NEET UG re-exam result declared: पेपरफुटीनंतर घेण्यात आलेल्या नीट फेरपरीक्षेचा निकाल नॅशनल टेस्टिंग एजन्सीने गुरुवारी (१६ जुलै) रात्री जाहीर केला. निकालासह एनटीएने अंतिम उत्तरतालिका देखील जाहीर केलीय. नीट परीक्षेत पंजाबचा आर्यन गुप्ता आणि हरियाणाच्या पंशुल बन्सल यांनी ७२० पैकी ७१५ गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे. विद्यार्थ्यांना neet.nta.nic.in संकेतस्थळावरुन आन्सर-की डाउनलोड करता येईल.
२१ जून रोजी झाली होती परीक्षा
नीट पेपरफुटीनंतर २१ जून रोजी फेरपरीक्षा घेण्यात आली होती. यापूर्वी ३ मे रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. २१ जून रोजीच्या फेरपरीक्षेला २० लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. ५,४४० भारतीय आणि १४ परदेशी केंद्रांवर ही परीक्षा पार पडली होती. यासाठी केंद्र सरकारकडून विशेष काळजी घेण्यात आली होती. सरकारने परीक्षेसाठी लष्काराची देखील मदत घेतली होती.
निकालातील महत्वाची आकडेवारी
राज्यस्तरीय अव्वल विद्यार्थ्यांमध्ये, लडाखच्या जिग्मेट यांगचान लामोने ५३० गुण, अंदमान आणि निकोबार बेटांच्या ध्रुव त्रिपाठीने ६०६ गुण आणि लक्षद्वीपच्या फाहमिदा अनीसने ५७३ गुण मिळवले आहेत. राज्यस्तरीय अव्वल विद्यार्थ्यांपैकी १७ जणांनी ७०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले, तर २६ जणांनी ६९० पेक्षा जास्त गुण मिळवले. NTA च्या आकडेवारीनुसार १,४९२ उमेदवारांनी ६५० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. तर, १०,१६० उमेदवारांनी ६०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत. ९०,७८० उमेदवारांनी ५०० किंवा त्याहून अधिक गुण मिळवले आहेत.
नीट परीक्षेची आन्सर-की कशी तपासावी?
- neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या
- साईटवर लॉग-इन करा
- होमपेजवरील NEET UG 2026 answer key या लिंकवर क्लिक करा.
- नवीन विंडोत Final Answer Key दिसेल
- आन्सर-की डाउनलोड करा किंवा प्रिंट काढता येईल
