Nepal Political Change Update 2026 : नेपाळमधील प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या झापा-५ मतदारसंघातून राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाचे (RSP) तरुण नेते बालेंद्र शाह (बालेन शाह) यांनी माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांचा सुमारे ५०,००० मतांच्या फरकाने पराभव करून एक मोठा राजकीय उलटफेर घडवून आणला आहे. या विजयामुळे नेपाळच्या राजकारणात तरुण पिढीच्या (Gen-Z) सत्तेचा उदय मानला जात आहे.
निवडणूक आयोगाच्या अंतिम निकालांनुसार, बालेंद्र शाह यांना ६८,३४८ मते मिळाली, तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) चे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांना १८,७३४ मते मिळाली. विजयाचा हा फरक ४९,६१४ मतांचा राहिला.
नेपाळमध्ये Gen-Zचा उदय
बालेंद्र शाह यांना त्यांच्या पक्षाकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित केल्यानंतर झापा-५ मधील ही लढत देशभर चर्चेचा विषय ठरली होती. नेपाळच्या राजकारणातील सर्वात शक्तिशाली नेत्यांपैकी एक असलेल्या के. पी. शर्मा ओली यांच्याशी असलेल्या त्यांच्या थेट संघर्षामुळे हा मतदारसंघ राष्ट्रीय राजकीय चर्चेचे केंद्र बनला होता. विशेष म्हणजे, २०२२ च्या संसदीय निवडणुकीत के. पी. शर्मा ओली यांनी याच जागेवरून नेपाळी काँग्रेसचे नेते खगेन्द्र अधिकारी यांचा २८,००० पेक्षा जास्त मतांच्या फरकाने पराभव करून विजय मिळवला होता.
राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाची (RSP) लाट
शाह यांच्या पक्षाने नेपाळमध्ये अभूतपूर्व कामगिरी केली असून, काठमांडू खोऱ्यातील सर्व १० जागांवर विजय मिळवला आहे. काठमांडूचे माजी महापौर राहिलेले ३५ वर्षीय बालेन शाह आता नेपाळच्या पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत. मागील १८ वर्षांत १४ सरकारे बदलणाऱ्या नेपाळमध्ये प्रस्थापित नेत्यांना नाकारून जनतेने नव्या नेतृत्वाला कौल दिला आहे.या विजयानंतर नेपाळमध्ये नवीन सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
Gen-Z आंदोलनामुळे सत्तांतर?
नेपाळमधील ‘Gen-Z’ (जेन-झी) आंदोलन हे प्रामुख्याने तरुणांनी भ्रष्टाचारी व्यवस्था आणि प्रस्थापित राजकीय नेत्यांविरुद्ध पुकारलेले बंड होते. या आंदोलनामुळे नेपाळचे तत्कालीन पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना राजीनामा द्यावा लागला आणि सरकार कोसळले. सप्टेंबर २०२५ मध्ये नेपाळ सरकारने फेसबुक, युट्यूब आणि व्हॉट्सॲपसह सुमारे २६ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली होती. या निर्णयाला तरुणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हल्ला मानले आणि आंदोलनाला सुरुवात झाली . या तीव्र आंदोलनामुळे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांना ९ सप्टेंबर २०२५ रोजी राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर राष्ट्रपतींनी संसद बरखास्त करून ५ मार्च २०२६ रोजी निवडणुका घेण्याची घोषणा केली. या आंदोलनाने नेपाळच्या राजकारणात राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाला (RSP) आणि बालेंद्र शाह यांच्यासारख्या तरुण नेत्यांना मोठी उभारी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले अभिनंदन
“निवडणुका यशस्वी आणि शांततापूर्ण पार पडल्याबद्दल मी नेपाळचे नागरिक आणि तेथील सरकारचे हार्दिक अभिनंदन करतो. माझ्या नेपाळी बंधू-भगिनींनी अशा उत्साही पद्धतीने त्यांच्या लोकशाही अधिकाराचा वापर केल्याचे पाहून मनाला आनंद झाला. नेपाळच्या लोकशाही वाटचालीतील हा ऐतिहासिक टप्पा एक अभिमानास्पद क्षण आहे. एक जवळचा मित्र आणि शेजारी देश म्हणून, सामायिक शांतता, प्रगती आणि समृद्धीची नवीन शिखरे सर करण्यासाठी नेपाळचे नागरिक आणि तेथील नवीन सरकारसोबत मिळून काम करण्याच्या वचनबद्धतेवर भारत ठाम आहे”, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्सवर म्हटलं.
