Neha Bora Brahmanwad Statement: डाव्या विचारसरणीच्या विद्यार्थी नेत्या आणि ‘आयसा’च्या अध्यक्षा नेहा बोरा यांनी ‘ब्राह्मणवादा’बाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून ‘इंडिया’ आघाडीत तीव्र मतभेद समोर आले आहेत. काँग्रेसचा प्रमुख मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाने बोरा यांच्या या वक्तव्यापासून स्पष्ट शब्दांत फारकत घेतली असून, शिवसेना (ठाकरे) पक्षानेही यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
निवडणूक आयोगाच्या मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेतील कथित गैरव्यवहारांवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात विरोधकांच्या व्यासपीठावरून आक्रमक भूमिका मांडल्यामुळे नेहा बोरा नुकत्याच चर्चेत आल्या होत्या. मात्र “ब्राह्मणवादापासून मुक्ती हवी,” या त्यांच्या जुन्या वक्तव्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राजकीय वाद पेटला आहे.
समाजवादी पक्षाची भूमिका काय?
उत्तर प्रदेशातील घोसी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि समाजवादी पक्षाचे नेते राजीव राय यांनी बोरा यांच्या विधानावर आक्षेप घेतला. “अशा प्रकारे सरसकट विधान करणे पूर्णपणे अयोग्य आहे. प्रत्येक धर्मात आणि समाजात चांगली तसेच वाईट माणसे असतात. आपण कोणत्याही घटकाबद्दल असा सामान्य निष्कर्ष काढू नये,” असे राय म्हणाले.
तसेच “अशा विधानांमुळे राजकीय वातावरण तापवणे हेच भाजपाला हवे आहे, त्यामुळे आपण त्यांच्या सापळ्यात का अडकावे? आजच्या काळात अशा भाषेचा आधार नसलेले राजकीय वक्तृत्व अजिबात स्वीकारार्ह नाही. जात, धर्म, समुदाय किंवा प्रांतावरून सरसकट विधाने करणे टाळायला हवे,” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
ठाकरे गटाचीही टीका
केवळ अखिलेश यादव यांच्या पक्षानेच नव्हे, तर शिवसेना (ठाकरे) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनीही नेहा बोरा यांच्या भूमिकेला दुर्दैवी ठरवले आहे. “उजवी असो वा डावी, कोणत्याही प्रकारची टोकाची आणि अतिरेकी विचारसरणी देशासाठी हानिकारक असते,” असा टोला त्यांनी लगावला.
चतुर्वेदी म्हणाल्या, “हा व्हिडीओ जुना असू शकतो. परंतु मंदिरांमध्ये बलात्कार होतात, पुजारी असे गुन्हे करतात किंवा ब्राह्मण महिला सुरक्षित नाहीत, अशा प्रकारची मांडणी करणारी मानसिकता समोर आणणारा हा विचार अतिशय दुर्दैवी आहे. मी सहसा जातीच्या मुद्द्यांवर बोलणे टाळते; मात्र एक ब्राह्मण महिला म्हणून विचारते की, अशी हीन भाषा वापरणे योग्य आहे का? मी नेहा बोरा यांच्याशी बसून चर्चा करेन आणि त्यांना सांगेन की, प्रत्येक गोष्टीकडे जात किंवा धर्माच्या चष्म्यातून पाहिले जाऊ नये. त्या तरुण, हुशार आणि लढाऊ वृत्तीच्या आहेत; त्यांनी आपल्या बुद्धीचा वापर विधायक कामांसाठी करायला हवा.
भाजपाकडून ‘हिंदूद्वेष्टेपणाचा’ आरोप
दरम्यान, या व्हिडीओवरून भाजपाने थेट काँग्रेस आणि राहुल गांधींना लक्ष्य केले आहे. भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रदीप भंडारी यांनी हा व्हिडीओ ‘एक्स’वर शेअर करत नेहा बोरा यांच्यावर हिंदूद्वेष पसरवल्याचा आरोप केला. भंडारी यांनी बोरा यांना राहुल गांधींच्या राजकारणाची ‘पोस्टर गर्ल’ संबोधत, हे वक्तव्य राहुल गांधींच्या आधीच्या एका वक्तव्याशी जोडले.
“काँग्रेसला मतांच्या राजकारणासाठी हिंदूंचा द्वेष आहे आणि ही विचारसरणी देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण करणारी आहे,” अशी टीका त्यांनी केली.
हा व्हिडीओ कधीचा आहे आणि नेहा बोरा यांनी नेमक्या कोणत्या पार्श्वभूमीवर हे वक्तव्य केले होते, याची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नाही. मात्र, निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आणि ‘इंडिया’ आघाडीच्या व्यासपीठावर राहुल गांधींसोबत आंदोलनात सक्रिय असणाऱ्या नेहा बोरा यांच्या या वक्तव्यामुळे विरोधकांची कोंडी झाली असून, आघाडीतील मित्रपक्षांनी वेळीच सावध पवित्रा घेत स्वतःला या विधानापासून दूर केले आहे.
