NEET UG Paper Leak Controversy : रसायनशास्त्राच्या सराव प्रश्नपत्रिकेतील (Guess Papers) प्रश्न आणि प्रत्यक्ष नीट (NEET) परीक्षेचा पेपर यांमधील १०० टक्के साधर्म्यामुळेच राष्ट्रीय परीक्षा संस्थेला (NTA) चौकशी करणं आणि पेपर लीकच्या मुख्य स्त्रोतापर्यंत पोहोचणं शक्य झाले. चौकशीच्या आधारे, NTA ने पुढील तपासासाठी रसायनशास्त्राचे पेपर तयार करणारे (Paper setters) आणि अनुवादक (Translators) या सर्वांची नावे केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवली आहेत, अशी माहिती या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रसायनशास्त्राचे १०० टक्के प्रश्न लीक

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ मे रोजी देशभरात झालेल्या नीट परीक्षेच्या चार दिवसांनंतर, म्हणजेच ७ मे रोजी NTA ला सीकर (Sikar) येथील एका व्हिसलब्लोअरकडून (माहिती उघड करणाऱ्या व्यक्तीकडून) एक ईमेल प्राप्त झाला होता. या व्हिसलब्लोअरने आधी पेपर लीकबाबत NTA ला माहिती दिली आणि त्यानंतर लीक झालेल्या पेपरची पीडीएफ (PDF) देखील शेअर केली. जेव्हा NTA ने या पीडीएफची प्रत्यक्ष पेपरशी तुलना केली, तेव्हा रसायनशास्त्राचे १०० टक्के प्रश्न लीक झाल्याचे आणि जीवशास्त्राचे (Biology) प्रश्नही अंशतः लीक झाल्याचे समोर आले.

प्राध्यापक आणि अनुवादकांची यादी सीबीआयकडे

नाव न सांगण्याच्या अटीवर या घडामोडींशी संबंधित एका सूत्राने सांगितलं की, NTA ने रसायनशास्त्राच्या पेपरशी संबंधित सर्व प्राध्यापक आणि अनुवादकांची संपूर्ण यादी सीबीआयला दिली आहे. यामध्ये एकूण २६ ते २७ लोकांचा समावेश आहे. यापैकी २४ जण अनुवादक आहेत, तर उर्वरित पेपर सेट करणारे आहेत, यात भौतिक, अकार्बनिक (Inorganic) आणि सेंद्रिय (Organic) रसायनशास्त्रासाठी प्रत्येकी एकाचा समावेश आहे. या लोकांनी याआधीही अनुवादक किंवा पेपर सेट केले असण्याची शक्यता सूत्राने व्यक्त केली.

अनुवादकांचं काम कसं असतं?

ही परीक्षा डझनभर भाषांमध्ये घेतली जात असल्याने NTA भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या तिन्ही विषयांसाठी अनुवादकांची नियुक्ती करते. परंतु प्रत्येक भाषेसाठी प्रत्येक विषयाचे दोन अनुवादक असतात, एक जण मूळ इंग्रजी पेपरचा इतर भाषेत (उदा. मराठीमध्ये) अनुवाद करतो, तर दुसरा जण त्या मराठी अनुवादाचा पुन्हा इंग्रजीत अनुवाद करतो. अनुवादात कोणताही अर्थ बदलू नये किंवा मूळ अर्थ हरवू नये, यासाठी ही पद्धत वापरली जाते. ही पूर्णपणे विश्वासावर आधारित यंत्रणा आहे. परीक्षेची विश्वासार्हता ही पेपर सेट करणाऱ्यांवर आणि अनुवादकांवर NTA ठेवत असलेल्या विश्वासावर टिकून असते. या लोकांना जानेवारी महिन्यात नीट परीक्षेचे काम सोपवण्यात आले होते आणि त्यांच्याकडून हमीपत्र लिहून घेण्यात आले होते.

