CJP Parliament Protest: एकिकडं दिल्लीत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काढलेल्या मोर्चामध्ये विद्यार्थी-तरुण आंदोलकांना पोलीस व निमलष्करी दलांच्या जवानांकडून झालेल्या क्रूर मारहाणीचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. दुसऱ्या बाजूला, आंदोलकांनी मागे हटण्यास नकार देत जंतर-मंतरवर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून आंदोलनस्थळी तरुणांची गर्दी वाढू लागली आहे.

NEET-UG २०२६ च्या फेरपरीक्षेत पान्शुल बन्सलनं देशात दुसरा क्रमांक मिळवला आहे. ७२० पैकी तब्बल ७१५ गुण मिळवून त्याने यशोशिखर गाठले. मात्र, हा प्रवास त्याच्यासाठी सोपा नव्हता, असे त्याने सांगितले.

दुसरीकडं, आंदोलक आणि विरोधक यांच्या आक्रमकतेमुळे केंद्र सरकारवरील दबाव वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण देशभरात आक्रोश आणि आंदोलनाचे लोण पसरलेले असतानाच, या वर्षीच्या ‘नीट’ फेरपरीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱ्या पानशुल बन्सलने या संपूर्ण वादावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.

“आंदोलनात सहभागी होण्यापेक्षा मी घरीच राहून अभ्यास केला आणि गुण सुधारण्यावर भर दिला,” अशी प्रतिक्रिया पान्शुलनं दिली आहे. ‘एनडीटीव्ही’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्याने आपल्या यशाचा मंत्र आणि फेरपरीक्षेच्या प्रवासावर मोकळेपणाने भाष्य केले.

निराश होण्याऐवजी परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहिले

पहिल्यांदा परीक्षा रद्द झाल्याचे समजताच आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना पान्शुल म्हणाला, “सुरुवातीला परीक्षा रद्द झाल्याची बातमी ऐकून मी प्रचंड निराश झालो होतो. मन उद्विग्न झाले होते. पण २-३ तासांतच मी स्वतःला सावरले. निराश होण्याऐवजी या परिस्थितीकडे सकारात्मकतेने पाहण्याचे ठरवले. आधीपेक्षा जास्त गुण मिळवायचेच, असा पक्का निर्धार मी केला.”

मूळ परीक्षेत पान्शुलला ७०६ गुण मिळाले होते, ज्यांच्या बळावर त्याला नामांकित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सहज प्रवेश मिळाला असता. मात्र, फेरपरीक्षेत त्याने अधिक मेहनत घेऊन आपले गुण ७१५ पर्यंत वाढवले.

“सुरुवातीला ‘माझ्यावरच हा अन्याय का?’ असा प्रश्न पडला होता. पण नंतर नकारात्मक विचार बाजूला सारून मी मुख्य ध्येयावर लक्ष केंद्रित केले. शेवटी जे होते ते चांगल्यासाठीच होते, यावर माझा विश्वास होता.” – पान्शुल बन्सल

आंदोलनावर सविस्तर प्रतिक्रिया देण्यास नकार

केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत हजारो विद्यार्थी आणि विरोधी पक्ष रस्त्यावर उतरले असताना, पान्शुलने मात्र आंदोलनांपासून दूर राहणे पसंत केले. देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांबद्दल विचारले असता, “मला यावर कोणतेही भाष्य करायचे नाही,” असे सांगत त्याने या वादावर तटस्थ भूमिका घेतली.

“रडत बसण्यापेक्षा पुन्हा मैदानात उतरलो!”

ANI या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया देताना, पहिल्यांदा परीक्षा रद्द झाली, तेव्हाच्या आपल्या भावना व्यक्त करताना पांशुल म्हणाला, “सुरुवातीला परीक्षा रद्द झाल्याचे समजताच मला प्रचंड धक्का बसला होता. मी खूप निराश आणि हताश झालो होतो. पण काही वेळातच माझ्या लक्षात आले की, दुःखी होऊन किंवा रडत बसून काहीच साध्य होणार नाही. मी स्वतःला सावरले आणि पहिल्या परीक्षेपूर्वी जसा माझा दैनंदिन अभ्यासाचा दिनक्रम होता, तसाच तो पुन्हा सुरू केला.”

आपल्या या यशात देवाचा आणि कुटुंबाचा मोठा वाटा असल्याचे सांगताना तो पुढे म्हणाला, “मी विचार केला की देवाने मला गुण सुधारण्याची आणखी एक उत्तम संधी दिली आहे. कारण मी यापेक्षाही उत्तम कामगिरी करू शकतो, यावर देवाचा विश्वास होता. या कठीण काळात माझ्या कुटुंबाने मला खूप मोठा आधार दिला आणि धीर दिला.”

नीट पेपरफुटी आणि फेरपरीक्षेचा घटनाक्रम

३ मे २०२६: देशभरात नीट-युजी (NEET-UG) परीक्षेचे आयोजन.

१२ मे २०२६: पेपरफुटीच्या गंभीर आरोपांनंतर मूळ परीक्षा रद्द; सीबीआयकडे तपास सुपूर्द.

२१ जून २०२६: कडक सुरक्षा व्यवस्थेत फेरपरीक्षा पार पडली.

१६ जुलै २०२६: फेरपरीक्षेचा निकाल जाहीर; पानशुल बन्सल देशात दुसरा.