राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं बहुप्रतिक्षित ‘नीट यूजी २०२६’ परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. यंदाच्या परीक्षेत पंजाबच्या आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पानशुल बन्सल यांनी बाजी मारत देशात पहिलं स्थान पटकावलं आहे. यावर्षी देशभरातून तब्बल ११.२१ लाख विद्यार्थी वैद्यकीय प्रवेशासाठी पात्र ठरले आहेत.
७२० पैकी ७१५ गुण मिळवत पटकावला AIR 1
यंदाच्या परीक्षेत देशात पहिल्या आलेल्या आर्यन गुप्ता आणि पानशुल बन्सल या दोघांनीही ७२० पैकी ७१५ गुण मिळवले आहेत. याशिवाय १९ विद्यार्थ्यांनी ७०० गुण, तर १३८ विद्यार्थ्यांनी ६९० गुणांचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे, ६९० पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या १३८ विद्यार्थ्यांपैकी ९३ टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हे पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.
‘सगळं काही स्वप्नासारखं वाटतंय’ – आर्यन गुप्ता
डॉक्टरांच्या कुटुंबातून येणाऱ्या आर्यननं आपल्या यशाचं श्रेय त्याच्या सातत्यपूर्ण मेहनतीला आणि मार्गदर्शकांना दिलं आहे. पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना आर्यन म्हणाला, “सध्या सगळं काही एका सुंदर स्वप्नासारखं वाटतंय. निकालामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. परीक्षेच्या तयारीसाठी मी रोज १६ ते १७ तास अभ्यास करायचो. अनेकदा रात्रीची झोपही व्हायची नाही, पण आज त्या कष्टाचं फळ मिळालं आहे.”
…आणि कॅन्सर तज्ज्ञ होण्याचा संकल्प केला!
आपल्या भविष्यातील प्लॅन्सबद्दल सांगताना आर्यन भावूक झाला. तो म्हणाला, “मला ऑन्कोलॉजिस्ट (कॅन्सर तज्ज्ञ) व्हायचंय. मी जेव्हा तिसरीत होतो, तेव्हा माझ्या आजीचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं. त्याच वेळी मी भविष्यात कॅन्सर तज्ज्ञ होऊन रुग्णांची सेवा करण्याचा संकल्प केला होता.”
विद्यार्थ्यांना सल्ला देताना आर्यननं सांगितलं की, “तुमच्या शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवा. ते गेल्या १५-२० वर्षांपासून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी दाखवलेल्या मार्गावर डोळे झाकून विश्वास ठेवा, यश नक्की मिळेल.”
राज्यनिहाय निकाल: उत्तर प्रदेश पहिलं, महाराष्ट्राचाही डंका
- उत्तर प्रदेश: देशात सर्वाधिक म्हणजेच १.७ लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तर प्रदेशातून पात्र ठरले आहेत.
- लक्षद्वीप: येथून सर्वात कमी म्हणजे केवळ ४३ विद्यार्थी पात्र ठरले.
- टॉप १७ विद्यार्थी: ७०५ पेक्षा जास्त गुण मिळवणारे पहिले १७ विद्यार्थी हे पंजाब, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, तेलंगणा आणि तामिळनाडू या ८ राज्यांमधील आहेत.
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय परीक्षा
‘नीट यूजी’ ही देशातील सर्वात मोठी पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश परीक्षा आहे. देशभरातील शासकीय आणि खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी दरवर्षी लाखो विद्यार्थी ही परीक्षा देतात. एनटीए (NTA) द्वारे आयोजित केल्या जाणाऱ्या या परीक्षेच्या माध्यमातून देशभरातील अंदाजे १,०८,००० एमबीबीएस (MBBS) जागांवर प्रवेश दिला जातो.
