पीटीआय, नवी दिल्ली : प्रामुख्याने तरुणांचा भरणा असलेल्या या आंदोलनात शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. १७ वर्षांची अंशिका ही मुलगी शाळेत जाते, असे सांगून संसदेत जाणाऱ्या मोर्चासाठी जंतर-मंतरला पोहोचली. तिने बॅरिकेड्स ओलांडण्यासाठी त्यावर चढण्याचाही प्रयत्न केला. पण महिला पोलिसांनी तिला खाली ओढले. आम्हाला गुन्हेगारांसारखे ताब्यात घ्यावे यासाठी आम्ही पालकांशी खोटे बोललो नाहीत, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत अंशिकाने पत्रकारांना हातावरच्या जखमा दाखवल्या.
“निवडणुका आल्या की ते मत मागायला आमच्या घरी येतात. पण नीटचा पेपर फुटल्यावर ते चर्चा करण्यासाठी आलेसुद्धा नाहीत,” अशी भावना अंशिकाने व्यक्त केली. अंशिकाबरोबरच विविध वयोगटातील महिला देशाच्या कानाकोपऱ्यातून आल्या होत्या. त्या सर्वांमध्ये संतापाची भावना स्पष्टपणे जाणवत होती. त्यात महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या महिलांचा समावेश होता. त्यातील २७ वर्षीय पूर्वाने सांगितले की, “आम्ही रात्री पुण्याहून बसने आलो. आम्ही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून एकमेकींच्या संपर्कात राहिलो आणि दिल्लीत आल्यावर भेटू असे ठरवले.”
महाराष्ट्रातून आलेल्या एका निदर्शकाने सांगितले की, तो केवळ निदर्शनांमध्ये सहभागी होण्यासाठी दिल्लीत आला आहे. देशाच्या विकासासाठी शिक्षण हा पाया आहे, अशी भावना त्याने व्यक्त केली. दर्जेदार शिक्षण मिळाले नाही तर व्यवस्था ढासळेल असे तो म्हणाला. तर सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणारा एक उमेदवार बिहारमधून आला होता. अनेक तरुण स्पर्धा परीक्षांसाठी अनेक वर्षे खर्च करतात आणि त्यांना पारदर्शक व उत्तरदायी व्यवस्था मिळाली पाहिजे, अशी मागणी त्याने केली. आंदोलकांमध्ये दिल्लीकरांचा सहभाग होताच. पण त्याचबरोबर मुंबई आणि अहमदाबादमधूनही अनेकजण आले होते.
‘जय भीम’च्या घोषणा
संसदेवरील मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी सोमवारी सकाळी सर्व थरांतील आणि वयोगटातीलही नागरिक जंतर-मंतरकडे जमा होत होते. हातात विविध संदेश लिहिलेले फलक आणि तिरंगा घेतलेले निदर्शक ‘भारत माता की जय’, ‘जय भीम’, ‘वंदे मातरम’ आणि ‘धर्मेंद्र प्रधान इस्तिफा दो’, अशा घोषणा देत होते. निदर्शकांना थांबवल्यावर ते तिथेच ठिय्या देऊन बसत होते. शहराच्या विविध ठिकाणी असे चित्र दिसत होते.
निदर्शकांमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शालेय मुले, पालक आणि ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश होता. त्यापैकी काहीजण गणवेष परिधान करून आले होते. काहींच्या अंगावर झुरळाचे वेश होते. संसद परिसरापासून दोन किमी अंतरावर नीती आयोग भवनाजवळील ‘नॅशनल एज्युकेशन इन्स्टिट्यूट फॉर ट्रायबल अफेअर्स’च्या इमारतीजवळ ‘जय भीम’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
त्याशिवाय अन्यत्रही अनेक आंदोलकांच्या हातात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा, पुस्तके होती. काही जणांच्या हातात महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचीही प्रतिमा होती. शीघ्र कृती दल (आरएएफ) आणि दिल्ली पोलिसांनी निदर्शकांच्या मार्गात अडथळे उभे केले, पण निदर्शक हटायला तयार नव्हते.
दिपके अंगमो जोड
दिपके आणि अंगमो यांना ताब्यात घेतलेले नाही, असा खुलासा दिल्ली पोलिसांनी केला असला तरी, त्या दोघांना जवळच्या केरळ हाऊस येथे नेण्यात आले, त्यानंतर त्यांनी तिथे धरणे आंदोलन सुरू ठेवले असे सांगण्यात आले.
डावे जोड
संसदेजवळील संसद मार्ग येथे आपचे नेते आतिशी आणि मनीष सिसोदिया, माकपचे एम. ए. बेबी, वृंदा करात तसेच समाजवादी पक्षाच्या डिंपल यादव मोर्चात सहभागी झाले.
