NEET-UG 2026 Paper Leak CBI Investigation Updates: NEET-UG 2026 पेपरफुट प्रकरणाचा तपास आता एका अत्यंत महत्वाच्या वळणावर आला आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) ताब्यात घेतलेला विद्यार्थी अमित मीना याच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीने या संपूर्ण घोटाळ्याचे धागेदोरे उघड केले आहेत. राजस्थान, हरियाणा, महाराष्ट्र आणि केरळ अशा चार राज्यांमध्ये पसरलेले हे रॅकेट असून, यामध्ये थेट एमबीबीएस (MBBS) चे विद्यार्थी, दलाल, कोचिंग क्लासेसचे चालक आणि पेपर पुरवठादार यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे.
‘सीएनएन-न्यूज १८’ ने स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपच्या (SOG) केस डायरीतील अत्यंत महत्त्वाची माहिती मिळवली आहे. याच माहितीच्या आधारे सीबीआयने या प्रकरणातील पुढील अटकेची कारवाई केली आहे.
चौकशी दरम्यान आला ‘तो’ फोन आणि…
तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील सर्वात मोठा खुलासा अमित मीनाची चौकशी सुरू असतानाच झाला. अमितची चौकशी सुरू असतानाच त्याच्या मोबाईलवर ‘ऋषी’ नावाच्या एका तरुणाचा फोन आला. फोनवर ऋषी अमितला म्हणाला, “अजून पैशांचे पेमेंट का झाले नाही?” इतकेच नव्हे तर त्याने पुढे आमिष दाखवत म्हटले, “२०२७ मध्ये मी तुला यापेक्षाही जास्त पैसे कमावून देईन.” हा संवाद ऐकताच तपास अधिकाऱ्यांचे कान टवकारले. त्यांनी तत्काळ अमितला सावध करून ऋषीला समोरासमोर भेटायला बोलावण्यास सांगितले. मात्र, समोरच्या व्यक्तीला संशय आला आणि त्याने फोन कट केला. हा ऋषी म्हणजेच पेपर लीक घोटाळ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘बिवल’ कुटुंबातील सदस्य असल्याचे समोर आले आहे. या एका फोन कॉलमुळे हे रॅकेट किती संघटितपणे कार्यरत होते, यावर शिक्कामोर्तब झाले.
अमित मीनाची कबुली: ५ लाखांत खरेदी केला पेपर
चौकशीदरम्यान अमित मीनाने गुन्हा कबूल केला आहे. त्याने सांगितले की, नीट (NEET) चा पेपर त्याने ५ लाख रुपयांना विकत घेतला होता आणि त्यानंतर तो इतरांना पुढे विकला. अमितने धक्कादायक खुलासा करताना सांगितले की, २०२५ च्या परीक्षेनंतर ऋषीने बढाई मारली होती की, “माझ्या कुटुंबातील पाच जणांनी ‘नीट’ परीक्षा उत्तीर्ण केली आहे.” तसेच, २०२६ च्या परीक्षेसाठीचा संपूर्ण कट महिनाभर आधीच रचण्यात आला होता. या खुलाशानंतर तपास यंत्रणांनी वेगवेगळ्या राज्यांमध्ये धाडी टाकण्यास सुरुवात केली.
विकास बिवलने पोलिसांना गुरुग्रामचा यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांच्यापर्यंत पोहोचवले
अमित मीनाच्या जबाबावरून एसओजी (SOG) चे पथक जयपूरमधील जमवारामगड येथे पोहोचले. तिथे त्यांनी ऋषीचे वडील दिनेश बिवल यांना ताब्यात घेतले. दिनेश बिवल यांच्या चौकशीतून त्यांचे बंधू मांगीलाल बिवल यांचे नाव समोर आले. मांगीलाल यांनी त्यांचा मुलगा विकास बिवल याचे नाव घेतले, जो सवाई माधोपूर येथे एमबीबीएसचा विद्यार्थी आहे.
विकास बिवलने पोलिसांना गुरुग्रामचा यश यादव आणि नाशिकचा शुभम खैरनार यांच्यापर्यंत पोहोचवले. मांगीलालने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, २०२५ चा पेपर नाशिकमधून लीक झाला होता, तर यंदाच्या (२०२६) पेपर लीकचे कनेक्शन हरियाणाशी जोडलेले आहे.
केरळ आणि मुलींच्या ‘पीजी’ हॉस्टेलचा कनेक्शन
या तपासातील सर्वात महत्त्वाची कडी म्हणजे परीक्षेपूर्वी पेपरचा प्रवास कसा झाला, हे आता स्पष्ट झाले आहे. एसओजीच्या केस डायरीनुसार, हा पेपर आधी सीकरहून चुरूला गेला आणि तिथून केरळमध्ये शिकणाऱ्या एका एमबीबीएसच्या विद्यार्थ्याकडे पोहोचला.
त्या विद्यार्थ्याने हा पेपर सीकरमध्ये मुलींचे ‘पीजी’ चालवणाऱ्या आपल्या वडिलांना पाठवला. परीक्षा संपल्यानंतर या पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थिनींनी मूळ प्रश्नपत्रिका आणि त्यांना आधी मिळालेला पेपर पडताळून पाहिला, तेव्हा हे बिंग फुटले. “काका, परीक्षेत आलेले प्रश्न आणि या पेपरमधील प्रश्न अगदी सारखेच आहेत,” असे विद्यार्थिनींनी पीजी चालकाला सांगितले. या एका वाक्याने पेपर लीक करणाऱ्या संपूर्ण टोळीचे धाबे दणाणले.
कोचिंग संस्था चालकांचा दबाव आणि तक्रार
या प्रकारानंतर घाबरलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने हा पेपर शशिकांत सुथार या केमिस्ट्री शिक्षकाला दाखवला. या शिक्षकाने राजस्थानमधील नामांकित ‘गुरुकृपा कोचिंग इन्स्टिट्यूट’च्या प्रशासनाशी संपर्क साधला. मात्र, कोचिंग चालकांनी त्या कर्मचाऱ्याला इशारा दिला की, “हे प्रकरण बाहेर आले तर तुकी नोकरी जाईल आणि मुलाचे एमबीबीएसचे ॲडमिशनही धोक्यात येईल.” मात्र, तरीही ७ मे रोजी या कोचिंग इन्स्टिट्यूटच्या एका शिक्षकाच्या वतीने ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’कडे (NTA) या पेपर लीकबाबत अधिकृत तक्रार नोंदवण्यात आली.
डिजिटल आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी सुरू
सध्या सीबीआय आणि इतर तपास यंत्रणा आरोपींचे व्हॉट्सॲप ग्रुप्स, टेलिग्राम चॅनेल्स, बँक खात्यांचे व्यवहार आणि कॉल डिटेल्स (CDR) यांची कसून चौकशी करत आहेत. या घोटाळ्याचा फायदा नेमका किती विद्यार्थ्यांना झाला आणि यामागे आणखी कोणते मोठे चेहरे आहेत, याचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
