नवी दिल्ली: वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षा अखेर रद्द करण्यात आली आहे. ३ मे २०२६ रोजी झालेली ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) केंद्र सरकारच्या मान्यतेने घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असले तरी, NTA ने पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे.

परीक्षा रद्द का झाली?

NTA ने १० मे रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, तपास यंत्रणांनी सादर केलेल्या अहवालात परीक्षेच्या पारदर्शकतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. ‘सिस्टम’मधील विश्वासार्हता जपण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी ही परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी आता CBI (केंद्रीय अन्वेषण विभाग) कडे सोपवण्यात आली आहे.

आता पुढे काय? वाचा NTA ची सविस्तर नियमावली:

१. पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही:
ज्या विद्यार्थ्यांनी मे २०२६ च्या परीक्षेसाठी आधीच नोंदणी केली होती, त्यांचा डेटा आणि उमेदवारी फेरपरीक्षेसाठी जशीच्या तशी ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा नव्याने अर्ज भरण्याची किंवा नोंदणी करण्याची अजिबात आवश्यकता नाही.

२. परीक्षा केंद्र बदलणार का?
विद्यार्थ्यांनी मे महिन्यातील परीक्षेसाठी जी केंद्रे निवडली होती, तीच केंद्रे फेरपरीक्षेसाठी कायम ठेवली जाणार आहेत. केंद्रांच्या बाबतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

३. शुल्काबाबत मोठा निर्णय (Refund Policy):
NTA ने विद्यार्थ्यांना मोठा आर्थिक दिलासा दिला आहे. फेरपरीक्षेसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेले परीक्षा शुल्क पूर्णपणे परत (Refund) केले जाणार आहे. फेरपरीक्षेचा संपूर्ण खर्च NTA स्वतःच्या अंतर्गत निधीतून करणार आहे.

४. फेरपरीक्षा कधी होणार?
परीक्षेची नवीन तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. NTA ने स्पष्ट केले आहे की, फेरपरीक्षेचे वेळापत्रक आणि नवीन प्रवेशपत्र (Admit Card) डाऊनलोड करण्याबाबतची माहिती लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाईल.

गोंधळून जाऊ नका, अफवांवर विश्वास ठेवू नका!

सोशल मीडियावर पसरणाऱ्या अनधिकृत बातम्या किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन NTA ने विद्यार्थी आणि पालकांना केले आहे. परीक्षेच्या पुढील अपडेट्ससाठी केवळ NTA च्या अधिकृत संकेतस्थळालाच भेट द्यावी.