NEET Paper Leak: देशातील सर्वात मोठ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला पेपरफुटीचे ग्रहण लागले असून, ३ मे रोजी झालेली परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) अखेर रद्द केली आहे. व्हॉट्सॲपवर मोठ्या प्रमाणावर फॉरवर्ड झालेल्या एका संशयास्पद मेसेजमुळे या घोटाळ्याचे व्यापक स्वरूप उघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर, राष्ट्रीय चाचणी संस्थेने (NTA) ३ मे रोजी झालेली परीक्षा रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतला असून, या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवण्यात आला आहे.

तपासाची चक्रे फिरली; व्हॉट्सॲप मेसेज ठरला पुरावा

‘गेस पेपर’चा शोध घेणाऱ्या तपास अधिकाऱ्यांना एका विद्यार्थ्याच्या मोबाईलमध्ये हा व्हॉट्सॲप मेसेज सापडला. सुरुवातीला ही घटना मर्यादित स्वरूपाची वाटत होती, मात्र मेसेजच्या फॉरवर्डिंग हिस्ट्रीवरून या पेपरफुटीची व्याप्ती देशभर पसरल्याचे स्पष्ट झाले. या परीक्षेत सहभागी झालेल्या सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य आता टांगणीला लागले असून, परीक्षेची नवीन तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे.

तपासाचा धागा: डेहराडून ते सीकर

राजस्थान पोलिसांच्या विशेष कृती दलाच्या (SOG) प्राथमिक तपासानुसार, या पेपरफुटीचा उगम उत्तराखंडमधील डेहराडूनमध्ये झाल्याचा संशय आहे. सीकर येथील रहिवासी राकेश मंदावरिया याने कथितरित्या हा ‘गेस पेपर’ डेहराडूनमधून मिळवला. त्याने हा पेपर केरळमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या चुरू (राजस्थान) येथील एका विद्यार्थ्याला पाठवला. १ मेच्या सुमारास हा पेपर राजस्थानमधील सीकर येथील एका विद्यार्थ्याकडे पोहोचला.

सूत्रांच्या माहितीनुसार, हा पेपर छापील स्वरूपातही वाटण्यात आल्याने त्याचा मूळ स्रोत शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. विशेष म्हणजे, ज्या पीजी मालकाने पोलिसात तक्रार केली, तोच आता संशयाच्या भोवऱ्यात असून अटक टाळण्यासाठी त्याने तक्रारीचे नाटक केले असावे, असा पोलिसांना संशय आहे.

४०० प्रश्नांपैकी १२० प्रश्न परीक्षेत!

एसओजीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक विशाल बन्सल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या ‘गेस पेपर’मध्ये ४०० हून अधिक प्रश्न होते. धक्कादायक म्हणजे, यातील सुमारे १२० प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेत आले होते. ही १५० पानांची पीडीएफ फाईल परीक्षेच्या महिनाभरापूर्वीपासूनच विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये फिरत होती. याप्रकरणी आतापर्यंत दोन डझनांहून अधिक जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या प्रकरणावरून राजस्थानमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजप सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. “राज्य सरकारने दोन आठवडे हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला. सरकारची प्रतिमा वाचवण्यासाठी एफआयआर दाखल करण्यास उशीर करण्यात आला. एनटीएने परीक्षा रद्द करण्याचा आणि तपास सीबीआयला देण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, यामुळे सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे,” अशी टीका गेहलोत यांनी केली.

“एनटीए या चौकशीत सीबीआयला पूर्ण सहकार्य करेल. सर्व कागदपत्रे, नोंदी आणि आवश्यक सहाय्य ब्युरोला पुरवले जाईल,” असे एनटीएने आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.