पीटीआय, नवी दिल्ली
केंद्र सरकारने पेपरफुटीच्या संशयावरून वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीची नीट-यूजी परीक्षाच मंगळवारी रद्द केल्यानंतर या प्रकरणातील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) बुधवारी देशभरात कारवाई केली. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात जयपूरमधून तिघे, पुण्यातून दोघे, तर गुरुग्राम, नाशिक, अहिल्यानगरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती अधिकार्यांनी दिली.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयपूरमधून मांगिलाल बिवल, विकास बिवल आणि दिनेश बिवल असे तिघे, गुरुग्राममधून यश यादव, नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, पुण्यामधून ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे व शेषराव सोळंकी या अभियांत्रिकीच्या विद्याथ्र्याचा समावेश आहे. मांगिलाल व दिनेश हे दोघे बंधू जयपूर शहरानजीक बांधकाम व्यवसायाशी संबंधित आहेत. सिकर येथील विद्याथ्र्याला विकण्यासाठी त्यांनी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय आहे. या अटकेनंतर राजस्थानमध्ये काँग्रेस-भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. दिनेश बिवल हा भाजपचा पदाधिकारी असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केला. भाजपने हा आरोप फेटाळून लावला.
सीबीआय या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करणार्या राजस्थानच्या विशेष कृती दलाशी (एसओजी) समन्वय साधत आहे. सीबीआयने बुधवारी राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या मुख्यालयाला भेट देऊन परीक्षेसंबंधित कागदपत्रे गोळा केली. तसेच परीक्षा प्रक्रियेत सहभागी असलेल्या अधिकार्यांशीही चर्चा केली. ‘नीट २०२६’च्या पेपरफुटीप्रकरणात नाशिकमधून शुभम खैरनार याला मंगळवारी अटक केल्यानंतर त्याला बुधवारी मुंबईतील महानगरदंडाधिकार्यांसमोर हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने त्याला सीबीआयची दोन दिवसांची तात्पुरती कोठडी (ट्रान्झिट रिमांड) सुनावली. त्यानंतर सीबीआयने त्याला पुढील चौकशीसाठी दिल्लीला नेले.
अहिल्यानगर पोलिसांनी राहुरी तालुक्यातील धनंजय लोखंडे (३०) याला ताब्यात घेऊन सीबीआय पथकाच्या हवाली केले. दिल्ली येथे नेण्यासाठी लोखंडे याला बुधवारी सायंकाळी न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यानंतर बुधवारी देशभरात अनेक ठिकाणी छापे टाकले. संशयितांकडून मोबाइल आणि लॅपटॉपसह अनेक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. प्रश्नपत्रिका प्रसारित करण्यासाठी कोणत्या ॲप्सचा वापर करण्यात आला होता, याचा शोध घेण्यासाठी ही उपकरणे न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवली जातील.
प्रश्नपत्रिकाफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत
पुणे : ‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिकाफुटीचे धागेदोरे पुण्यापर्यंत पोहोचले आहेत. पुणे पोलिसांच्या पथकाने बिबवेवाडीतील सुखसागरनगर भागातून एका ब्युटी पार्लरचालक महिलेसह अभियांत्रिकी शाखेतील विद्याथ्र्याला बुधवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. अभियांत्रिकी शाखेतील विद्याथ्र्याकडे चौकशी सुरू आहे,’ अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
संभाव्य प्रश्नपत्रिका केरळमधून राजस्थानला
नीट-यूजी २०२६ वैद्यकीय प्रवेश परीक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नांशी साधर्म्य असलेल्या प्रश्नपत्रिकेचे धागेदोरे केरळमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणार्या राजस्थानमधील सिकर येथील एका विद्याथ्र्यापर्यंत पोहोचले आहेत. या विद्याथ्र्याने ही संभाव्य प्रश्नपत्रिका आपल्या मित्रांना आणि एका वसतिगृह मालकाला पाठवली होता, अशी माहिती राज्य विशेष कृती दलाच्या (एसओजी) वरिष्ठ अधिकार्याने दिली.
वैद्यकीय संघटनेची सर्वोच्च न्यायालयात धाव
नीट-यूजी २०२६ परीक्षेच्या आयोजनात यंत्रणा पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप करत वैद्यकीय संघटनेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अनियमिततेमुळे परीक्षा रद्द झाल्यानंतर, या चाचणी पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी संघटनेने केली आहे. ‘फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन’ने वकील तन्वी दुबे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यामध्ये राष्ट्रीय परीक्षा आराखड्यात बदल करण्याची आणि ‘एनटीए’च्या जागी सक्षम, स्वायत्त संस्था नेमण्याची मागणी करण्यात आली आहे.
