NEET PG Aspirant Parents Missing Nepal Floods : नेपाळमध्ये महाभयंकर प्रलय आल्याने हजारो लोक बेपत्ता आहेत. आतापर्यंत ९५० जणांचे मृतदेह सापडले असून साडेचार हजार नागरिकांना शोधण्याची मोहिम सुरू आहे. या प्रलयात अनेक भारतीय नागरिकही अडकले असून त्यांच्याशी अद्याप काहीही संपर्क होऊ शकलेला नाही. दरम्यान, भारतातील तन्वी या नीटपीजीची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थीनीने अत्यंत हृदयद्रावक कहाणी शेअर केली आहे. तिने सोशल मीडियावर यासंदर्भात व्हिडिओ शेअर केला आहे.

३० ऑगस्ट रोजी भारतात नीट पीजीची परीक्षा पार पडली. मात्र, हा दिवस तन्वीच्या आयुष्यातील अत्यंत खडतर आणि आव्हानात्मक दिवस होता. कारण, तिचे आई-वडिल ६७ जणांच्या ग्रुपबरोबर कैलास यात्रेला गेले होते. मात्र, नेपाळ पुरामुळे त्यांच्याशी काहीच संपर्क करता येत नव्हता. असं असूनही तन्वी परीक्षा केंद्रावर गेली आणि परीक्षेला बसली. नंतर तिने इंस्टाग्रामवर एका भावनिक व्हिडिओमध्ये त्या तीन तासांबद्दल सांगितलं. तिने सांगितले की, परीक्षेचा निम्मा वेळ तिने रडण्यातच घालवला.

“परीक्षेच्या तीन तासांपैकी दीड तास मी फक्त रडत होते”, असं तन्वी म्हणाली. डोळ्यांतील अश्रूंमुळे तिला प्रश्न वाचणंही कठीण झालं होतं. पण ती थांबली नाही. तिच्या मनात एकच विचार होता की, तिच्या वडिलांची ती परीक्षा द्यावी अशीच इच्छा असणार. तिने पुढे प्रश्नपत्रिकेवरील तिचा फोटो पाहिला. हा फोटो पाहून ती अधिक भावूक झाली. कारण हा फोटो तिच्या वडिलांनी काढला होता. याबाबत ती म्हणाली, “प्रवेशपत्रावरील तो फोटो…सर्वात कठीण क्षणांपैकी एक क्षण तो होता, जेव्हा मी परीक्षेच्या स्क्रीनवर स्वतःचा फोटो पाहिला. तो माझ्या प्रवेशपत्रावरील फोटो होता, जो माझ्या वडिलांनी काढला होता.”

तन्वीने सांगितलं की ती स्वतःला सारखी समजावत होती की तिच्या वडिलांना तिने ही परीक्षा द्यावी असंच वाटत होतं. “मला फक्त इतकंच माहीत होतं की माझ्या वडिलांची इच्छा आहे की मी ही परीक्षा द्यावी आणि मला ती त्यांच्यासाठी, माझ्या आई-वडिलांसाठी द्यायचीच आहे”, ती म्हणाली. त्यामुळे ती तिथेच थांबली आणि तिने पेपर पूर्ण केला.

‘माझी आई मला नेहमी दही-साखर भरवायची’

कोणत्याही महत्त्वाच्या कामाला किंवा परीक्षेला जाताना दही साखर देण्याची पद्धत आहे. हे तन्वीला सारखं आठवत होतं. कारण, तिची आईही कोणत्याही परीक्षेला जाताना तिला दही साखर देत असे. तन्वी म्हणाली, “परीक्षेपेक्षाही सर्वात कठीण गोष्ट ही होती की, परीक्षेपूर्वी माझी आई मला नेहमी दही-साखर द्यायची.”

व्हिडिओमध्ये आई-वडिलांबद्दल बोलताना ती अत्यंत भावूक झाली होती आणि ते सुखरूप घरी परततील, अशी आशा तिने वारंवार व्यक्त केली. “त्यांना यावंच लागेल”, असं ती म्हणाली. तन्वीच्या आधीच्या सोशल मीडिया पोस्टनुसार, तिचे आई-वडील व्यंकटराम अन्नमदेवरा आणि अनघा अन्नमदेवरा हे ६७ सदस्यांच्या एका ग्रुपसह कैलास यात्रेवर गेले होते. तिचा या टूर ग्रुपशी किंवा तीर्थयात्रेचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थेशी कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही.

तन्वीने आधी सांगितलं होतं की, या ग्रुपचे शेवटचे ठाऊक असलेले ठिकाण नेपाळमधील इमिग्रेशन सेंटर आणि ‘फ्रेंडशिप ब्रिज’च्या आसपास होतं. कुटुंबातील इतर सदस्य माहितीची प्रतीक्षा करत असताना, तन्वी देखील वाट पाहत आहे. तिच्या आई-वडिलांच्या बातमीची आणि ते ज्या दिवशी घरी परततील त्या दिवसाची.