NEET PG 2024 Exam Supreme Court : नीट पीजी परीक्षा ही येत्या रविवारीच (११ ऑगस्ट) घ्यावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. ही परीक्षा स्थगित करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड म्हणाले, आपण आत्ता नीट पीजी परीक्षा स्थगित करू शकत नाही. यावेळी वरिष्ठ विधीज्ञ संजय हेगडे म्हणाले, हल्ली काही लोक केवळ परीक्षा स्थगित करण्याची मागणी करत असतात. यावेळी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे. NBEMS ११ ऑगस्ट २०२४ (रविवारी) रोजी देशातील १७० शहरांमधील ४१६ परीक्षा केंद्रांवर नीट पीजी परीक्षा आयोजित करेल. ही परीक्षा दोन टप्प्यांमध्ये घेतली जाईल. या वर्षी २,२८,५४२ विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. नीट पीजी परीक्षेला बसलेले उमेदवार NBEMS च्या अधिकृत संकेतस्थळावरून त्यांचं प्रवेशपत्र डाऊनलोड करू शकतात. सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी प्रकरणी आज निकाल दिला. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात न्यायमूर्ती जे. बी. पारदीवाला व न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांचाही समावेश होता. या खंडपीठाने म्हटलं आहे की "नीट परीक्षा अगदी तोंडावर असताना ती पुढे ढकलण्याचा आदेश देता येणार नाही." विशाल सोरेन नावाच्या एका विद्यार्थ्याने ही याचिका दाखल केली होती. यामध्ये याचिकाकर्त्याने म्हटलं होतं की परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. हे ही वाचा >> SC on Mumbai College Hijab Ban: मुंबईतील महाविद्यालयाच्या हिजाब बंदीला स्थगिती; ‘टिळा, टिकलीला परवानगी का?’, सर्वोच्च न्यायालयाचा प्रश्न सरन्यायाधीश काय म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने नीट पीजी प्रकरणी सुनावणी पूर्ण करताना म्हटलं आहे की "हल्ली लोक केवळ परीक्षा स्थगित करण्याची मागणी करतात. परंतु, ५ याचिकाकर्त्यांच्या मागणीनुसार आम्ही २ लाख उमेदवारांच्या भविष्याशी खेळू शकत नाही. विद्यार्थ्यांनी परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षेच्या दोन दिवस आधी आम्ही ही परीक्षा स्थगित करून त्यांच्यासमोर नव्या अडचणी निर्माण करू इच्छित नाही. असं केल्याने त्यांचं मोठं नुकसान होईल. त्यामुळे ही परीक्षा नियोजित वेळेत घेतली जावी." हे ही वाचा >> Sunita Williams : अंतराळ स्थानकात अडकलेल्या सुनीता विल्यम्स पृथ्वीवर कधी परतणार? NASA चं धक्कादायक उत्तर नीटी पीजी परीक्षा ११ ऑगस्ट रोजीच होणार नीट पीजी परीक्षा या वर्षी २३ जून रोजी घेतली जाणार होती. यूजीसी नेट व नीट पीजी परीक्षेतील अनियमिततेमुळे नीट पीजी परीक्षा स्थगित केली होती. त्यानंतर ही परीक्षा ११ ऑगस्ट रोजी घेतली जाईल असं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र आता न्यायालयाने ही परीक्षा पुढे ढकलू नये असं स्पष्टपणे सांगितलं आहे. परीक्षा ठरलेल्या दिवशी व नियोजित वेळेत घेतली जाणार आहे.