गेल्या काही दिवसांपासून देशभरात नीट (NEET) परीक्षेच्या पेपर फुटी प्रकरणाची मोठी चर्चा सुरू आहे. यंदा जवळपास २२.७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटीमुळे या २२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आता पुन्हा नीट (NEET) परीक्षा द्यावी लागणार आहे. कारण नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली आहे. आता २१ जून रोजी नीटची पुनर्परीक्षा पार पडणार आहे.

या संपूर्ण नीट परीक्षा पेपर फुटीच्या गोंधळावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर जोरदार टीकेची झोड उठवली आहे. या पेपरफुटी प्रकरणाचा तपास सीबीआय करत असून आतापर्यंत सीबीआयने अनेकांना अटक केली आहे. दरम्यान, नीट परीक्षा पेपर फुटीचं हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. नीट पेपरफुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाला महत्वाची माहिती दिली आहे.

केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.’ दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षेचा पेपर रद्द झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच आता ही परीक्षा योग्यरित्या पार पाडली जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी केंद्र सरकारने न्यायालयाला सांगितलं की, ‘पंतप्रधान मोदी हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.’ या संदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.

केंद्र सरकारने न्यायालयात काय सांगितलं?

दरम्यान, नीट २०२६ पेपरफुटीच्या प्रकरणानंतर आता केंद्र सरकारने अधिक खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे. नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी दरम्यान केंद्र सरकारने सांगितलं की, नीट परीक्षेच्या पद्धतीत मोठे बदल करण्यात आले आहेत. आता संपूर्ण प्रक्रियेवर उच्च स्तरीय देखरेख ठेवली जाईल. या बरोबरच भविष्यात अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नयेत आणि विद्यार्थ्यांचा विश्वास पुन्हा प्रस्थापित व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या प्रकरणावरील सर्व घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

NEET पेपरफुटीवरून सर्वोच्च न्यायालयाने NTA ला फटकारलं

नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (२९ मे) सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून एनटीएला फटकारलं. ‘यूपीएससीमध्ये कधी पेपरफुटी झाली नाही, त्यांच्याकडून धडा घ्या’, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला फटकारलं आहे.

नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला विचारलं की, देखरेख यंत्रणा आणि पर्यवेक्षण समित्या अस्तित्वात असूनही एवढी मोठी पेपर फुटीची घटना कशी घडू शकते? असा सवाल न्यायालयाने विचारला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीशी तुलना करत न्यायालयाने म्हटलं की, “देशाच्या या प्रमुख नागरी सेवा परीक्षेत अशा पेपर फुटीच्या घटना कधीही घडल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सीला धडा घेण्याची गरज आहे.”

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर सरकार हवाई दलाची मदत घेणार?

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढे भारतीय लष्कराची मदत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा विचार सरकार करत असून यावर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

संरक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांची बैठक

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, संरक्षण अधिकारी आणि टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेता येईल का? याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

नीट पुनर्परीक्षा आता येत्या २१ जून रोजी पार पडणार असून एनटीएने ही घोषणा केलेली आहे.

नीटच्या पुनर्परीक्षेची तारीख काय?

एनटीएनं नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या २१ जून रोजी रविवारी नीटची पुनर्परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे. तसेच एनटीएने विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचं आवाहनही केलेलं आहे. परीक्षेबाबतच्या कोणत्याही माहितीसाठी केवळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे.