पीटाआय, नवी दिल्ली : ‘नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस’द्वारे (एनबीईएमएस) देशभरात रविवारी घेण्यात आलेली ‘नीट-पीजी २०२६’ परीक्षा २.६३ लाख हून अधिक उमेदवारांसाठी यशस्वीपणे पार पडली. मात्र, राजस्थानमधील जयपूर येथील दोन परीक्षा केंद्रांवर अंतर्गत वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे २,४४५ उमेदवारांची परीक्षा पूर्ण होऊ शकली नाही. या बाधित उमेदवारांसाठी ‘एनबीईएमएस’ने ५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता फेरपरीक्षेचे आयोजन केले आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील जयपूरच्या सीतापुरा येथील ‘आयऑन डिजिटल झोन’ (आयडीझेड- केंद्र क्रमांक ४१६८२ आणि ४१६८३) या दोन केंद्रांवर तांत्रिक भागीदार आणि परीक्षा घेणारी एजन्सी असलेल्या ‘टीसीएस लिमिटेड’च्या अंतर्गत वीज पुरवठ्यातील त्रुटींमुळे हा प्रकार घडला. या घटनेची दखल घेत एनबीईएमएसने संबंधित एजन्सीवर कारवाई करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. बाधित उमेदवारांसाठी पुनरपरीक्षेचे ठिकाण आणि नवीन प्रवेशपत्रे स्वतंत्रपणे जारी केली जातील.

अकराशेहून अधिक केंद्रांवर यशस्वी आयोजन

या वर्षी देशभरातील ३३९ शहरांमधील १,१११ केंद्रांवर २,७३,०९६ उमेदवारांसाठी नीट-पीजी परीक्षेचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी २,६५,९८० उमेदवार उपस्थित होते आणि सुमारे २,६३,५३५ उमेदवारांची परीक्षा पूर्णपणे सुरळीत पार पडली.

परीक्षेसाठीचे नियोजन

’परीक्षा पारदर्शक आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी ७०० हून अधिक भरारी पथक तैनात करण्यात आले
’देशभरात १६ प्रादेशिक कमांड सेंटर्स कार्यान्वित करण्यात आले
’नवी दिल्लीतील द्वारका येथील मुख्यालयातील कमांड सेंटरवरून थेट सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवण्यात आले
’डमी उमेदवार रोखण्यासाठी परीक्षा केंद्रांवर आधार आधारित बायोमेट्रिक पडताळणी

नवी दिल्लीत रविवारी वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीची ‘नीट-पीजी २०२६’ परीक्षा देऊन केंद्राबाहेर पडताना परीक्षार्थी.