NEET परीक्षा आणि त्याभोवती उठलेलं वादाचं वादळ शमण्याचं नाव घेत नाहीये. आता कर्नाटकमधील एका विद्यार्थिनीनं नॅशनल टेस्टिंग एजन्सीवर (NTA) गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. आपण १६५ प्रश्न अचूक सोडवले असतानाही मिळालेली OMR शीट भलतीच असल्याचा आणि चक्क उणे ११ (-११) गुण मिळाल्याचा दावा या विद्यार्थिनीनं केला आहे.
OMR शीटमध्ये मोठा फेरफार?
कर्नाटकातील हावेरी जिल्ह्यातील बिंदूश्री जगदीश पवार हिने NEET UG २०२६ ची फेरपरीक्षा दिली होती. परीक्षेच्या अंतिम उत्तरतालिकेशी (Final Answer Key) स्वतःच्या उत्तरांची पडताळणी केल्यानंतर तिला सुमारे ६६८ गुण मिळणे अपेक्षित होते. तिच्या म्हणण्यानुसार वैद्यकीय प्रवेशासाठी हे गुण पुरेसे ठरले असते.
मात्र, १६ जुलै रोजी निकाल जाहीर झाल्यानंतर जारी झालेल्या OMR शीटमध्ये बिंदूश्रीनं केवळ ४१ प्रश्न सोडवल्याची नोंद करण्यात आली आहे. अत्यंत विचित्र बाब म्हणजे, अत्यंत कमी वेळात हे सर्व पर्याय रंगवण्यात आल्याचे OMR शीटमध्ये दिसून येत आहे. OMR शीटमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आणि तफावत असून NTA कडे याबाबत दाद मागूनही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाहीये.
“मी १८० पैकी १६५ प्रश्न सोडवले होते. उत्तरतालिकेनुसार मला ६६८ गुण मिळायला हवे होते. पण NTA च्या OMR शीटमध्ये मी फक्त ४१ प्रश्न सोडवल्याचे दाखवून मला उणे ११ (-११) गुण देण्यात आले आहेत. OMR शीटमध्ये स्पष्टपणे मोठा गोंधळ दिसून येत आहे. NTA नं माझी खरी OMR शीट मला परत द्यावी, एवढीच माझी विनंती आहे.” – बिंदूश्री जगदीश पवार (NEET परीक्षार्थी)
उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी
वारंवार ई-मेल आणि विचारणा करूनही NTA कडून कोणतेही समाधानकारक उत्तर न मिळाल्यानं, बिंदूश्रीचे कुटुंब आता याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या तयारीत आहे. या घटनेमुळे देशभरातून पुन्हा एकदा NEET परीक्षेतील OMR शीटच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, राष्ट्रीय स्तरावरील या परीक्षा पद्धतीत तातडीने सुधारणा करण्याची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे.
