NEET-UG Exam : शिक्षणाची नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानच्या कोटामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. नीट परीक्षेच्या एक दिवस आधी म्हणजे शनिवारी रात्री नीट (NEET) परीक्षेची तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती समोर आली आहे. परीक्षेचा ताणाव सहन झाला न झाल्यामुळे तिने हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं बोललं जात आहे.
ही विद्यार्थिनी मध्य प्रदेशची रहिवासी होती आणि तिच्या कुटुंबासह ती कोटा येथे शिक्षणासाठी राहत होती. ती कोटामध्ये नीटची तयारी करत होती. नीट परीक्षेच्या एक दिवस आधी तिने टोकाचा निर्णय घेत आपलं आयुष्य संपवलं आहे. या विद्यार्थिनीने तिच्या खोलीत गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
देशभरातील विविध केंद्रांवर आज (४ मे) नीटची परीक्षा पार पडत आहे. याच परिक्षेची तयारी ही विद्यार्थिनीनी करत होती. ती १७ वर्षांची असल्याचं सांगितलं जात आहे. तिने जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्यानंतर तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ही विद्यार्थिनी नीटची परीक्षा देण्यासाठी तिच्या पालकांसोबत कोटा येथे राहत होती. तसेच ती दोन वर्षांपासून एका कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये परीक्षेची तयारी करत होती, असंही पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, घटनेच्या वेळी तिचाय कुटुंबातील सदस्य घरीच होते. पण रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांना ती तिच्या खोलीत मृत आढळून आली. तसेच तिच्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट सापडली नसल्याचं तिच्या कुटुंबातील सदस्यांनी स्पष्ट केलं आहे. पीडितेचे पालक सरकारी शिक्षक असल्याचं सांगितलं जात आहे. तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील चौकशी सुरु आहे.दरम्यान, या वर्षी जानेवारीपासून कोटामध्ये नीटसाठी कोचिंगचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवण्याची ही १४ वी घटना आहे. त्यामुळे कोटामध्ये एकच खळबळ उडाली आहे.