NEET UG Exam Cancellation Impacts: वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आवश्यक असलेली नीट-यूजी प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करावी लागली. आता २१ जून रोजी पुन्हा परीक्षा घेतली जाणार आहे. देशभरातून २२ लाखांहून अधिक विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. मात्र पेपरफुटीमुळे त्यांना आता पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागेल. मात्र ज्यांनी अथक परिश्रम घेऊन अभ्यास केला, ज्यांना पेपर सोपा गेला होता, त्यांच्यात आता नैराश्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. यातूनच काही विद्यार्थ्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे.
नवी दिल्लीच्या आझादपूर परिसरातील लाल बाग येथे राहणाऱ्या २० वर्षीय विद्यार्थीनीला यंदा पेपर सोपा गेला होता. तिचा हा तिसरा प्रयत्न होता. मागच्या वर्षी अवघ्या चार गुणांनी तिची संधी हुकली होती. ३ मे रोजी नीटची परीक्षा देऊन घरी आल्यानंतर विद्यार्थीनी आनंदी होती. यंदा आपण नीटमध्ये यश मिळवू असे तिने पालकांना सांगितले. मात्र एनटीएने परीक्षाच रद्द केल्यामुळे ती चिंतेत होती. आता तिला चौथ्यांदा ही परीक्षा द्यावी लागणार होती.
गुरूवारी दुपारी घरी कोणी नसताना या तरूणीने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. विद्यार्थीनीच्या नातेवाईकांनी सांगितले की, सदर विद्यार्थिनी तीन वर्षांपासून नीटची तयारी करत होती. गेल्या वर्षी अवघ्या काही गुणांनी तिची संधी चुकली होती. तिच्या पालकांना तिच्याकडून बऱ्याच अपेक्षा होती. ते टॅक्सी चालविण्याचे काम करतात. या अनपेक्षित घटनेमुळे पालकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
सिकरमध्ये विद्यार्थ्याने आयुष्य संपवले
राजस्थानच्या सिकर शहरात नीट पेपरफुटीचे प्रकरण उघडकीस आले. याच शहरातील २३ वर्षीय विद्यार्थ्याने परीक्षा चांगली गेल्यानंतर स्वतःचे आयुष्य संपवले आहे. प्रदीप महीच असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. त्याच्या काकांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, नीट परीक्षा देण्याची ही त्याची तिसरी वेळ होती. त्याला पेपर चांगला गेला होता. ६५० हून अधिक गुण मिळतील, अशी त्याला अपेक्षा होती. मात्र आता परीक्षा रद्द झाल्यामुळे तो नैराश्यात होता.
प्रदीपचे घरमालक असलेल्या राजेंद्र यांनी सांगितले की, परीक्षा रद्द झाल्यापासून तो अस्वस्थ दिसत होता. त्याची एक बहीण त्याच्याबरोबर राहत होती. ती आंघोळ करायला गेली असताना प्रदीपने हे टोकाचे पाऊल उचलले.
प्रदीप राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील रहिवासी होता. त्याचे वडील मजूरी करतात. प्रदीपच्या शिक्षणासाठी त्यांनी आपली जमीन विकली होती, तसेच कर्जही काढले होते. प्रदीपला तीन बहिणी असून तो एकुलता एक भाऊ होता. सिकरमध्ये त्याच्याबरोबर राहणारी बहीणही स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहे.
पुण्यातून कथित मास्टरमाईंडला अटक
नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने मोठी कारवाई केली आहे. पेपरफुटी प्रकरणी पुण्यातून रसायनशास्त्राच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाला अटक करण्यात आली आहे. पी. व्ही कुलकर्णी असे या सेवानिवृत्त प्राध्यापकाचे नाव असून, तो नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वतीने परीक्षा प्रक्रियेत सहभागी होता आणि त्याच्याकडे प्रश्नपत्रिकाही उपलब्ध होत्या, अशी माहिती समोर आली आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाचा तोच मास्टरमाईंड असल्याचे सीबीआयच्या तपासात आढळून आले आहे.
