नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या ११ च्याही पुढे गेली आहे. सीबीआयकडून नीट पेपरफुटी प्रकरणात सखोल चौकशी केली जात आहे. यंदा जवळपास २२.७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही नीटची परीक्षा दिली होती. पण पेपरफुटीच्या घटनेमुळे केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द केली. आता २१ जून रोजी ही नीटची पुनर्परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पुन्हा नीट (NEET) परीक्षा द्यावी लागणार आहे.
दरम्यान, या नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज (२९ मे) सुनावणी पार पडली आहे. या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीवरून एनटीएला फटकारलं आहे. ‘यूपीएससीमध्ये कधी पेपरफुटी झाली नाही, त्यांच्याकडून धडा घ्या’, असं सांगत सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला फटकारलं आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.
सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
नीट (NEET) परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणावरून सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ला विचारलं की, देखरेख यंत्रणा आणि पर्यवेक्षण समित्या अस्तित्वात असूनही एवढी मोठी पेपर फुटीची घटना कशी घडू शकते? असा सवाल न्यायालयाने विचारला. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीशी तुलना करत न्यायालयाने म्हटलं की, “देशाच्या या प्रमुख नागरी सेवा परीक्षेत अशा पेपर फुटीच्या घटना कधीही घडल्या नाहीत, त्यामुळे त्यांच्याकडून नॅशनल टेस्टिंग एजन्सीला धडा घेण्याची गरज आहे.”
केंद्र सरकारने न्यायालयाला काय सांगितलं?
केंद्र सरकारच्यावतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.’ सर्वोच्च न्यायालयाने नीट परीक्षेचा पेपर रद्द झाल्याबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच आता ही परीक्षा योग्यरित्या पार पाडली जाईल याची खात्री करण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी फेरपरीक्षेपूर्वी अनेक सुरक्षा उपाययोजना लागू केल्या जातील.
नीटच्या पुनर्परीक्षेची तारीख काय?
एनटीएनं नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केलेली आहे. त्यानुसार येत्या २१ जून रोजी रविवारी नीटची पुनर्परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे. तसेच एनटीएने विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचं आवाहनही केलेलं आहे. परीक्षेबाबतच्या कोणत्याही माहितीसाठी केवळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे.
