बिहारमध्ये दारूबंदी असतानाही नवनवीन क्लृप्त्या शोधून दारूची तस्करी करण्याचे प्रकार थांबताना दिसत नाहीत. पण, दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या एका हायप्रोफाइल ट्रेनच्या ‘एसी फर्स्ट क्लास’ डब्यातून होणाऱ्या तस्करीनं सर्वांनाच अवाक केलं आहे. वय अवघे २५ वर्षे, दिसायला एखाद्या मॉडेलसारखी… पण कृत्य असं की पोलीसही चक्रावून गेले. ‘स्वतंत्र सेनानी एक्सप्रेस’मधून तब्बल ७५ लिटर ब्रँडेड विदेशी दारूची तस्करी करणाऱ्या नेहा झा नावाच्या तरुणीला बिहारच्या समस्तीपूर स्थानकात रंगेहात अटक करण्यात आली आहे.

समस्तीपूर स्थानकात मोठा थरार

वाराणसीहून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रेल्वे सुरक्षा बल (RPF) आणि गुन्हे गुप्तवार्ता विभागाने (CIB) ही धडक कारवाई केली. नवी दिल्ली ते जयनगर दरम्यान धावणाऱ्या स्वतंत्र सेनानी एक्सप्रेसच्या (12562) ‘H-1’ या एसी फर्स्ट क्लास डब्यातील कूप क्रमांक सात आतून बंद होता.

रेल्वे अधिकाऱ्यांनी दरवाजा ठोठावून उघडण्यास सांगितल्यानंतर आत २५ वर्षीय नेहा झा तिच्या मेहुण्यासोबत (ईशान कुमार) बसलेली आढळली. पोलिसांनी त्यांच्याकडील दोन मोठ्या सुटकेसची तपासणी केली असता, त्यात महागड्या विदेशी दारूच्या बाटल्यांचा मोठा साठा आढळून आला. विशेष म्हणजे, एसी फर्स्ट क्लासच्या कूपमध्ये बसलेल्या या दोघांकडे प्रवासाचे कोणतेही वैध तिकीट नव्हते.

पोलिसांशी वाद आणि हाय-व्होल्टेज ड्रामा

सुटकेस उघडताच नेहाने अत्यंत आत्मविश्वासाने पोलिसांवर दबाव आणण्याचा आणि वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरपीएफ कर्मचाऱ्यांनी या संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ शूटिंग केले. तपासात विनातिकीट प्रवास आणि दारूची बेकायदेशीर वाहतूक स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाईसाठी लोहमार्ग पोलिसांच्या (GRP) स्वाधीन केले.

वैद्यकीय प्रतिनिधीचा बुरखा अन् बड्या हस्तींना पुरवठा

तपासादरम्यान समोर आलेली माहिती थक्क करणारी आहे. नेहा स्वतःला ‘मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह’ (MR) म्हणजेच वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून सांगायची. या व्यवसायाच्या आडून ती दरभंगा आणि आसपासच्या परिसरातील डॉक्टर, उद्योगपती तसेच स्थानिक प्रभावशाली व्यक्तींना गुप्तपणे महागडी विदेशी दारू पुरवत असल्याचा संशय आहे.

कुटुंबाचा ‘दारू तस्करी’चा काळोखा इतिहास

नेहा झा हिच्या कौटुंबिक पार्श्वभूमीची चौकशी केली असता, संपूर्ण कुटुंबच या संघटित गुन्हेगारीत लिप्त असल्याचे समोर आले आहे:

  • वडिलांची पहिली अटक: नेहाचे वडील संजय झा हे आधी शेती करायचे. मात्र, जास्त पैशांच्या लाभापोटी त्यांनी दारू तस्करी सुरू केली. सिंघिया पोलीस ठाण्याने त्यांना दारू तस्करीत अटक करून तुरुंगात पाठवले.
  • मोठी बहिणही अटकेत: वडिलांच्या अटकेनंतर कुटुंबाच्या या बेकायदेशीर नेटवर्कची कमान मोठी बहीण निशू झा हिने सांभाळली. मात्र, ३० नोव्हेंबर २०२५ रोजी दरभंगा उत्पादन शुल्क विभागाने निशूला २१ लिटर विदेशी दारूसह अटक केली.
  • नेहा आणि मेहुण्याचा प्रवेश: बहीण तुरुंगात गेल्यानंतर हे जाळे बंद पडू नये म्हणून नेहाने तिचा मेहुणा ईशान याच्या साथीने हा काळा धंदा पुढे चालवण्यास सुरुवात केली.

योगायोग की गुन्हेगारी पॅटर्न?

नेहाच्या अटकेनंतर स्थानिक पातळीवर एका विचित्र योगायोगाची जोरदार चर्चा रंगली आहे. तिची मोठी बहीण निशू हिला वयाच्या २५ व्या वर्षीच दारू तस्करीत अटक झाली होती. आता नेहादेखील वयाच्या २५ व्या वर्षीच ७५ लिटर विदेशी दारूसह पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे.

सध्या पोलीस या कौटुंबिक नेटवर्कची पाळेमुळे खोदून काढत असून, दिल्लीहून बिहारपर्यंत पसरलेल्या या रॅकेटमध्ये आणखी कोणत्या बड्या व्यक्तींचा हात आहे, याचा सखोल तपास करत आहेत.