नवी दिल्ली : ‘नीट-यूजी’ची प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असताना, २१ जूनला होणार्‍या फेरपरीक्षेसाठी केंद्र सरकारने उच्चस्तरीय देखरेख यंत्रणेची तयारी केल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी गुरुवारी महत्त्वाची बैठक घेण्यात आली.

या प्रकरणी थेट पंतप्रधान मोदींनी लक्ष घातले असून ‘नीट’च्या फेरपरीक्षेसंदर्भातील सर्व घडामोडींची माहिती तात्काळ पंतप्रधान कार्यालयाला देण्याची सूचना करण्यात आल्याचेही समजते.  संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय दूरसंचारमंत्री ज्योतिरादित्य शिंदे, राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे (एनटीए) महासंचालक अभिषेक सिंह, ‘सीबीएसई’चे प्रतिनिधी, केंद्रीय शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांसह पंतप्रधान कार्यालयातील अधिकारीही सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: या घडामोडींचा आढावा घेत असून त्यांना या मुद्द्याबाबत सातत्याने माहिती पुरवली जात असल्याचे सांगितले जाते. प्रश्नपत्रिका देशभर पोहोचवण्यासाठी या वेळी टपाल विभागाऐवजी हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे. यासंदर्भातही दोन्ही नेत्यांनी चर्चा केल्याचे समजते. 

‘नीट-यूजी’च्या पेपरफुटीमुळे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाला नामुष्कीला सामोरे जावे लागले. सुमारे २२ लाख विद्यार्थ्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. हा फेरपरीक्षेचा मुद्दा देशभर संवेदनशील बनला आहे. त्यामुळे २१ जूनला होणार्‍या परीक्षेमध्ये कोणताही गोंधळ वा गैरप्रकार होऊ नये याची केंद्र सरकार दक्षता घेत आहे. त्यासाठीच गुरुवारी उच्चस्तरीय बैठक घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. परीक्षा पद्धतीची विश्वासार्हता पुन्हा प्रस्थापित करणे, परीक्षा त्रुटीविरहित होण्यासाठी सुरक्षाव्यवस्था सुनिश्चित करणे आदी मुद्द्यांवर बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली. सुमारे ४० मिनिटे झालेल्या या बैठकीनंतर राजनाथ सिंह आणि धर्मेंद्र प्रधान यांच्यात परीक्षेच्या व्यवस्थापकीय बाबी आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा झाली.

देखरेख यंत्रणा शक्य

प्रश्नपत्रिका तयार करणे, कूटबद्ध ( इन्क्रीप्टेड) छपाई, वाहतुकीचे मार्ग, प्रश्नपत्रिका साठवणूक केंद्रे, वितरण व्यवस्था आणि परीक्षा केंद्रांपर्यंत प्रश्नपत्रिका पोहोचवण्याची यंत्रणा या संपूर्ण परीक्षा प्रक्रियेवर पंतप्रधान कार्यालयाची थेट देखरेख असेल. प्रश्नपत्रिका फुटणे, त्यामध्ये फेरफार करणे वा गोपनीय साहित्यापर्यंत अनधिकृत व्यक्तींना प्रवेश मिळणे अशा कोणत्याही संभाव्य धोक्यांना रोखण्यासाठी ह्य्रिअल-टाइमह्ण (प्रत्यक्ष वेळेत) काम करणारी आणि विविध संस्थांचा समावेश असलेली देखरेख यंत्रणा स्थापन केली जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. प्रश्नपत्रिका व संबंधित साहित्याच्या संरक्षणासाठी अतिरिक्त सुरक्षा यंत्रणा तैनात करता येईल का याचाही विचार केला जात आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित सुरक्षा यंत्रणांच्या माध्यमातून संभाव्य व्यवस्थापकीय मदत घेण्याबाबतही चर्चा केली जात आहे.

‘हवाई दलाचाही वापर’

’‘नीट-यूजी’ची परीक्षा घेण्यामध्ये केंद्र सरकारच्या अनेक विभागांचा समावेश असतो. टपाल विभाग, गृह विभाग, राज्य सरकारे याची मदत घेतली जाते.

’यापूर्वी झालेल्या परीक्षांमध्येही या विभागांचे सहाय्य घेतले गेले होते. यावेळी देखील या विभागांची मदत घेतली जाईल. सरकारमधील जे विभाग परीक्षा घेण्यामध्ये सहभागी होतात, त्यांच्यामार्फत त्रुटीविरहित परीक्षा घेतली जाईल.

’प्रश्नपत्रिका टपाल विभागामार्फत देशभर पोहोचवली जात असे. यावेळी मात्र हवाई दलाची मदत घेतली जाणार आहे. ही परीक्षा जूनमध्ये घेतली जात असल्यामुळे देशात ठिकठिकाणी प्रश्नपत्रिका पोहोचवता यावी यासाठी हवाई दलाचा वापर केला जाईल, असे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले.