लोकसभेत भाषण करताना पंडित नेहरुंनी वंदे मातरमचे तुकडे केले आणि मुस्लिमांचं लांगूलचालन करण्यास सुरुवात केली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत पुन्हा एकदा वंदे मातरमच्या चर्चे दरम्यान पंडीत नेहरुंवर जोरदार टीका केली आहे.
अमित शाह काय म्हणाले?
वंदे मातरमला १५० वर्षे झाली आहेत. या महान गीताचा संबंध पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या निवडणुकीशी जोडून काही लोक या गीताचं महत्त्व कमी करु पाहात आहेत. वंदे मातरम ही एक अमर रचना आहे जी भारताच्या कर्तव्य आणि देशाप्रति असलेलं समर्पण भाव दाखवते.
पंडित नेहरुंवर अमित शाह यांची टीका
आपल्या भाषणात अमित शाह म्हणाले की वंदे मातरमचे तुकडे जवाहरलाल नेहरुंनी केले आणि ते मर्यादित केलं. ज्यानंतर देशात विशिष्ट समाजाचं लांगूलचालन सुरु झालं. ज्यानंतर देशाला फाळणी सहन करावी लागली. जर वंदे मातरमचे तुकडे केले नसते तर देशाची फाळणीही झाली नसती.
अमित शाह यांनी वंदे मातरमबाबत काय म्हटलंय?
अमित शाह म्हणाले, आम्ही संसदेतल्या कामाकाजाला घाबरत नाही किंवा स्वतःचा बचाव करत नाही. आम्ही सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करायला तयार आहोत. वंदे मातरम या गीताला १५० वर्षे झाली आहेत. या गीताचा गौरव पुनर्स्थापित करण्याची हीच योग्य वेळ आहे. संपूर्ण वर्षभर आम्ही वंदे मातरम या गीताचा गौरव करण्याचा निर्णय घेतला आहे. वंदे मातरम हे असं गीत आहे ज्या गीताचं स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान होतं. आता देशाच्या अमृत काळात हे गीत लोकांसाठी प्रेरणा देणारं ठरेल असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पंडित नेहरुंबाबत काय म्हणाले होते?
१९३७ मध्ये मुस्लिम लीगने वंदे मातरमला विरोध दर्शवला होता. मात्र पंडित नेहरुंनी मुस्लिम लीगला खडे बोल सुनावले नाहीत. मोहम्मद अली जिना यांनी जेव्हा वंदे मातरमला विरोध केला तेव्हा पंडित नेहरुंना त्यांची खुर्ची डळमळीत होताना दिसली. वंदे मातरम या गीतातील काही शब्दांवर मुस्लिम लीगला आक्षेप होता. त्यानंतर काँग्रेसने वंदे मातरमचे तुकडे केले. काँग्रेसने मुस्लिम लीगच्या दबावात हा निर्णय घेतला अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली. लांगुलचालनाच्या राजकारणात काँग्रेस गुरफटलं. त्यामुळे भारत फाळणीसारख्या दुर्दैवी निर्णयाला सामोरा गेला, असं मोदी यांनी म्हटलं होतं.
