Neha Bora Ink Attack Ranchi: झारखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी स्पर्धा परीक्षांच्या पेपरफुटी प्रकरणी आंदोलन करत आहेत. या आंदोलनात ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनच्या अध्यक्षा नेहा बोरा यांनी आज हजेरी लावली. रांचीमध्ये झारखंड विधानसभेकडे जाणाऱ्या निषेध मोर्चात सहभागी झालेल्या बोरा यांच्यावर शाई फेकल्याचा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. “आरएसएस आणि भाजपाच्या गुंडांनी शाई फेकली”, असा आरोप बोरा यांनी केला आहे.

नेहा बोरा यांच्यावर शाई फेकली

१४ व्या झारखंड लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या संयुक्त पदवी स्तर परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरव्यवहाराच्या निषेधार्थ गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या प्रकरणी आज विद्यार्थ्यांनी निषेध मार्चा काढला होता. शाई फेक झाल्यानंतरचा नेहा बोरा यांनी स्वत:चा एक फोटो शेअर केला आहे. “रांची येथे मोर्चादरम्यान, भाजपा आणि आरएसएसच्या गुंडांनी शाई माझ्यासह इतर २० महिलांवर शाई फेकली”, असा आरोप बोरा यांनी केला आहे.

भाजपा – आरएसएसवर आरोप

“शाई त्यांच्यासाठी दुसऱ्यांना त्रास देण्याचे साधन आहे, पण आम्ही याच्यातून आमचं भविष्य लिहू”, असे बोरा यांनी म्हटले आहे. मी ही शाई अभिमानाने मिरवते, असेही बोरा यांनी म्हटले आहे. नेहा बोरा यांच्या शाईफेक झाल्याचा व्हिडीओ समोर आला असून, त्यात त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकण्यात आल्याचे दिसत आहे. चेहऱ्यासह, मान आणि कपड्यांवर देखील शाई फेकल्याचे व्हिडीओत दिसत आहे. शाई फेकण्यासाठी आलेल्या व्यक्तीला आंदोलकांनी पकडले त्यावेळी त्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या असेही बोरा माध्यमांशी बोलताना म्हणाल्या. यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

शाईफेक करणारा व्यक्ती काय म्हणाला?

शाईफेक करणाऱ्या व्यक्तीने माध्यमांशी बोलताना त्याने नेहा पोरा आवडत नसल्याचे सांगितले. “उमर खालिदचे समर्थन करते म्हणून मला नेहा बोरा आवडत नाही. मला कशीच फिकीर नाही. मी सरळ तिच्या शाई फेकली. ते सगळे राष्ट्रविरोधी आहेत”, असे शाई फेकणाऱ्याने माध्यमांशी बोलताना सांगितले. पेपरफुटी विरोधात आवाज उठवणाऱ्यांमध्ये नेहा बोरा एक महत्वाचे नाव आहे. जंतर मंतर येथे झालेल्या नीट पेपरफुटी विरोधातील आंदोलनात बोरा यांनी २३ दिवस उपोषण केले होते.