NEET UG Paper Leak Whistleblower Reveal: वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेल्या नीट-यूजी पूर्वपरीक्षेचे पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा पुन्हा घेण्याची नामुष्की ओढवली आहे. यंदा २२.७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीट-यूजी परीक्षा दिली होती. पेपरफुटी प्रकरणामुळे या विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र पेपरफुटीचे प्रकरण बाहेर कसे आले? कोणी याबद्दल आवाज उचलला? याची माहिती आता समोर आली आहे. राजस्थानमधील सिकर येथील शिक्षकांना पेपरफुटीची कुणकुण लागल्यानंतर त्यांनी सर्व पुरावे गोळा करत याचा भांडाफोड केला.

सोनी लिव्ह या ओटीटी प्लॅटफॉर्मवर व्हिसलब्लोअर नावाची वेबसीरीज २०२१ साली प्रदर्शित झाली होती. वैद्यकीय प्रवेश परीक्षा देण्यासाठी काही डॉक्टर असलेली मुले बोगस उमेदवार बनत असल्याचे आणि यामागे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचे वेबसीरीजमध्ये दाखवले गेले होते. या मालिकेतून एक डॉक्टर व्हिसलब्लोअर बनून हे रॅकेट उद्ध्वस्त करताना दाखवले आहे.

नीट-यूजी पेपरफुटीचे प्रकरणही अशाच व्हिसलब्लोअरने उघड केले आहे. ७ मे रोजी सिकरमधील शिक्षकाने राष्ट्रीय परीक्षा संस्था (एनटीए), गृह मंत्रालय आणि सीबीआयला पत्र लिहून पेपरफुटीची माहिती दिली. हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी या शिक्षकाला त्याच्या एका वरिष्ठांनी सहकार्य केले. ‘अंदाजित प्रश्नपत्रिका’ या नावाने वितरीत होणाऱ्या एका प्रश्नपत्रिकेचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर हे पेपरफुटीचे प्रकरण असल्याचे या शिक्षकांच्या लक्षात आले आणि त्यांनी याविरोधात आवाज उचलण्याचा निर्णय घेतला.

द इंडियन एक्सप्रेसने या शिक्षकांशी संवाद साधून या प्रकाराची माहिती समोर आणली आले. मात्र या शिक्षकांनी आपले नाव उघड केले जाऊ नये, असे सांगितल्यामुळे त्यांचे नाव गुप्त ठेवले गेले आहे. ज्यादिवशी नीटची परीक्षा होती, त्याचदिवशी आमच्यासमोर अंदाजित प्रश्नपत्रिका आली. १५० पानांचे पीडीएफ कॉपी असल्यामुळे आम्हाला त्याचा अभ्यास करण्याचा वेळ मिळाला नाही. त्याचवेळी आमचे विद्यार्थी परीक्षेबद्दल त्यांचे प्रश्न आणि शंका विचारण्यासाठी फोन करत होते. त्यामुळे आम्हाला परीक्षेच्या दिवशी प्रश्नपत्रिका तपासता आली नाही.

मूळ प्रश्नपत्रिकेतील १३५ प्रश्न

शिक्षकांनी पुढे सांगितले की, अंदाजित प्रश्नपत्रिकेत आम्हाला १३५ प्रश्न आढळले. यातील ९० जीवशास्त्राचे आणि ४५ रसायनशास्त्राचे होते. हे प्रश्न मूळ प्रश्नपत्रिकेतही होते. या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी आम्ही सिकरमधील काही पत्रकारांशी संपर्क साधला. त्यांनी आम्हाला सांगितले की, या प्रकरणी पोलिसांत तक्रार झाली तरच ते बातमी लावू शकतात. यात बराच वेळ गेला त्यानंतर मध्यरात्री आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन याची माहिती दिली.

या प्रकरणाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. यासाठी २०१५ च्या पेपरफुटी (अखिल भारतीय वैद्यकीय पूर्वपरीक्षा) प्रकरणाचा अभ्यास केला. ते प्रकरण कसे उघडकीस आले, यात व्हिसलब्लोअरची मदत घ्यावी का. तसेच सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीचाही अभ्यास केला. आम्ही काही वकिलांचे क्रमांक मिळवून त्यांनाही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, असेही या शिक्षकांनी सांगितले.

NEET Exam 2027 Online
२०२७ पासून ‘NEET’ परीक्षा होणार ऑनलाइन  (AI Generated Image: Gemeni)

पुढे आम्ही ईमेल पाठवण्याचा निर्णय घेतला. ७ मे रोजी आम्ही एनटीए, एमएचए आणि सीबीआयला ईमेलद्वारे तक्रार पाठवली. आम्हाला तात्काळ प्रतिसाद मिळाला. ८ मे रोजी केंद्रातून एक पथक सिकरला पोहोचले. त्यानंतर राजस्थान पोलिसांचा विशेष कृती गटदेखील यात सामील झाला आणि त्यांनी संयुक्त कारवाई केली. आम्हाला जी काही माहिती द्यायची होती, ती त्यांना दिली.

तर आम्ही टीकेचे धनी ठरलो असतो

हे प्रकरण उघडकीस आणण्यात बरीच सावधगिरी बाळगली, असेही या शिक्षकांनी सांगितले. “जर आम्ही सार्वजनिक मंचावर येऊन खुलासा केला असता तर कदाचित प्रशासन आमच्या मागे लागले असते. त्यामुळे आम्ही योग्य लोकांमार्फत हालचाली केल्या. जेणेकरून हे प्रकरण दाबले जाणार नाही किंवा आम्हीच भक्ष्य ठरणार नाहीत”, असे या शिक्षकाने सांगितले.

तसेच आम्ही जर थेट लोकांपर्यंत जाऊन हे उघड केले असते तर आमच्यावर चिखलफेक झाली असती. आमच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अवघड गेल्यामुळे आम्हाला ती रद्द करायची आहे, म्हणून आम्ही पेपरफुटीचा आरोप करत आहोत, असा गैरसमजही निर्माण झाला असता. तसेच हा पेपर नेमका कुठून फुटला, हेही आम्हाला जाणून घ्यायचे होते. सिकरमधून पेपर फुटला की त्याचे केंद्र बाहेर आहे, हे बाहेर येणे महत्त्वाचे होते. कारण सिकर शहराची बदनामी आम्हाला नको होती.

किती विद्यार्थ्यांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचली?

ही प्रश्नपत्रिका अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असल्याचा आम्हाला संशय आहे. तसेच ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका सोडवली गेली असल्याचीही आम्हाला भीती होती. याचा संपूर्ण निकालावर परिणाम झाला असता. सदर अंदाजित प्रश्नपत्रिका १०,००० विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचली असल्याची शक्यता आहे, असेही या शिक्षकांनी सांगितले.

आतापर्यंत देशभरातून आठ आरोपी ताब्यात

नीट-यूजी पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने बुधवारी देशभरात कारवाई केली. आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात जयपूरमधून तिघे, पुण्यातून दोघे, तर गुरुग्राम, नाशिक, अहिल्यानगरमधून प्रत्येकी एकाला ताब्यात घेतल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये जयपूरमधून मांगिलाल बिवल, विकास बिवल आणि दिनेश बिवल असे तिघे, गुरुग्राममधून यश यादव, नाशिकमधून शुभम खैरनार, अहिल्यानगरमधून धनंजय लोखंडे, पुण्यामधून ब्युटीपार्लर चालक मनीषा वाघमारे व शेषराव सोळंकी या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.