Nepal missing warning signs : नेपाळमध्ये हिमनदीच्या दुर्घनटेपूर्वी धोक्याचे संकेत मिळाले होते, असा दावा ‘हायरिस्क’ (HiRISK) या वैज्ञानिक Consortium च्या नवीन अहवालात करण्यात आला आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे नेपाळमध्ये महाप्रलयकारी पूर आला आणि त्यात हजारो लोकांचे प्राण गेले आहेत. अनेकजण बेपत्ता असून मृतदेहांची ओळख पटवणंही आव्हानात्मक ठरत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

वैज्ञानिक संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ही आपत्ती येण्याच्या काही दिवस आधीच ‘प्री-इव्हेंट इंडिकेशन्स’ (घटनेपूर्वीचे संकेत) मिळाले होते. यामध्ये हिमनदी वितळून येणारे पाणी स्पष्टपणे तपकिरी रंगाचं झालं होतं आणि सभोवतालच्या खडकाळ उतारावर मोठी भेग (क्रॅक) पसरत असल्याचं दिसून आलं होतं. या निष्कर्षांमुळे हिमालयाच्या दुर्गम भागात हिमनद्यांशी संबंधित धोक्यांसाठी कार्यरत असलेल्या पूर्वसूचना प्रणालीबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, जर नदीच्या खालच्या भागात अधिक व्यापक यंत्रणा असती, तर मोठ्या संख्येने लोकांचे प्राण वाचवता आले असते.

दुर्घटना होण्यापूर्वी कोणते संकेत होते?

गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या ‘HiRISK’ अहवालात हिमनदी कोसळण्यापूर्वीच्या भौतिक बदलांचा आणि त्याचा आधीच माग काढण्याच्या शक्यतेचा अभ्यास करण्यात आला. वैज्ञानिकांनी सांगितलं की, “नंतर विचार केला असता, तिथे काही स्पष्ट पूर्वसंकेत होते.” हिमनदी कोसळण्याच्या काही दिवस आधी पाणी तपकिरी होणे आणि खडकाळ उतारावर भेगा वाढल्या असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं. परंतु, दुर्गम आणि अत्यंत उंचीवरील वातावरणात असे बदल शोधणे कठीण काम आहे. अहवालानुसार, चीनमधील काही हिमनदी तलावांवर (ग्लेशियल लेक्स) देखरेख ठेवण्यासाठी नुकतीच पूर्वसूचना यंत्रणा उभारण्यात आली होती, परंतु ज्या भागात ही दुर्घटना घडली तिथे हिमनद्यांशी संबंधित धोक्यांवर देखरेख ठेवणारी कोणतीही सक्रिय यंत्रणा नव्हती.

हिमनदी कोसळण्यास सुरुवात झाली, तेव्हा सुरुवातीच्या भूस्खलनाचा वेग इतका तीव्र होता की पारंपारिक पूर्वसूचना यंत्रणेने देखील बॉर्डर चेकपोस्टवर तैनात लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी खूप कमी वेळ दिला, कारण हा भाग सर्वात आधी बाधित झाला होता. वैज्ञानिकांच्या मते, १० मिनिटे किंवा त्याहून अधिक काळ आधी पूर्वसूचना देण्यास सक्षम असलेल्या व्यापक यंत्रणेमुळे मोठ्या संख्येने जीव वाचू शकले असते. या निष्कर्षामुळे केवळ हिमनदीच्या तलावांवरच नव्हे, तर अस्थिर हिमनद्या आणि सभोवतालच्या पर्वतीय उतारांवरही लक्ष ठेवू शकणाऱ्या यंत्रणेची गरज अधोरेखित झाली आहे, जेणेकरून खालच्या भागातील असुरक्षित समुदायांपर्यंत वेळेत चेतावणी पोहोचू शकेल.

मृत्यूचा आकडा १,१२७ वर

आपत्तीची कारणं शोधणे आणि बचाव कार्य सुरू असतानाच, नेपाळ पोलिसांच्या माहितीनुसार पूरातील मृतांची संख्या १,१२७ झाली आहे. रसुवा येथून ४५, नुवाकोटमधून १५५, धाडिंगमधून ५९, चितवनमधून ३४८, गोरखा येथून ६६, तनहूनमधून ३८, नवलपरासी पूर्वमधून २१७ आणि नवलपरासी पश्चिममधून १९० मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. भारतातही ९ मृतदेह सापडले आहेत. आतापर्यंत शोधून काढलेल्या मृतदेहांपैकी केवळ ९५ मृतदेहांची ओळख पटली असून ते त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. या आपत्तीमुळे हिमालयातील धोक्यांवर देखरेख ठेवण्यासाठी नेपाळ आणि चीन दरम्यान अधिक सहकार्याची गरज पुन्हा एकदा व्यक्त होत आहे.

या बैठकीला उपस्थित असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याच्या मते, या क्षेत्रातील नैसर्गिक धोक्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सहकार्य मजबूत करण्याबाबत चीन आणि नेपाळच्या अधिकाऱ्यांची मे महिन्यातच बैठक झाली होती. तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, सीमापार माहितीची देवाण-घेवाण अत्यंत महत्त्वाची आहे कारण पर्वतीय भागातील धोके सीमेच्या दोन्ही बाजूंच्या समुदायांवर आणि पायाभूत सुविधांवर वेगाने परिणाम करू शकतात.