फेरपरीक्षेसाठी सेटर आणि अनुवादक बदलले

घर का भेदी लंका ढाये या हिंदी म्हणीचा हवाला देत सूत्रांनी सांगितलं की, पुढील प्रक्रियेचा भाग म्हणून NTA ला आता पेपर सेट करणारे आणि अनुवादकांच्या पार्श्वभूमीची एखाद्या तृतीय पक्षाद्वारे तपासणी करण्याचा विचार करावा लागेल. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी, NTA ने केवळ रसायनशास्त्राचेच नव्हे, तर जीवशास्त्र आणि भौतिकशास्त्राच्या पेपरचेही सर्व प्रश्न सेट करणारे आणि अनुवादक बदलले आहेत, असं सूत्राने सांगितले. याशिवाय, परीक्षेची पारदर्शकता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी संस्था सध्याच्या एसओपीमध्ये सुधारणा करत आहे.

पेपर कसे सेट होतात?

“२१ जून रोजी होणाऱ्या नीटच्या परीक्षेसाठी एका महिना उरलेला असताना हे वेळापत्रक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक आहे”, असं सूत्राने नमूद केले. गेल्या आठवड्यात सीबीआयने पुण्यातून पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केली. हा रसायनशास्त्र विभागाचे प्रश्न तयार करणे आणि त्याचे मराठीत भाषांतर करणे या दोन्ही कामांमध्ये सामील होता. २०२४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या एका समितीच्या शिफारशींनुसार, प्रश्नपत्रिका तयार करण्याच्या टप्प्यावर सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी NTA कडे एक नियमावली आहे. त्यानुसार, इंटरनेट सुविधा नसलेल्या सुरक्षित खोल्यांमध्ये पेपर सेट केले जातात, जिथे पेपर सेट करणाऱ्यांना त्यांचे मोबाईल फोन आणि लॅपटॉप नेण्याची परवानगी नसते.

NTAकडून अधिकाऱ्यांची भरती

दुसरीकडे, NTA स्वतःच्या अंतर्गत व्यवस्थेतही सुधारणा करत आहे. दोन संयुक्त सचिव दर्जाचे आणि दोन संयुक्त संचालक दर्जाचे असे चार नवीन अधिकारी आणि एका व्यावसायिक नेतृत्व संघाची भरती करण्यासाठी संस्थेने नुकतीच जाहिरात दिली आहे. यामध्ये मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (CTO), मुख्य वित्त अधिकारी (CFO) आणि महाव्यवस्थापक (मानव संसाधन – GM HR) यांचा समावेश असेल, जे थेट महासंचालकांना (Director General) रिपोर्ट करतील.

एंड-टू-एंड तंत्रज्ञान प्रणाली हाताळण्याची जबाबदारी

खाजगी क्षेत्रातील असण्याची शक्यता असलेले ‘सीटीओ’ (CTO), NTA च्या डिजिटल परीक्षा प्रणालीची रचना आणि अंमलबजावणीचा आराखडा तयार करण्यासाठी जबाबदार असतील. उमेदवारांच्या वेबसाइट्स आणि नोंदणीपासून ते गोपनीय प्रश्नपत्रिका व्यवस्थापन, वितरण, मूल्यमापन, नॉर्मलायझेशन आणि निकाल प्रक्रियेपर्यंत परीक्षा चक्राच्या प्रत्येक टप्प्याला पूरक ठरणारी एंड-टू-एंड तंत्रज्ञान प्रणाली हाताळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. तसेच ते सर्व प्रणालींमध्ये आधुनिकता, सुरक्षा आणि विश्वासार्हता आणण्यासाठी काम करतील.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी नवी दिल्लीत नीट (यूजी) फेरपरीक्षेच्या आढावा बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. (पीटीआय)

दरम्यान, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी २१ जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेबाबत आढावा बैठक घेतली आणि फेरपरीक्षेच्या नियोजनावर देखरेख ठेवण्यासाठी देशभरातील जिल्हा दंडाधिकारी (DMs) आणि पोलीस अधीक्षकांसोबत (SPs) समन्वय बैठका घेण्याचे निर्देश दिले.