नीट (NEET) परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा आता पुन्हा घेण्यात येणार आहे. यंदा जवळपास २२.७ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी नीटची (NEET) परीक्षा दिली होती. मात्र, पेपरफुटी प्रकरणामुळे तब्बल २२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचं भविष्य ठरवणारी ही नीटची परीक्षा रद्द करण्याची नामुष्की केंद्र सरकारवर ओढवली. या पेपरफुटीच्या प्रकरणाचा तपास आता सीबीआय करत आहे. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत अनेकांना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे.

या तपासात प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचवण्याच्या प्रक्रियेतील नेमकी कोणती कडी कमकुवत ठरली? तसेच सुरक्षेचा भंग कुठे झाला? याचाही तपास सीबीआय करत आहे. दरम्यान, नीट पेपरफुटीच्या या प्रकरणानंतर पुन्हा असा प्रकार घडू नये, याची खबरदारी आता केंद्र सरकारकडून घेतली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी यापुढे भारतीय लष्कराची मदत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. नीट-यूजी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेण्याचा विचार सरकार करत असून यावर लवकरच अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.

संरक्षण मंत्री आणि शिक्षण मंत्र्यांच्या बैठकीत काय ठरलं?

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीला शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, एनटीएचे महासंचालक अभिषेक सिंह, संरक्षण अधिकारी आणि टपाल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नीट पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाली असून पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये, यासाठी प्रश्नपत्रिकांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी भारतीय हवाई दलाची मदत घेता येईल का? याबाबत चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, नीट-यूजी फेरपरीक्षा घेण्यासाठी एनटीएकडे आता खूप कमी वेळ आहे. नीट-यूजी परीक्षेची तयारी साधारणपणे ६ महिने चालते. मात्र, आता एनटीए ३८ दिवसांच्या कालावधीत फेरपरीक्षेची तयारी करत आहे. सूत्रांच्या मते, “फेरपरीक्षेमध्ये वाहतूक, दळणवळण आणि सुरक्षा यांसारख्या बाबींमध्ये संपूर्ण सरकारी दृष्टिकोन अवलंबला जाणार आहे. त्यासाठी लष्कर आणि हवाई दलापासून ते निमलष्करी दल, राज्य सरकार आणि जिल्हा प्रशासन, तसेच टपाल सेवेपर्यंत सर्वांच्या सहकार्याची गरज लागू शकते.”

नीटच्या पुनर्परीक्षेची तारीख काय आहे?

एनटीएनं नीट पुनर्परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. त्यानुसार येत्या २१ जून रोजी रविवारी नीटची पुनर्परीक्षा पार पडणार आहे. परीक्षेची तारीख जाहीर झाल्यामुळे आता विद्यार्थ्यांना त्यादृष्टीने अभ्यासाचं नियोजन करावं लागणार आहे. तसेच एनटीएने विद्यार्थी आणि पालकांना एक महत्त्वाचं आवाहनही केलेलं आहे. परीक्षेबाबतच्या कोणत्याही माहितीसाठी केवळ नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या अधिकृत माध्यमांवरच विश्वास ठेवावा असं स्पष्ट करण्यात आलं आहे.