काठमांडू, पीटीआय
गायक (रॅपर) ते राजकारणी असा प्रवास करणार्या बालेन (बालेन्द्र) शहा यांच्या राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने (आरएसपी) नेपाळच्या सार्वत्रिक निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवत प्रस्थापित राजकीय पक्षांना धक्का दिला. राष्ट्रीय स्वतंत्र पक्षाने प्रतिनिधी सभेच्या थेट निवडल्या जाणार्या १६५ जागांपैकी आतापर्यंत ११७ जागांवर विजय मिळवला असून आणखी ८ जागांवर आघाडी घेतली आहे, अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली.
नेपाळच्या निवडणूक आयोगाने आतापर्यंत १६५ पैकी १५२ जागांचे निकाल जाहीर केले आहेत. नेपाळी काँग्रेस पक्ष १७ जागांसह दुसर्या क्रमांकावर आहे. माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्या नेपाळ कम्युनिस्ट पार्टी (एकीकृत मार्क्सवादी-लेनिनवादी) पक्षाला केवळ ७ जागा मिळाल्या असून ३ ठिकाणी आघाडी आहे. श्रम संस्कृती पक्षाने २ जागा जिंकल्या असून एका जागेवर आघाडी घेतली आहे, तर राष्ट्रीय प्रजातंत्र पक्षाला १ जागा मिळाली आहे. विजयी उमेदवारांमध्ये एक अपक्षही आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, काठमांडू खोर्यातील तीन जिल्ह्यांतील सर्व १५ मतदारसंघांमध्ये ‘आरएसपी’ने दणदणीत विजय मिळवला. बालेन शहा यांनी झापा ५ मतदारसंघातून चार वेळा पंतप्रधान असलेल्या के. पी. शर्मा ओली यांचा ५० हजार मतांनी पराभव केला. प्रस्थापित पक्षांविरुद्ध जनतेत निर्माण झालेल्या असंतोषाचे हे स्पष्ट प्रतिबिंब मानले जात आहे. शहा हे देशाच्या संसदीय इतिहासातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराविरोधातील लढा, घराणेशाहीचा अंत यांसह विविध मुद्दे प्रचारात होते.
