फ्रान्सचे संरक्षण मंत्री भारताच्या दौऱ्यावर येणार असतानाच, भारतीय वायुसेनेकरता फ्रान्सकडून राफाल लढाऊ विमाने मिळवण्यासाठी वाटाघाटी याच महिन्यात सुरू होतील आणि कोटय़वधी डॉलर्सचा हा सौदा ‘लवकरात लवकर’ पूर्ण करण्यात येईल, असे भारताने म्हटले आहे.
राफाल विमाने खरेदीच्या व्यवहारासाठी दोन्ही सरकारांची एक समिती स्थापन करण्यात येईल व ती या सौद्यासाठी वाटाघाटी सुरू करेल. या वाटाघाटी मे महिन्यात केव्हाही सुरू होतील आणि त्या आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करायच्या आहेत, असे संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी येथे  सांगितले.
तथापि, बराच गाजावाजा झालेला हा सौदा पूर्ण करण्यासाठी मुदत निश्चित करण्याचे पर्रिकर यांनी नाकारले. हा दोन सरकारांमधील व्यवहार असल्यामुळे तो लवकरच पूर्ण होईल, असे ते म्हणाले.
या वाटाघाटींच्या तपशिलाला अंतिम रूप देण्यासाठी फ्रान्सचे संरक्षण मंत्री ९ मे रोजी नवी दिल्लीला येण्याची अपेक्षा आहे. ते केवळ हे तपशील निश्चित करण्यासाठी आणि प्रक्रिया पुढे नेण्यासाठी येणार आहेत. आम्ही त्यापुढील चर्चा करणार नाही. या प्रक्रियेला गती देण्यासाठीच दोन्ही सरकारांकरवी ही समिती नेमली जाणार असून, ही समिती कालबद्ध पद्धतीने वाटाघाटी पूर्ण करेल, असे पर्रिकर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात फ्रान्सच्या दौऱ्यात फ्रान्सकडून सुमारे ६ अब्ज अमेरिकन डॉलर्स किमतीची ३६ राफाल विमाने खरेदी करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली होती.