, तामिळनाडू, केरळ अशा अनेक राज्यांमध्ये विद्यार्थ्यांनी नीट पेपरफुटीविरोधात आंदोलन केले आहे. याबद्दल सविस्तर वृत्त द इंडियन एक्सप्रेसने दिले आहे.

मुंबईत १५० हून अधिक जण ताब्यात

मुंबई पोलिसांनी १५० अधिक आंदोलकांना ताब्यात घेतले असून प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल केल्या आहेत. त्यामुळे या आंदोलनाशी संबंधित एकूण प्रकरणांची संख्या १७ वर पोहोचली आहे. शिवाजी पार्कऐवजी यावेळी मानखुर्द, दारूखाना आणि मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये लहान गटांमध्ये आंदोलन करण्यात आले. “जिथे जिथे निदर्शने सुरू झाली, तिथे तिथे पोलिसांनी सहभागी झालेल्यांना ताब्यात घेतले”, असे ‘मुंबई अगेन्स्ट सप्रेसर ऑफ स्टुडंट्स’ या गटाच्या एका सदस्याने सांगितले.

बिहारमध्ये दगडफेक, लाठीचार्ज

बिहारमधील कटिहार, दरभंगा आणि बेगुसराय येथे हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांमधील अनियमिततेविरोधात मोर्चे काढले. कटिहारमध्ये दगडफेक झाली, तर बेगुसरायमध्ये पोलिसांनी लाठीचार्ज केला. दरभंग्यातील झटापटीत काही पोलीस कर्मचारी जखमी झाले असून चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली. “परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली आहे. चार ते पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे”, असे दरभंगाचे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी पत्रकारांना सांगितले.

“हा सीजेपी किंवा बीजेपीचा मुद्दा नाही”

गुवाहाटीमध्येही शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. गुवाहाटीमध्ये शिक्षण घेत असलेली अरुणाचल प्रदेशातील विद्यार्थिनी बालो यामा म्हणाली, “प्रत्येकालाच न्याय हवा आहे. माझ्या चुलत भावाने यावर्षी नीटची परीक्षा दिली होती आणि पेपरफुटीसारख्या गोष्टीचा सामना करणे विद्यार्थ्यांसाठी किती कठीण असते, हे मी पाहिले आहे. हा सीजेपी किंवा बीजेपीचा मुद्दा नाही. हा विद्यार्थ्यांच्या हक्कांचा प्रश्न आहे”.

हरियाणा, तामिळनाडू आणि केरळमध्येही आंदोलन

हरियाणातील कुरुक्षेत्र विद्यापीठ आणि जिंद येथील चौधरी रणबीर सिंग विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केंद्र सरकारविरोधात मोर्चे काढले आणि घोषणाबाजी केली. जिंदमध्ये ‘जिंद बार असोसिएशन’च्या आवाहनानुसार वकिलांनी कामकाज बंद ठेवले, तर हिसार बार असोसिएशननेही न्यायालयीन कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सोमवारी दिल्लीत झालेल्या पोलीस कारवाईदरम्यान विद्यार्थ्यांवर अतिरिक्त बळाचा वापर करण्यात आला आणि विद्यार्थिनींशीही गैरवर्तन करण्यात आले, असा आरोप वकिलांनी केला.

तामिळनाडूमध्ये नीट परीक्षा पूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीसाठी चेन्नई, मदुराई आणि इरोड येथे आंदोलन करण्यात आले. एसएफआय आणि डीवायएफआयच्या सदस्यांनी मदुराईमध्ये रेल्वे मार्ग रोखला. तिरुपरनकुंद्रम येथे एक ट्रेन आंदोलकांनी अडवली. त्यामुळे रेल्वे रुळांवर पोलीस आणि आंदोलक विद्यार्थी यांच्यात तणावपूर्ण झटापट झाली आणि एकमेकांना धक्काबुक्की करण्यात आली.

टीव्ही वाहिन्यांवर आलेल्या वृत्तांनुसार तमिळ चित्रपट निर्माते रंजित, वेत्रीमारन आणि अमीर यांनी एग्मोर येथे नीट परीक्षेतील गोंधळाविरोधातल्या निदर्शनाचे नेतृत्व केले. तसेच केरळमध्येही एसएफआयने तिरुअनंतपुरम, पलक्कड, कोझिकोड, कोट्टायम, कोची, त्रिशूर आणि ही एसएफआयच्या नेतृत्वाखली अनेक शहरांमध्ये निदर्शने झाली. आंदोलकांवर पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला.