नवी दिल्ली : संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये झालेल्या पं. जवाहरलाल नेहरू जयंतीच्या कार्यक्रमास राज्यसभा अध्यक्ष, लोकसभेचे अध्यक्ष व मंत्री अनुपस्थित राहिल्याबद्दल विरोधकांनी टीका केली आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास काँग्रेस प्रमुख सोनिया गांधी व इतर पक्षनेते उपस्थित होते.

राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद जयराम रमेश यांनी सांगितले की, संसदेत पंडित नेहरू यांच्या जयंतीला वेगळेच चित्र पाहायला मिळाले. या महत्त्वाच्या कार्यक्रमास राज्यसभेचे अध्यक्ष व इतर एकही मंत्री उपस्थित नव्हता. या पेक्षा दुसरे अन्यायकारक, हानिकारक काय असू शकते.

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन हे या कार्यक्रमास उपस्थित होते त्यांनी सांगितले की, सरकारच्या वतीने कुणीही उपस्थित नव्हते हे योग्य नाही. पण यात अनपेक्षितही काही नाही कारण सत्ताधारी आघाडी भारताच्या संसदेसह मोठय़ा संस्थांची हानी करीत आहे.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरवर पंतप्रधान नेहरू यांना आदरांजली वाहिली आहे. नेहरू हे सर्वाधिक काळ देशाचे पंतप्रधान होते.