Balen Shah Nepal’s New PM: रॅपर ते राजकारणी असा प्रवास करणारे बालेंद्र शाह यांचे नेपाळचे नवे पंतप्रधान म्हणून नाव जवळपास निश्चित झाले आहे. बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह यांनी नव्याने स्थापन केलेला आरएसपी पक्षाला नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत मोठे यश मिळाले. मैथिली भाषेत रॅप करणारे बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होणार अशी चर्चा तेव्हाच सुरु झाली होती. पण, बालेंद्र शाह उर्फ बालेन शाह नक्की कोण आहेत?
राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी
बालेन शाह यांनी राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (आरएसपी) पक्षाची स्थापना केली आहे. “माता जानकीला प्रणाम”, असे म्हणत त्यांनी नेपाळमध्ये प्रचाराला सुरुवात केली होती. बालेन शाह मैथिली बोलणारे नेते असून, त्यांचे याच भाषेतील रॅप देखील अतिशय पसंत केले जातात. बिहार आणि झारखंडमध्येही मैथिली मोठ्या प्रमाणात बोलली जाते. नेपाळमध्येही मैथिली दुसऱ्या क्रमांकाची भाषा आहे. बालेन शाह यांनी प्रचाराची सुरुवातही मधेश प्रांताची राजधानी आणि सीतेचे जन्मस्थान असलेल्या जनकपूरमधून केली होती.
आरएसपी १०० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर
नेपाळमध्ये गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये जेन-झी निदर्शने झाल्यानंतर बालेन शाह यांचे नाव समोर आले. रॅपरसह शाह काठमांडूचे माजी महापौर देखील आहेत. देशाच्या संसदेतील २७५ जागांपैकी आरएसपी १०० पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. शाह माजी पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्या विरोधात निवडणूक लढवत असून, तिथे शाह आघाडीवर आहेत. आरएसपीने नेपाळच्या सहा माजी पंतप्रधानांच्या विरोधात उमेदवार उभे केले आहेत.
कोण आहेत बालेन शाह?
बालेन शाह यांचा २७ एप्रिल १९९० रोजी नारादेवी, काठमांडू येथे जन्म झाला. शाह मधेशी समाजातून येतात. शाह यांच्या अडनावावरुन नेपाळमध्ये वादंग झाल्याचे पाहायला मिळाले होते. पण, जेन-झी आंदोलनानंतर बालेन यांचे नाव नेपाळमध्ये सर्वदूर पसरले. बालेन शाह यांची मधेशी संबंध आणि मैथिला भाषा त्यांना फायद्याची ठरल्याचे राजकीय तज्ञ सांगतात.
मधेशी समाज
मधेशी समाज हक्कासाठी लढणारा समाज म्हणून ओळखला जातो. देशातील राजकीय, आर्थिक आणि प्रशासकीय सुधारांसाठी समाजाने लढे दिल्याचे सांगितले जाते. नेपाळमध्ये मधेशी आंदोलन गाजले होते. या आंदोलनाची हक्व आणि समानतेसाठी लढा म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली होती. त्यामुळे मधेशी समाजाचा पंतप्रधान होणे याला महत्व असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय मधेशी समाजाचे भारताबरोबर जवळचे संबंध आहेत.
बालेन यांची वेगळी ओळख
बालेन शाह यांची रॅपर म्हणून देखील वेगळी ओळख आहे. त्यांच्या गाण्यातून सामाजिक मुद्यांवर भाष्य केले जाते तसेच, राजकीय भ्रष्टाचारावर भाष्य केले जाते. शाह यांच्या गाण्यातून विविध समस्या आणि मुद्यांवर प्रकाश टाकला जातो. काठमांडूत महापौराची जबाबदारी सांभाळल्यानंतर त्यांनी अनेक महत्वाच्या बदल घडवून आणले होते. कचरा व्यवस्थापनचा विषय त्यांनी निकालात काढला होता. याशिवाय वाहतूक कोंडी, अतिक्रमण, रस्ते याबाबत ठोस उपाययोजना करण्यात आल्या होत्या.
ताजी अपडेट
बालेन शाह यांनी नेपाळचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आहे. गेल्या वर्षी झालेल्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनानंतर सरकार कोसळल्यामुळे झालेल्या पहिल्याच निवडणुकीत त्यांच्या पक्षाने घवघवीत यश संपादन केले आहे. ३५ व्या वर्षी शपथ घेणारे शाह नेपाळचे सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. त्यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीचे संसदीय नेतृत्व देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.
