NEET-UG 2026 पुनर्रचना परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना, नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) एक मोठे पाऊल उचलले आहे. सोशल मीडियावरील पेपर फुटीच्या अफवा, बनावट वेबसाईट आणि तोतया अधिकाऱ्यांना आळा घालण्यासाठी एनटीएने एक खास तक्रार पोर्टल सुरू केले आहे. २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये, असे आवाहन भारत सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.
अफवांचे पेव आणि NTA चा इशारा
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर नीट परीक्षेचा पेपर पुन्हा फुटल्याच्या जोरदार अफवा आणि काही बनावट प्रश्नपत्रिकांचे फोटो व्हायरल होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. यावर स्पष्टीकरण देत एनटीएने म्हटले आहे की, “अफवांना तुमचे भविष्य ठरवू देऊ नका. परीक्षेपूर्वी कोणाकडेही प्रश्नपत्रिका उपलब्ध नसते. सोशल मीडियावरील दावे पूर्णपणे खोटे आणि दिशाभूल करणारे आहेत.”
नवीन पोर्टलवर ‘या’ गोष्टींची करता येणार तक्रार
विद्यार्थी आता innovateindia.mygov.in/neet-ug-2026 या अधिकृत पोर्टलवर जाऊन खालील बाबींबद्दल तक्रार नोंदवू शकतात –
- पेपर किंवा Answer Key असल्याचा दावा करणाऱ्या बनावट सोशल मीडिया पोस्ट आणि वेबसाईट.
- पैशांच्या बदल्यात ‘लीक झालेला पेपर’ किंवा ‘नक्की निकालाची’ हमी देणाऱ्या टोळ्या किंवा व्यक्ती.
- ‘एनटीए’चे अधिकारी किंवा परीक्षा केंद्र प्रमुख असल्याचा बनावट आव आणणारे तोतया लोक.
- परीक्षेशी संबंधित कोणतीही संशयास्पद किंवा बेकायदेशीर हालचाल.
याशिवाय, पीआयबी फैक्ट चेक विभागानेही या अफवांचे खंडन केले असून, कोणत्याही अनधिकृत माहितीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ nta.ac.in आणि neet.nta.ac.in या संकेतस्थळांचाच वापर करावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
३ मे रोजी झालेली मूळ ‘नीट’ परीक्षा पेपर फुटीच्या गंभीर आरोपांमुळे रद्द करण्यात आली होती. या प्रकरणाची सखोल चौकशी केंद्रीय यंत्रणांमार्फत सुरू आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी आणि पारदर्शकता जपण्यासाठी सरकारने संपूर्ण देशात पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. आता २१ जून रोजी होणाऱ्या या पुनर्रचना परीक्षेला देशभरातून २० लाखांहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एनटीएने सायबर गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या मदतीने कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
