कॉक्रोच जनता पार्टीच्या दिल्लीतल्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. या दिवशीही आंदोलकांची धरपकड करण्यात आली. अभिजीत दिपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना विमानातूनच ताब्यात घेण्यात आलं होतं. या सगळ्यांना आता सोडण्यात आलं आहे. ज्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे सर्वात डरपोक पंतप्रधान असल्याची टीका त्यांनी केली आहे. तसंच नरेंद्र मोदी देशाचे महान पंतप्रधान होऊ इच्छितात पण आणीबाणी काय असते ते त्यांनी दाखवून दिलं. हुकूमशहा घाबरून गेला आहे, त्यामुळे शनिवारी ट्रेन्सही रद्द कऱण्यात आल्या, लोकांना त्रास देण्यात आला असा आरोप कॉक्रोच जनता पार्टीने केला आहे. तसंच नेहा बोराने दिल्ली पोलिसांच्या बस आहेत की छळ छावण्या आहेत? हा प्रश्न विचारला आहे आणि व्हिडीओ पोस्ट केला आहे.
काय म्हटलं आहे नेहा बोराने?
आम्हाला ताब्यात घेतलं आहे आणि बसमध्ये बसवलं आहे. या बसमध्ये छोटे छोटे केबिन आहेत, त्याला जाळ्या आणि दरवाजे बसवण्यात आले आहेत. या ठिकाणी श्वास घ्यायलाही नीट जागा नाही. जे पुरुष आंदोलक आहेत त्यांना जातीवाचक शिव्या देण्यात आल्या आहेत, आई-बहिणीवरून शिव्या दिल्या गेल्या आहेत. प्रायव्हेट पार्टवर त्यांना लाथा मारण्यात आल्या आहेत. ज्या महिला आहेत त्यांना क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात या बसमध्ये बसवलं गेलं आहे. सहा महिलांची जागा आहे तिथे आठ किंवा नऊ जणींना बसवलं गेलंय. ही बस तुरुंगासारखी असून त्यात चार सेल आहेत, त्यांना कड्या लावण्यात आल्या आहेत आणि कुलूप लावण्याची सोय आहे असं म्हणत नेहा बोराने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
या बसेस आहेत की छळ छावण्या?
आम्हाला ताब्यात घेण्यापूर्वी या बसेस तुरुंगासारख्या तयार करण्यात आल्या आहेत. हाच दिल्ली पोलिसांचा हेतू आहे. दिल्ली पोलिसांनी ज्या बेधुंदपणे आणि बेदरकारपणे कारवाई केली आहे त्याचा अर्थ समजणं अनाकलनीय आहे. कारण ते काहीही करत नाहीयेत, फक्त सामान्य माणसांच्या विरोधात यांनी लढाई सुरू केली आहे. एवढंच लष्कर, एवढे पोलीस, मोठ्या प्रमाणावर हिंसा, जातीवाचक शिव्या, आई बहिणीवरून शिव्या हे सगळं कशासाठी तर व्होटचोर ज्ञानेश कुमारचा बचाव करण्यासाठी. वर्दीतले लोक सरकारचे दलाल झाले आहेत, ज्ञानेश कुमारांना वाचवत आहेत आणि भाजपा तसंच संघाची दलाली करणारे हे पोलीस आहेत असं नेहा बोराने व्हिडीओ पोस्ट करत म्हटलं आहे.
भाजपाकडून उत्तर दिलं जाणार का?
त्यामुळे आता याबाबत भाजपा सरकार किंवा दिल्ली पोलीस काही उत्तर देणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आजही आंदोलकांची धरपकड करण्यात आली आहे. नेहा बोराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान नेहा बोरा या आंदोलनकर्त्या महिलेने व्हिडीओ पोस्ट करत ताब्यात घेणारी बस म्हणजे तुरुंग आहे अशी टीका केली आहे आणि व्हिडीओही पोस्ट केला आहे.
