Lehra Do Tiranga Campaign : ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन (AISA) च्या अध्यक्षा नेहा बोरा यांची शनिवारी पहाटे सुटका करण्यात आली, तर कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांना आज (शनिवारी) नंतर विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाणार आहे, अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथे आयोजित लेहरा दो तिरंगा निषेध मोर्चापूर्वी शुक्रवारी या दोघांना प्रतिबंधात्मक कोठडीत घेण्यात आले होते. दिल्ली पोलीस कायद्याच्या कलम ६५ अंतर्गत अटकेची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर बोरा यांची सुटका करण्यात आली. पीटीआय (PTI) ने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम १२६ आणि १७० अंतर्गत दिपके यांच्यावर कारवाई सुरू करण्यात आली होती, त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

‘कनॉट प्लेस’च्या सेंट्रल पार्कमध्ये शुक्रवारी संध्याकाळी पाच वाजता तिरंगा फडवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन दिपके यांनी केले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी दुपारीच दिपके राहत असलेल्या ठिकाणी जाऊन त्यांना नोटीस बजावली. नागरिक, व्यापारी आणि प्रवासी यांच्या अधिकारांवर गदा आणणारे कृत्य करू नका, असा इशारा त्यांना या नोटिशीतून देण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही दिपके यांनी घराबाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ताब्यात घेण्यात आले.

नेहा बोरा यादेखील ‘एआयएसए’च्या आंदोलनासाठी मंडी हाऊसकडे निघाल्या असताना त्यांना ताब्यात घेण्यात आले. या दोन्ही नेत्यांना अज्ञात स्थळी नेण्यात आले होते. त्यांना कायदेविषयक मदत करू दिली जात नसल्याचा आरोप ‘सीजेपी’ने रात्री उशिरा केला. त्याबाबत दिल्ली पोलिसांकडूनही अधिकृत माहिती देण्यात आली नव्हती.

गोंधळ आणि अराजकतेचं नवीन नॅरेटिव्ह पसरवलं जातंय

तुरुंगातून सुटका झाल्यानंतर एआयएसए (AISA) च्या राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा म्हणाल्या, “कायदा आणि सुव्यवस्थेचं सर्व प्रकारे सर्रास उल्लंघन केलं जात आहे. सामान्य नागरिकांशी जणू काही ते अट्टल गुन्हेगार असल्यासारखं वागवलं जात आहे, ही अशी पद्धत या देशात दीर्घकाळापासून सुरू आहे. सध्याच्या आंदोलनाने हे स्पष्टपणे उघड केलं आहे की लोकांना कशा प्रकारे ताब्यात घेतलं जात आहे, मग ते दिवसा असो वा संध्याकाळी, त्यांना रात्रभर कोठडीत ठेवलं जातं आणि केवळ पुढच्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी त्यांची सुटका केली जाते. कोणत्या अधिकाराच्या अंतर्गत हे समर्थनीय आहे? कोणत्या कायद्यानुसार किंवा आदेशानुसार आंदोलकांना रात्रभर कोठडीत ठेवण्याची परवानगी आहे? कायदेशीररित्या, व्यक्तींची, विशेषतः महिलांची सुटका सूर्यास्तानंतर केली पाहिजे, तरीही तसं होत नाहीये. याव्यतिरिक्त, गोंधळ आणि अराजकतेचं एक नवीन नॅरेटिव्ह पसरवले जात आहे.”

“कसला गोंधळ आणि कसली अराजकता? जी तुम्ही मध्य दिल्लीत (सेंट्रल दिल्ली) माजवलीत ती? दिल्लीचे लोक सुटकेचा श्वासही घेऊ शकत नाहीत; कामावर जाण्यासाठी ते कोणताही मार्ग निवडोत, तो त्यांना बंद मिळतो. तुम्ही संपूर्ण देशभरात गोंधळ आणि अराजकता पसरवत आहात. कृपया, भारतातील जनतेला सोडा. ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्या आणि एसआयआर (SIR) थांबवा, जेणेकरून या देशातील सामान्य नागरिक सुटकेचा श्वास घेऊ शकतील, त्यांना दिलासा मिळेल आणि त्यांच्या मतदानाच्या हक्कांची खात्री पटेल”, असं नेहा बोरा म्हणाल्या.

त्या पुढे म्हणाल्या, “त्यांनी (पोलिसांनी) माझे नाव, पत्ता आणि इतर तपशील मागितले. बऱ्याच वेळेपर्यंत त्यांनी मला कायदेशीर सल्लागाराशी (वकिलाशी) बोलण्याची किंवा सल्ला घेण्याची परवानगी देखील दिली नाही. आमचे वकील ५-६ तास माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते; आम्ही त्यांना फोन करण्यात यशस्वी झाल्यानंतच शेवटी त्यांना मला भेटण्याची परवानगी देण्यात आली. हे लोक अशाच प्रकारच्या गोष्टी दीर्घकाळापासून करत आले आहेत.”